Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 26 May 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
मोदी
सरकारनं देशाला एक स्थीर, पारदर्शक आणि विश्वासार्ह सरकार दिलं असल्याचं भाजपचे राष्ट्रीय
अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारच्या गेल्या चार वर्षातल्या विकास कामांची
माहिती देण्यासाठी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी घराणेशाही, जातीयवादी आणि तुष्टीकरणाचे राजकारण संपवत देशाला काम
करणारं सरकार दिलं असल्याचं ते म्हणाले. भाजपनं देशाला जगातला सर्वाधिक लोकप्रिय आणि
सर्वाधिक मेहनती असा पंतप्रधान दिला असल्याचं शाह यांनी यावेळी नमूद केलं. राष्ट्रीय
लोकशाही आघाडी सरकारनं महागाईवर नियंत्रण मिळवलं असून भारत ही जगातली पाचवी सर्वात
मोठी अर्थव्यवस्था बनली असल्याचंही ते म्हणाले. सरकारनं निर्धारीत वेळेअगोदर सर्व खेड्यांमध्ये
वीज पोहोचवली असल्याचं शहा यांनी सांगितलं.
****
भाजप
सरकारच्या चार वर्षांच्या काळात सर्वात जास्त जवानांचा मृत्यू झाला असल्याची टीका,
ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. नवी दिल्ली इथं आज पक्षाच्या
कार्यकर्त्यांच्या संमेलनात ते बोलत होते. याच काळात जम्मू काश्मीरमध्ये सीमेपलिकडून
सगळयात जास्त वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं, आणि जास्त नागरिक मारले गेले, असं ते
म्हणाले. काळा पैसा देशात परत आणण्याचं वचनही सरकारनं पूर्ण केलं नसल्याचा आरोप करत
आझाद यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.
****
दरम्यान,
नांदेड इथं काँग्रेस पक्षानं केंद्र सरकारनं जनतेचा विश्वासघात केला असा आरोप करत,
आज मूक मोर्चा काढला. शहरातल्या महात्मा फुले पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी
कार्यालयावर गेला, त्याठिकाणी निवासी जिल्हाधिकारी जयराज कारभारी यांना मागण्यांचं
निवेदन देण्यात आलं. आमदार डी पी सावंत, अमरनाथ राजुरकर, महापौर शिला भवरे यांच्यासह
कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले होते.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळानं २०१८ मधील १२ वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. नोएडाच्या
मेघना श्रीवास्तव हिने ५०० पैकी ४९९ गुण मिळवत देशाभरातून पहिला क्रमांक पटकावला. देशाभरातून
एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाणात एका टक्क्यानं वाढून हे प्रमाण ८३ दशांश शून्य
एक टक्के एवढं झालं आहे. विद्यार्थी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी बी एस ई रिझर्ल्ट
डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर निकाल बघू शकतात.
****
डिझेलचे
वाढते दर आणि एसटी महामंडळाचं होणारं नुकसान यामुळे एसटीची भाडेवाढ अटळ असल्याचं परिवहन
मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक
कार्यालयासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या गार्डनचा शुभारंभ रावते यांच्या हस्ते
करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जुनच्या पहिल्या आठवड्यात भाडेवाढीबाबत निर्णय
घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या तीन महिन्यात डिझेल दरवाढीनं एसटी
महामंडळाला ४७० कोटी रुपयांचा अतिरिक्त फटका बसला असून, तिकीट दरवाढ केल्याशिवाय एसटीला
पर्याय नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.
****
दरम्यान,
रावते यांनी आज औरंगाबाद शहरात दंगल झालेल्या भागाची पाहणी केली. ही अतिशय गंभीर घटना
असून, दंगल पूर्वनियोजीत असल्याचं ते म्हणाले. यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांची भेट
घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भंडारा-गोंदिया
लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीच्या तोंडावर संकटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची
रक्कम देऊन राज्यातल्या भाजपाप्रणित आघाडी सरकारनं निवडणूक आचारसंहितेचा भंग केला आहे,
असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. सरकारच्या या अर्थसहाय्य योजनेवर स्थगिती
आणण्याची मागणी आपल्या पक्षानं निवडणूक आयोगाकडे केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते
नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा ४४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून
सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल.
****
देशातल्या
गरीब जनतेला अत्यल्प दरात अपघात विमा देणाऱ्या ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत’
महाराष्ट्रातल्या उद्दिष्टित १९२ खेड्यांमध्ये ४५ हजार ११५ विमा धारकांची नोंद झाली
आहे. देशातल्या गोर-गरीब जनतेला सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं
पाऊल मानली जाणारी ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ १ जून २०१५ पासून सुरु करण्यात
आली आहे.
****
अलिबाग
नजीकच्या नागाव इथल्या समुद्रात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला. आज पहाटे ही दुर्घटना
घडली. मृत तिघे नवी मुंबईतल्या कोपरखैरणे इथले रहिवासी आहेत. दोन जणांचे मृतदेह सापडले
असून, तिसऱ्या मृतदेहाचा शोध घेतला जात असल्याचं अलिबागचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे
यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment