Thursday, 24 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.05.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 May 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ मे २०१ दुपारी १.०० वा.

****



 स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राज्य विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा पैकी पाच जागांसाठीची मतमोजणी आज करण्यात आली. उस्मानाबाद-लातूर-बीड या मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी निवडणूक आयोगानं पुढे ढकलली आहे. पाच जागांपैकी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनं प्रत्येकी दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला. परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले असून, त्यांनी काँग्रेसच्या सुरेश देशमुख यांचा पराभव केला आहे. बाजोरिया यांना २५६, तर देशमुख यांना २२१ मतं मिळाली. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजी सहाणे यांचा एकशे सदुसष्ठ मतांनी पराभव केला. अमरावती विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे ४४१ मतांनी विजयी झाले. चंद्रपूर मध्ये भाजपाचे रामदास आंबटकर ५५० मतं मिळवून विजयी झाले, त्यांनी काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांचा पराभव केला. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकण विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे विजयी झाले, त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळेंचा पराभव केला.

****



 कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई इथं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत डावखरे यांनी भाजपत प्रवेश केला. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत डावखरे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यासंदर्भातला प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करू, असं दानवे यांनी यावेळी सांगितलं. पक्षांतर्गत स्थानिक राजकारणाला कंटाळून आमदार पदाचा, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा त्यांनी काल राजीनामा दिला होता.

****



 गेल्या महिन्यात १४ तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सुरु करण्यात आलेल्या ग्राम स्वराज अभियाना दरम्यान १६ हजार ८५० गावांतल्या गरीब नागरिकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवण्यात आल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. या अभियानात जनधन योजनेत २० लाख ५३ हजार, तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत १६ लाख लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात सांगितलं आहे.

****



 छत्तीसगढमधल्या सुकमा जिल्ह्यात आज सकाळी नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उपनिरीक्षक राजेश कुमार शहीद झाले, तर एक जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. पुसवाडा गावानजीक असलेल्या जंगलात आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा हल्ला झाला. या भागात नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी कारवाई सुरु करण्यात आली आहे.

****



 पोलाद आणि ॲल्युमिनिअम वर कर लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला आव्हान देत भारतानं जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रार दाखल केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मार्च महिन्यात पोलादाच्या आयातीवर ३२ टक्के, तर ॲल्युमिनिअमच्या आयातीवर दहा टक्के शुल्क लागू केलं होतं. भारत, चीन, रशिया, जपान, तुर्कस्तान आणि युरोपीय संघानं या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

****

 कर्मचारी निवड आयोगाच्या संयुक्त पदवी परिक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं सिफी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सहा कर्मचाऱ्यांसह एकूण १७ जणांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल दाखल केला आहे. या कंपनीच्या मुंबई, चेन्नई, नोएडा इथल्या कार्यालयांसह इतर ठिकाणी सीबीआयनं धाडी घातल्या, तसंच एका कर्मचाऱ्याच्या घरावरही छापा घातला. कर्मचारी निवड आयोगाच्या संयुक्त पदवी परीक्षेचा पेपर २१ फेब्रुवारी २०१८ रोजी होता, पेपर सुरु होण्याआधीच तो सोशल मीडियावर आला होता, असा आरोप आहे.

****



 दरवर्षी १२ ते १८ रॉकेट्सचं प्रक्षेपण करण्याच्या योजनेत उद्योगांना सहभागी करुन घेण्याबाबत विचार करत असल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं म्हटलं आहे. २०२० पर्यंत इस्रो उद्योगांकडून रॉकेट प्रक्षेपण करुन घेऊ इच्छित असल्याचं महेंद्रगिरीमधल्या इस्रो परिसराचे संचालक एस. पांडियान यांनी सांगितलं आहे.

****



 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी - मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परिक्षेच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर केली नसल्याचं मंडळानं स्पष्ट केलं आहे. सामाजिक माध्यमांवर निकालाच्या विविध तारखा येत असल्याचं निदर्शनास आल्यावर परीक्षार्थींनी या तारखांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन मंडळानं केलं आहे.

*****

***

No comments: