Wednesday, 30 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.05.2018 06.50AM


 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 May 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मे २०१ सकाळी .५० मि.

*****



Ø प्रधानमंत्री मुद्रा योजनेत आतापार्यंत १२ कोटी युवकांना ६ लाख कोटी रूपये कर्ज वाटप

Ø  ६०० चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत निवासी बांधकामाला दंड माफ

Ø  भंडारा - गोंदिया लोकसभा मतदार संघातल्या ४९ मतदानकेंद्रांवर आज फेरमतदान

Ø  बारावीचा निकाल आज जाहीर होणार; सीबीएसईच्या दहावी परीक्षेत ८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

आणि

Ø  औरंगाबाद इथं ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून मागवलेली शस्त्र जप्त

****



 ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ जाहीर केल्यापासून बँका आणि वित्तीय संस्थांनी आतापार्यंत १२ कोटी युवकांना ६ लाख कोटी रूपये कर्जाचं वाटप केलं असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिली. १२ कोटी लाभार्थ्यांपैकी २८ टक्के म्हणजेचं ३ कोटी २५ लाख युवकांनी पहिल्यांदाच उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज घेतलं आहे. या लाभार्थ्यांमध्ये ७४ टक्के म्हणजेच ९ कोटी महिलांचा समावेश आहे. तर यातील ५५ टक्के लाभार्थी अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास वर्गातील असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. ८ एप्रिल २०१५ पासून सुरू झालेल्या योजनेतंर्गत विना सहकारी, सूक्ष्म, लघु उद्योगांच्या उभारणीसाठी १० लाख रूपयांचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे

****



 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं काल पुण्यात आगमन झालं. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी त्यांचं यावेळी स्वागत केलं. आज पुण्यात राष्ट्रीय छात्रसेनेचा दीक्षांत कार्यक्रम, मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण आदी कार्यक्रमांना राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत.

****



 राज्यातल्या महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, आणि औद्योगिक नगरी अधिनियमात अनधिकृत बांधकामासंदर्भातल्या शास्तीच्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमड बैठकीत घेण्यात आला. यानुसार आता ६०० चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामाला शास्ती माफ करण्यात आली असून, ६०१ ते १००० चौरस फुटाच्या निवासी बांधकामासाठी मालमत्ता कराच्या ५० टक्के इतकी शास्ती करण्यात आली आहे तर १००१ चौरस फुटापेक्षा अधिक निवासी बांधकामाला सध्याच्याच दरानं शास्ती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.



 अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातल्या दारिद्र्य रेषेखालील भूमिहिनांसाठी असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण तसंच स्वाभिमान योजनेअंतर्गत, जमीन खरेदीसाठी आर्थिक व्याप्तीत वाढ करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला. जिरायतीसाठी कमाल मर्यादा आता प्रति एकरी पाच लाख रूपये आणि बागायतीसाठी प्रतिएकरी आठ लाख रूपये एवढी करण्यात आली आहे.



 नैसर्गिक आपत्तीत तत्काळ मदतीसाठी कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा, तसंच नागरी स्वराज्य संस्थांमधील अन्न निरीक्षकांची ३३ पदं आता अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून अन्न-औषधी प्रशासनाकडे देण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.



राज्यातल्या ग्राहकांच्या हितासाठी स्वस्त धान्य दुकानातून तूर डाळ ३५ रूपये प्रतिकिलो या दरानं विक्री करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

****



 राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटीच्या शिवशाही या वातानुकुलित बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. परवा एक जूनपासून ही सवलत लागू होईल. शिवशाहीच्या आसन बसमध्ये ज्येष्ठांना प्रवास भाड्याच्या ४५ टक्के तर शयनयान बसमध्ये ३० टक्के सवलत असेल. सध्या एसटीच्या साध्या, रातराणी तसंच निमआराम बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत मिळते.

****



 लोकसभेच्या भंडारा - गोंदिया  मतदार संघातल्या ४९ मतदानकेंद्रांवर आज फेरमतदान घेण्यात येणार आहे. परवा झालेल्या मतदानावेळी या मतदानकेंद्रांवरची मतदानयंत्र बंद पडल्याच्या तक्रारीनंतर हे फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला. फेरमतदान असणाऱ्या क्षेत्रात मतदान करण्यासाठी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.



 दरम्यान, गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात आली आहे. काळे हे भंडारा गोंदिया मतदार संघाचे जिल्हा निवडणूक अधिकारी होते. त्यांच्या जागी नागपूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी भगत बलकवडे यांची जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

****



 राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. मंडळाचे प्रभारी सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी काल ही माहिती दिली. राज्य मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. एकूण १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. हा निकाल मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र एज्युकेशन डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळासह इतरही सहा संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.



 दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ -सीबीएसईचा इयत्ता दहावीचा निकाल काल दुपारी जाहीर करण्यात आला. यंदा ८६ पूर्णांक सात टक्के इतका निकाल लागला असून एकूण चार विद्यार्थ्यांनी देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. या चौघांनाही ५०० पैकी ४९९ गुण मिळाले आहेत.

*****



हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



पावसाळ्यातल्या संभाव्य आपत्ती आणि अडचणींना तोंड देण्यासाठी शासनाच्या विविध यंत्रणांनी या काळात अधिक समन्वय ठेवून अडचणींवर मात करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि पावसाळा पूर्वतयारी बाबत आढावा बैठक काल मुंबईत झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुंबई महापलिका, हवामान विभाग, भारतीय सेना, भारतीय वायू सेना, भारतीय नौसेना त्याचबरोबर राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रात आपत्ती निवारणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली.

****



महिला आणि बालकांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं शासन, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजानं एकत्र येऊन काम करणं गरजेचं असल्याचं मत महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत काल मुंबईत ‘भारतातील मुलींचे जग - सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मुलींच्या सुरक्षेबद्दल अभ्यास’ या अहवालाचं प्रकाशन मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. मुलींवर होणारा अत्याचार रोखणं ही काळाची गरज असून घरगुती हिंसाचार, लैंगिक शोषण अशा गैरप्रकारांना अनेक ठिकाणी लहान मुलंही बळी पडतात, याचा गांभीर्याने विचार करावा लागेल, असंही मुंडे यावेळी म्हणाल्या.

****



औरंगाबाद शहरात काल एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा मारून ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून मागवलेली शस्त्र जप्त केली. शहरात नुकत्याच घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर ही शस्त्रं मागवण्यात आली असल्याचं पोलिसांचा कयास आहे. या शस्त्रांमध्ये तलवार, चाकूसह इतर २८ शस्त्रांचा समावेश आहे. याप्रकरणात कुरिअर कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.



दरम्यान, काल औरंगाबाद पोलीस आयुक्त पदाचा पदभार चिरंजीव प्रसाद यांनी स्वीकारला. शहरातील धार्मिक सलोखा कायम राखण्यावर आपला भर राहणार असल्याचं, त्यांनी यावेळी सांगितलं.

****



खगोलशास्त्रानुसार अवकाशातली गणितं भारतात, पंचागाद्वारे पूर्वापार केली जात असल्याचं, खगोल शास्त्राचे अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशन संस्थेच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राच्या वतीनं आयोजित व्याख्यानात बोलत होते. खगोलीय घटनांबद्दल अंधश्रध्दा न बाळगता त्या प्रत्यक्षात अनुभवण्याचं आवाहन त्यांनी केलं.

****



जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अंबड तालुक्यातल्या रोहिलागड इथल्या मंडळ अधिकाऱ्यास आठ हजार रूपयांची लाच घेताना काल रंगेहाथ अटक केली. विष्णू जायभाये, असं या अधिकाऱ्याचं नाव असून, वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी त्यानं लाचेची मागणी केली होती.

****



परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात अवैध वाळू उपसा प्रकरणी जिल्हाधिकारी पी. रविशंकर यांनी काल थेट कारवाई केली. वाळूचा उपसा आणि वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर या कारवाईत जप्त करण्यात आले.

****



एक जून रोजी होणाऱ्या शेतकरी संपाला शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीचा विरोध असल्याची माहिती समितीच्यावतीनं देण्यात आली. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची राज्यस्तरीय बैठक काल औरंगाबाद इथं झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. समितीतर्फे १२ जून रोजी मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सुभाष लोमटे यांनी दिली.

****



जालना जिल्ह्यातल्या गोलापांगरी, आलंमगाव, परिसरात काल दुपारी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात झाडे उन्मळून पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



अखिल भारतीय छावा संघटनेचं अकरावं अधिवेशन काल औरंगाबाद इथं घेण्यात आलं. मराठा समाजाला त्वरित आरक्षण, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतीपंपांना मोफत वीज, आदी ठराव यावेळी मंजूर करण्यात आले.

*****

***

No comments: