Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 24 May 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
नेदरलँड
हा भारतात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक करणारा पाचवा देश बनला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट भारत दौऱ्यावर असून, उभय नेत्यांदरम्यान
आज नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. भारतीय
कंपन्यांना गुंतवणूक करण्यासाठी नेदरलँड योग्य स्थळ असल्याचंही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
आर्थिक सुधारणांच्या दिशेनं भारताची बांधिलकी मजबूत राहील, असंही त्यांनी नमूद केलं.
दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाले असल्याचं पंतप्रधान रूट यावेळी म्हणाले.
****
समाजविघातक
गोष्टींना प्रतिबंध घालण्यासाठी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन, संरक्षण
देण्यासंदर्भात नवीन कायदा तयार करण्यात येत असल्याचं आंतरजातीय विवाह कायदा प्रारूप
समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे सदस्य सी.एल.थूल
यांनी म्हटलं आहे. सांगली इथं आज थूल यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या
जोडप्यांशी संवाद साधला, तसंच यासंदर्भात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी,
विविध कार्यकर्त्यांचे अनुभव, समस्या, तक्रारी, सूचना, वस्तुस्थितीही जाणून घेतली.
****
स्थानिक
स्वराज्य संस्थांमधून राज्य विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा पैकी पाच जागांसाठीची
मतमोजणी आज झाली असून, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनं प्रत्येकी दोन, तर राष्ट्रवादी
काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला. परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे
विप्लव बाजोरिया, नाशिक शिवसेनेचे नरेंद्र दराडे, अमरावती भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे,
चंद्रपूर भाजपाचे रामदास आंबटकर, तर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकण विधान परिषद निवडणुकीत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे विजयी झाले. उस्मानाबाद-लातूर-बीड या मतदार संघाच्या
निवडणुकीची मतमोजणी निवडणूक आयोगानं पुढे ढकलली आहे.
****
पेट्रोल
डिझेलच्या वाढत्या दरवाढीच्या निषेधार्थ औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आज
सायकल फेरी काढण्यात आली. शहरातल्या पैठण गेट ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत सायकल
फेरी काढून, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांना इंधन दरवाढीच्या निषेधाचं निवेदन
देण्यात आलं.
मुंबईतही
काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.
नंदुरबार
जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीनंही सायकल रॅलीद्वारे निषेध आंदोलन करण्यात आलं. इंधनाच्या
वाढत्या किमतीनं जनता त्रस्त झाली असतांना केंद्र आणि राज्यातलं सरकार मात्र शांत बसलं
असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
बुलडाणा
शहरातही काँग्रेसतर्फे दुचाकींची अंत्ययात्रा काढून आंदोलन करण्यात आलं.
****
औरंगाबादचे
माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एच.एस.महाजन
यांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. शहरात उसळलेल्या दंगल
प्रकरणातल्या दोघांना जामिनावर सोडण्याची मागणी करत जैस्वाल यांनी क्रांती चौक पोलीस
ठाण्यात गोंधळ घालत शासकीय कामात अडथळा आणत शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्याचा त्यांच्यावर
आरोप होता.
****
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागात राज्यपालांच्या चान्सलर्स
ब्रिगेडच्या आव्हान २०१८ या १० दिवसीय राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचं
आयोजन करण्यात आलं आहे. यात राज्यातल्या प्रमुख १४ विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रांतून
३६ जिल्ह्यांतल्या ७२ संघप्रमुख आणि १२०६ स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी
केली असल्याचं कुलगुरू प्रोफेसर बी.ए.चोपडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. शिबिराचं
उद्घाटन उद्या दुपारी चार वाजता खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या
नाट्यगृहात होणार आहे. तीन जूनपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात स्वयंसेवकांना पुण्याच्या
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बलाचे ४८ अधिकारी प्रशिक्षण देणार आहेत.
****
खरीप
हंगामात कापूस लागवडीचा अंदाज घेऊन धुळे जिल्ह्यासाठी कापूस बियाण्यांच्या आठ लाख ४०
हजार पाकिटांची मागणी कृषी विभागानं शासनाकडे केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात
एक लाख ७५ हजार पाकिटांचा पुरवठा झाला आहे. रविवारपासून कापूस बियाण्यांची जिल्ह्यात
विक्री सुरु झाली आहे. यावर्षी दोन लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होईल,
असा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार मागणी केलेलं संपूर्ण बी.टी.बियाणं १० जूनपर्यंत
उपलब्ध होणार आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या रविवारी २७ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४४ वा भाग असेल.
****
No comments:
Post a Comment