Thursday, 31 May 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.05.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 31 May 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

वसतिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रत्येकी १५ किलो धान्य देणार असल्याचं अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं आहे. नवी दिल्ली इथं आज राज्यांच्या अन्न सचिवांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. ज्या वसतिगृहात अनुसूचित जाती जमातीचे दोन तृतीयांश विद्यार्थी आहेत, त्यांना सगळ्यांना सवलतीच्या दरात धान्य मिळणार असल्याचं ते म्हणाले. भीक मागणाऱ्यांचं आश्रयगृह आणि नारीनिकेतन सारख्या कल्याणकारी संस्थामंध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीची व्यवस्था नसून, यासाठी सरकारनं धान्याच्या अतिरिक्त वितरणासाठी असलेल्या योजनेला अधिक विस्तृत बनवलं असल्याचं पासवान यांनी सांगितलं.

****

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र गावित विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा २९ हजार ५७२ मतांनी पराभव केला. तर भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.

****

निवडणूक यंत्रणा भ्रष्ट असल्याचं मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला, त्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. निवडणूक आयुक्त हे सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं बनलं असल्याची टीका त्यांनी केली. सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात गुन्हा दाखल करावा, असंही ते म्हणाले. गेल्या निवडणुकीत भाजपनं मोठ्या मताधिक्यानं जिंकलेली पालघरची जागा आज काही हजारांच्या फरकानं जिंकली, यावरून भारतीय जनता पक्षाचा जनाधार घटला असल्याचं, ते म्हणाले.

****

राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाबद्दल राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी दुःख व्यक्त केलं आहे. फुंडकर यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चांगली जाण होती आणि त्या प्रश्नांच्या सोडवणुकीची प्रामाणिक इच्छा होती. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रानं एक उत्तम संसदपटू गमावला असल्याचं सांगून, राज्यपालांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही फुंडकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. फुंडकर यांच्या पार्थिव देहावर उद्या बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी, तर जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

औरंगाबाद जिल्हा परिषदेतही अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलं.

****

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम सुरु असताना, धनगर आरक्षणाच्या मागणीसंबंधी घोषणा देणारे बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ.इंद्रकुमार भिसे यांना पोलिसांनी अटक केली. धनगर आरक्षणाच्या मागणीवरुन या कार्यक्रमात आज गोंधळ घालत बहुजन एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली, यावेळी पोलिस जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जालना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं जिल्ह्यातल्या १४ रुग्णालयांना नियमाचं उल्लंघन केल्यामुळे नोटीस बजावली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक एम.के.राठोड यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं जिल्ह्यातली ३५० रुग्णालयं आणि सोनोग्राफी केंद्रांची पाहणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अचानक या रुग्णालयांची तपासणी केल्यानंतर त्याठिकाणी कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आल्याचं राठोड यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला बोलताना सांगितलं.

****

जागतिक तंबाखू विरोधी दिन आज सर्वत्र पाळण्यात आला. त्यानिमित्त औरंगाबाद जिल्हा परिषदेत तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी पोस्टर प्रदर्शनाद्वारे जनजागृती करण्यात आली. तरुणांनी तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहून दुसऱ्यांनाही या सवयींपासून दूर करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी व्यक्त केलं.

****

बीड इथं शिवसंग्राम संघटनेच्या वतीनं बिंदुसरा नदी पात्रात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. पात्रातली घाण, तसंच कचरा काढून पात्र स्वच्छ करण्यात आलं. या अभियानात शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्यासह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...