Wednesday, 23 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.05.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 May 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ मे २०१ दुपारी १.०० वा.

****



जनता दल सेक्युलर पक्षाचे नेते एच.डी.कुमारस्वामी आज संध्याकाळी साडेचार वाजता  होणाऱ्या कार्यक्रमात कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल वजुभाई वाला त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देतील. काँग्रेस नेते जी.परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. कुमारस्वामी यांना येत्या शुक्रवारी बहुमत सिद्ध करायचं आहे. आजच्या शपथ ग्रहण समारंभाला विरोधी पक्षांचे तसंच प्रादेशिक पक्षांचे नेते आणि बिगर भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.

 दरम्यान, भारतीय जनता पक्ष शपथ ग्रहण सोहळ्यावर बहिष्कार घालणार असून,  कर्नाटकमध्ये ‘जनमत विरोधी दिवस‘ पाळत आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते राज्यभर निषेध प्रदर्शन करत आहेत. काँग्रेस आणि जेडीएसची युती अपवित्र असून, या युतीनं जनादेशाचा अपमान केला आहे, असं भाजपनं म्हटलं आहे.

****

 जम्मू काश्मीरच्या जम्मू, सांबा आणि कठुआ जिल्ह्यांलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पाकिस्तानकडून काल सकाळपासून सुरू असलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यामुळे चार भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला तर सीमा सुरक्षा दलाच्या पाच जवानां सहित किमान सतरा जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे स्थलांतर करावं लागलेल्या नागरिकांसाठी शिबिरं उभारण्यात आली असून, प्रभावित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. भारतीय सैन्य या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत आहे.

****

 पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी दाखल झालेल्या दुसऱ्या आरोप पत्राची दखल घेत, विशेष सीबीआय न्यायालयानं या प्रकरणातला मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याच्याविरुद्ध  अजामीन पात्र अटकवॉरंट जारी केलं आहे. एकूण बारा हजार सहाशे छत्तीस कोटी रुपयांच्या घोटाळ्या पैकी सात हजार ऐंशी कोटी रुपयांच्या प्रकरणासाठी सीबीआयनं हे दुसरं आरोपपत्र दाखल केलं होतं.

****

 ब्रम्होस, या स्वनातित क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी झाली. ओडिशामधल्या चांदीपूर एकात्मिक चाचणी तळावरून ही चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राचा अतुलनीय वेग, अचूकता आणि संहारक क्षमतेमुळे आधुनिक युद्धाकरता हे सर्वश्रेष्ठ हत्यार असल्याचं, तसंच कालच्या चाचणीत सगळे निकष पूर्ण करत त्यानं लक्ष्याचा वेध घेतल्याचं, डीआरडीओ,  अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं.

****

 देशातल्या प्रत्येक घरात वीज पोहोचवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘प्रधानमंत्री सहज बिजली-हर घर सौभाग्य ‘ योजनेत आत्तापर्यंत देशातल्या सोळा हजार आठशे पन्नास खेड्यांना मोफत वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये, महाराष्ट्रातल्या एकशे ब्याण्णव खेड्यांमधल्या आठ हजार आठशे वीस घरांना या योजनेअंतर्गत वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. यात मराठवाड्यातल्या दोन हजार नऊशे अडोतीस घरांचा समावेश आहे.  

****

 सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये एकोणचाळीस कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी समितीच्या दोन माजी अध्यक्षांसह तीस संचालकांवर सोलापूरच्या जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विषेश लेखापरिक्षक सुरेश  काकडे यांनी दिलेल्या अहवालानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

 उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत बुलढाणा तालुक्यातल्या एकशे अट्ठावीस लाभार्थ्यांना अनुदान स्वरूपात चौऱ्याहत्तर लाख नव्वद हजार रुपये निधीचं वाटप करण्यात आलं आहे. ट्रॅक्टर आणि शेती उपयोगी यांत्रिक हत्यारं यांच्या खरेदीसाठी हा निधी देण्यात आला आहे. याशिवाय पाचशे सव्वीस प्राप्त अर्जांसाठीही अनुदानाची मागणी कृषी अधिकाऱ्यांनी केली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 पश्चिम रेल्वेनं तेवीस प्रमुख रेल्वेस्थानकांवर आता ई केटरिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासा दरम्यान विविध निवडक उपाहार गृहांमधले आपल्या पसंतीचे  खाद्यपदार्थ मागवता येतील. या स्थानकांमधे राज्यातल्या मुंबई सेंट्रल, बांद्रा टर्मिनस, अंधेरी, वसई रोड आणि नंदुरबार या स्थानकांचा समावेश आहे.

****

 रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिस या विभागातल्या भरतीसाठी रेल्वेनं अर्ज मागवले आहेत. दोन्ही विभागात मिळून नऊ हजार सातशेहून जास्त जागांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील, असं रेल्वे मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. या भरतीसंबंधीची संपूर्ण माहिती www.indianrailways.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

*****

***

No comments: