Saturday, 26 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.05.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 May 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ मे २०१ दुपारी १.०० वा.

****



 भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं उज्ज्वल भविष्या साठी लोकहिताचे अनेक निर्णय घेऊन नव्या भारताच्या जडण-घडणीची मुहूर्तमेढ रोवली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला आज चार वर्षे पूर्ण झाल्या निमित्त पंतप्रधान मोदी यांनी याबाबत ट्वीट करून, गेल्या चार वर्षांमध्ये देशात विकास ही एक चळवळ बनली असल्याचं म्हटलं आहे. सरकारसाठी देश हा सर्वोतोपरी असून, सरकार निष्ठेनं आणि समर्पण भावनेनं जनतेची सेवा करत राहिल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. गेल्या चार वर्षांच्या काळात भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी एक मोठी अर्थव्यवस्था बनली असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यानिमित्तानं म्हटलं आहे.

****



 राष्ट्रीय तपास संस्था - एन आय एनं दहा संशयित दहशतवाद्यांविरोधात लष्क़र ए तय्यबाकडून परकीय निधी घेतल्यामुळे आरोपपत्र दाखल केलं आहे. पाकिस्तान आणि दुबईस्थित लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेनं या दहशतवाद्यांना अतिरेकी कारवाया घडवून आणण्यासाठी हा निधी दिला असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दिल्लीच्या विशेष एन आय ए न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. भारतीय दंड विधान, बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायदा, पारपत्र कायदा, आधार कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

****



 केंद्रीय गृह विभागानं महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला सुरक्षा विभाग तयार केला आहे. महिलांवरील गुन्ह्याचं त्वरित निराकरण करण्यासाठी हा विभाग तयार करण्यात आला असून, याअंतर्गत बलात्कारा सारख्या गुन्ह्यांचं निर्धारित वेळेत निराकरण करण्यासाठी काम करण्यात येणार आहे.

****



 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी आठ पूर्णांक ५५ दशांश टक्के इतकं व्याज आकारण्याच्या सूचना आपल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं गेल्यावर्षीच या दराला मंजुरी दिली होती. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानं त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती.

****



 परदेशी चित्रपट निर्मात्यांना भारतात चित्रीकरणाला परवानगी देण्यासाठी चित्रपट सुविधा केंद्र सुरु केलं असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सांगितलं आहे. ते नवी दिल्लीत आशियाई भारतीय चित्रपट महोत्सवाचं उद्धाटन करताना बोलत होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे हे केंद्र सुरु करण्यात येणार असून, एक खिडकी योजनेमुळे चित्रीकरणासाठी परवानगी देणं सुलभ होईल, असं ते म्हणाले. या महोत्सवात ११ देशांचे ३२ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

****



 रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे गाड्यांमध्ये वर्षाला १२ लाख रुपयांपर्यंतचे अन्नपदार्थ विकणाऱ्यांना आता भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात नोंदणी करणं आवश्यक करण्यात आलं आहे. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी सर्व स्थानकं आणि रेल्वेमधल्या केटरिंगची सुविधा आणि खाद्य पदार्थांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यासाठी एक आढावा बैठक घेतली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. १५ दिवसांच्या आत ही ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे.

****



 पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्याचे नियम राज्य शासनानं जारी केले आहेत. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. पद्म पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी आणि सामाजिक कार्यातला सहभाग या दोन महत्वाच्या अटी या पुरस्कारासाठी टाकण्यात आल्या आहेत.

****



 तुर्कस्तान इथल्या अंतालिया इथं सुरु असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व प्रकारात कांस्य पदकासाठी भारतीय महिला संघाचा चीनी तैपेई संघाशी आज सामना होणार आहे. भारताच्या रिकर्व संघात दीपीका कुमारी, प्रोमीला डायमरी आणि अंकिता भगत यांचा समावेश आहे. कंपाऊंड प्रकारात काल भारतानं एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावलं. या गटात ज्योती सुरेख व्यन्नम, मुस्कान किरार आणि दीव्या धायल यांनी चीनी तैपेई संघाचा तीन गुणांनी पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात भारताच्या अभिषेक वर्मा आणि ज्योती यांच्या जोडीनं बेल्जिअमच्या जोडीला पराभूत केलं.

****



 केंद्र सरकारला आज चार वर्ष पूर्ण झाली, हा दिवस काँग्रेस पक्षातर्फे विश्वासघात दिवस म्हणून पाळण्यात येत असून, सरकारच्या निषेधात नंदुरबार इथं पक्षाच्या वतीनं रस्तारोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे धुळे चौफुली भागात वाहतूक ठप्प झाली होती. 

****

 पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात नाशिक शहर काँग्रेस कमिटी तर्फे आज केंद्र सरकार विरोधात विश्वासघात मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चारचाकी वाहन हातानं ओढून आणि मोटारसायकलची अंत्ययात्रा काढून आंदोलन केलं.

*****

***

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...