Monday, 28 May 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 28.05.2018 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 28 May 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातल्या कोणत्याही मतदान केंद्रावरचं मतदान रद्द करण्यात आलेलं नाही, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. या मतदार संघातली २५ टक्के मतदान यंत्रं खराब असल्याचं, तसंच ३५ केंद्रांवरचं मतदान रद्द केल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्यांवरून आज दिवसभरात प्रसारित करण्यात आलं, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आयोगानं म्हटलं आहे. बिघडलेलं मतदान यंत्र साधारणत: अर्ध्या तासात बदललं जातं, आणि यामुळे मतदानाच्या विश्वासार्हतेवर शंका घेता येत नाही, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे.

भंडारा-गोंदिया तसंच पालघर लोकसभा मतदार संघात आज मतदान झालं, या दोन्ही मतदार संघात अनेक ठिकाणी मतदान यंत्रं बिघडल्याच्या तक्रारी आल्या होत्या, या सर्व ठिकाणची मतदान यंत्र बदलून काही वेळातच मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.



मात्र, ज्या ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाला, तिथे परत मतदान घेण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.



दरम्यान, भंडारा गोंदिया मतदार संघात दुपारी चार वाजेपर्यंत ३१ टक्के, पालघरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत २८ पूर्णांक २२ टक्के, मतदान झाल्याचं वृत्त आहे.

 ****

देशात उद्भवलेल्या कृषी संकटावर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीनं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. समितीच्या १७ सदस्यांनी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन आपल्या मागणीचं लेखी निवेदन राष्ट्रपतींना सादर केलं. या मागणीवर प्राध्यान्यानं विचार करण्याचं आश्वासन राष्ट्रपतींनी दिल्याचं समितीच्या सदस्यांनी सांगितलं.

****

राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी १६० ठिकाणी स्वच्छतागृहं उभारली जाणार आहेत. सार्वजानिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या शिष्टमंडळानं आज मुंबईत पाटील यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. गुगल मॅपसारख्या अॅपवर या स्वच्छतागृहांची माहिती उपलब्ध करुन देण्यात येईल, तसंच स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स व्हेडिंग मशिन आणि सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनेटर उपलब्ध करुन देण्यात येईल, असं आश्वासनही पाटील यांनी यावेळी दिलं.

****

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी, तर जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी पी एल सोरमारे यांनी सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

****

जळगाव जिल्ह्यात अमळनेर इथं कृषी विभागानं सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचं बोगस बियाणं जप्त केलं. चोपडा मार्गावर केलेल्या या कारवाईत चार संशयितांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

****

पेट्रोल आणि डीझेलच्या वाढत्या दरवाढी विरोधात औरंगाबाद इथं आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं अर्धनग्न आंदोलन केलं. ही दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

****

लातूर जिल्ह्यातल्या चाकूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आज निवडणूक घेण्यात आली, भारतीय जनता पक्षाच्या रुपाली पवार यांची नगराध्यक्षपदासाठी निवड झाली, तर उपनगराध्यक्षपदी नितीन रेडी निवडून आले.

****

औरंगाबाद पोलिस आयुक्त पदी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक चिरंजीव प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ – सीबीएसईचा इयत्ता दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या संध्याकाळी चार वाजता मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी बी एस ई डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

****

लातूर जिल्ह्यात राबवल्या जात असलेल्या इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानात नागरिकांच्या मदतीसाठी इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान कक्ष उभारण्यात आला आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते आज या कक्षाचं उद्घाटन झालं.

****

औरंगाबादच्या शासकीय कर्करोग रुग्णालयातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन पुकारलं होतं. तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्यानं पुकारलेलं हे आंदोलन, रुग्णालयाच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आलं.

//*********//

No comments: