Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 27 May 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
राज्यातल्या
शेतकरी बांधवांनी फळे, भाजीपाल्यावर अनावश्यक कीटकनाशके आणि हार्मोन्सचा वापर टाळावा,
असं आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलं आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून
आलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्र्यांनी हे आवाहन केलं. किटकनाशकाच्या अतिवापरामुळे
मानवी आरोग्यास धोका निर्माण होतो आणि कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याचबरोबर
राज्यातल्या निर्यातक्षम फळे, भाजीपाला यांचा योग्य दर्जा राखणं आवश्यक आहे, अन्यथा
आयात करणाऱ्या देशांकडून प्रतिबंध लादले जातात, असंही फुंडकर यांनी सांगितलं.
****
माजी
मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडवे इथं उभारलेल्या
लाईफ टाइम रुग्णालयाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री चंद्रकात पाटील, विनोद तावडे,
राम शिंदे उपस्थित होते. कुडाळ तालुक्यात पडवे इथ ६५० खाटांचं अत्याधुनिक स्वरूपाचं
हे रुग्णालय उभारण्यात आल्यानं रुग्णसेवेचा गोव्यावरचा भार कमी होईल, असं मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले.
****
पालघर
आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. पालघरमध्ये शिवसेनेनं
दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना, तर भारतीय जनता पक्षानं
काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. तर भंडारा-गोंदियामधून
भाजपचे हेमंत पटले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मधुकर कुकडे यांच्यात लढत होणार आहे.
पोटनिवडणुकीसाठी दोन्ही ठिकाणी जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून, पालघरमध्ये दोन हजार
९७, तर भंडारा-गोंदिया मध्ये दोन हजार १४९ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, मतमोजणी
३१ मे रोजी होणार आहे.
****
भारतीय
जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटली तर पुढच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेवर
येईल, असं भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर
इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. उद्या होणाऱ्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चुकीचं राजकारण केलं असून, दोन्ही पक्षांमधल्या बिघडलेल्या
संबंधांना ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप पाटील यांनी केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
यशवंतराव
चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या अंतिम आणि सत्रनिहाय
परिक्षा सुरू असून, उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पालघर आणि भंडारा-गोंदिया
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात
आला असून, नवं वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जारी करण्यात येईल, असं परीक्षा
नियंत्रकांकडून सांगण्यात आलं आहे.
****
सहकार
क्षेत्रात नि:स्वार्थ भावनेनं आणि चिकाटीनं सेवा केल्यास सहकार क्षेत्र अधिक सक्षम
होईल, असं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी
इथं भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या २२ व्या शाखेचं उद्घाटन आज बागडे यांच्या हस्ते
झालं, त्यावेळी ते बोलत होते. सहकारी बँकांनी कर्ज देतांना काही महत्वाची पथ्यं पाळावीत,
तसंच कर्जदारांची पात्रता पाहूनच कर्जाचं वितरण केलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद
शहरातल्या सिडको चौकातल्या उड्डाणपुलाला आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव देण्यात
आलं आहे. महापालिकेत यासंदर्भातला ठराव पारीत करण्यात आला होता. खासदार चंद्रकांत खैरे,
महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, आमदार संजय सिरसाट आदींच्या उपस्थितीत आज
सकाळी हा सोहळा पार पडला.
दरम्यान,
या कार्यक्रमात राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलास हरितक्रांतीचे
प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं नाव देण्याची मागणी लावून धरत निदर्शने
केली. यावेळी पोलिसांनी तीसहून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.
****
राज्यात
काही ठिकाणी तापमानात वाढ कायम आहे, तर काही ठिकाणी पाऊस पडल्याचं वृत्त आहे. हिंगोली
जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. कान्हेगाव इथं वीज पडल्यानं
म्हैस दगावली, तर वसमत तालुक्यातल्या हयातनगर आणि परिसरात मध्यरात्री झालेल्या मुसळधार
पावसानं विजेचे खांब, झाडे पडली. घरावरील पत्रेही उडाल्यानं ग्रामस्थांचं मोठं नुकसान
झालं.
****
दरम्यान,
येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज
हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
इंडियन
प्रिमियर लीग या मर्यादित वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला अंतिम सामना
आज होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांदरम्यान मुंबईत इथं
हा अंतिम सामना खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment