Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 23 May 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ मे
२०१८ सकाळी ६.५० मि.
*****
Ø निमलष्करी
दलातला सैनिक कर्तव्य
बजावताना हुतात्मा झाल्यास,
कुटुंबाला एक कोटी रुपये अर्थसहाय्य - केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची घोषणा
Ø विमान प्रवासासंबंधीचे नवीन
नियम जारी
Ø अन्याय्य कर लादल्यामुळे इंधनाच्या किंमती उच्चांकी
पातळीवर - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक
चव्हाण यांची टीका
आणि
Ø सौभाग्य योजनेंतर्गत आतापर्यंत मराठवाड्यात ३९ खेड्यात
२ हजार ९३८ घरांना वीज जोडणी
*****
निमलष्करी
दलातला सैनिक कर्तव्य
बजावताना हुतात्मा झाल्यास,
त्याच्या कुटुंबाला किमान एक कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय
गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केली आहे. काल नवी दिल्ली इथं, सीमा
सुरक्षा दलाच्या कार्यक्रमात, ते
बोलत होते. देशासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या
जवानांच्या कुटुंबाची आबाळ होता कामा नये असं ते म्हणाले. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना, यावेळी सिंह
यांच्याहस्ते शौर्य
पुरस्कार आणि पदकं ही प्रदान करण्यात
आली.
****
नागरी
विमान वाहतूक मंत्रालयानं काल
विमान प्रवासासंबंधी नवीन नियम जारी
केले. विमान कंपन्यांकडून एखाद्या वेळी उड्डाण
रद्द करण्यात आलं, तर प्रवाशांना त्याचा मोबदला दिला जाईल. विमाना उड्डाणाला चार तासांपेक्षा जास्त उशीर होत असल्यास,
प्रवासी, तिकिटाचे पूर्ण पैसे परत घेऊ शकतात.
विमानाचं आरक्षित तिकीट २४ तासांच्या आत रद्द केल्यास, कोणतंही शुल्क आकारलं जाणार
नाही. दिव्यांग प्रवाशांसाठी वेगळ्या जागा
आरक्षित ठेवण्याचाही प्रस्ताव असून, पुढच्या दोन महिन्यात हे नियम लागू करण्याचा सरकारचा विचार
असल्याचं, नागरी विमान
वाहतुक मंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितलं. डिजी यात्रा या नवीन सुविधेच्या माध्यमातून
देशांतर्गत विमान प्रवास अधिक सुलभ आणि कागदविरहित करण्याचा मानस असल्याचं ते म्हणाले.
****
केरळमध्ये उद्भवलेल्या निपाह
विषाणुच्या आजारासारखा एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलेला नसून याबाबत घाबरण्यासारखी
परिस्थिती नाही, असं सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी म्हटलं आहे.
खबरदारीचे उपाय म्हणून सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालयांना सूचित केलं आहे. या
आजारासारखी लक्षणं आढळल्यास रुग्णांनी तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधावा, असं सावंत यांनी म्हटलं आहे.
****
महागाई
कमी करण्याचं आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारनं पेट्रोल आणि डिझेल वर
अन्याय्य कर लादल्यामुळे देशात इंधनाच्या किंमती उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत, अशी
टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. मुंबईत काल
प्रदेश काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात चव्हाण यांनी, केंद्र
आणि राज्य सरकारनं पेट्रोल, डिझेलवरचे कर आणि अधिभार रद्द करून इंधन विक्रीला वस्तू
आणि सेवा कर - जीएसटीच्या कक्षेत आणावं, अशी मागणी केली.
औरंगाबाद
इथं इंधन दरवाढीचा पेढे वाटून उपरोधक निषेध करण्यात आला. काल
दुपारी शहरातल्या क्रांती चौकातल्या पेट्रोल पंपावर अखिल भारतीय
विद्यार्थी परिषदेच्या औरंगाबाद जिल्हा शाखेच्या वतीनं हे अनोखं
आंदोलन करण्यात आलं.
दरम्यान, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती नियंत्रणात
आणण्यासाठी अर्थमंत्रालय, पेट्रोलियम मंत्र्यालयाशी चर्चा करत असल्याचं वृत्त आहे.
अबकारी करासह इतर बाबींचा विचार करून आठवड्याभरात
यावर निर्णय होण्याची शक्यता या बाबतच्या वृत्तात वर्तवण्यात आली आहे.
****
मुद्रा योजनेत छोट्या उद्योजकांना
कर्ज पुरवठा करण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं फ्लिपकार्ट, स्वीगी, पतंजली
आणि अमूलसह ४० कंपन्यांबरोबर करार केला आहे. प्रधानमंत्री
मुद्रा योजनेत ज्या लोकांना कर्ज देता येईल, अशांची निवड
करण्यासाठी मंत्रालयाच्या वतीनं आज मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
कृषी तंत्रज्ञान पदविका हा तीन वर्षांचा
अभ्यासक्रम बंद करण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करून, कुलगुरूंवर तत्काळ कारवाई करण्याची
मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषीमंत्र्यांकडे केली
आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार असल्याचं, विखे
पाटील यांनी कृषीमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
काँग्रेसच्या
हिमाचल प्रदेश प्रभारी म्हणून राज्यसभेच्या माजी खासदार रजनी पाटील यांची नियुक्ती
करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही नियुक्ती केली
आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद जालना महामार्गावर करमाड जवळील सटाणा फाट्यावर
ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. काल
पहाटे हा अपघात झाला. भरधाव कार प्रथम कार दुभाजकाला धडकून विरुद्ध बाजूनं येणाऱ्या
ट्रकवर धडकल्यानं हा अपघात घडला.
****
प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर
डी व्ही कुर्डूकर यांचं काल रात्री सोलापूर इथं निधन झालं, ते ६० वर्षांचे होते. सोलापूरच्या
व्ही.एम.वैद्यकीय महाविद्यालयात स्त्री रोग आणि प्रसूती शास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून
कार्यरत असलेले डॉ कुर्डूकर, गेल्या काही काळापासून कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या
पार्थिव देहावर आज दुपारी सोलापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य योजनेंतर्गत
आतापर्यंत मराठवाड्यात २ हजार ९३८ घरांना वीज जोडणी झाली असून नांदेड जिल्ह्यात सर्वात
जास्त २० खेड्यातल्या १ हजार २१७ घरांना वीज पुरवण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात
एका खेड्यातल्या ७२ घरांना, बीड जिल्ह्यात ३ खेड्यांतल्या १५७ घरांना, हिंगोली जिल्ह्यात
५ खेड्यांतल्या ४८० घरांना, लातूर जिल्ह्यात ७ खेड्यांतल्या ३४९ घरांना, उस्मानाबाद
जिल्ह्यात २ खेड्यांतल्या ७८ घरांना आणि जालना जिल्ह्यात एका खेडयातल्या १८१ घरांना
वीज जोडणी देण्यात आली आहे.
****
लातूर
पाटबंधारे विभागांतर्गत मांजरा, निम्न तेरणा प्रकल्पांवरच्या जलाशयात उजव्या आणि डावा
कालव्याद्वारे सिंचनासाठी पाण्याचं आवर्तन चालू करण्यात आलं आहे. त्यामुळे स्थानिक
नागरिकांना कालव्यामध्ये जाण्यास, पोहण्यास
बंदी घालण्यात आली आहे. पाण्यात प्रवेश करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा
इशारा पाटबंधारे विभागानं दिला आहे.
****
बीड
जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना त्यांच्या मागणीनुसार त्वरित
लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या
सूचना बीडचे अपर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांनी दिल्या आहेत. शेतकरी आत्महत्यांबाबत
जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आत्महत्याग्रस्त
शेतकरी कुटुंबांच्या समस्या जाणून घेतल्या.
****
नांदेड
जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या कलंबर खुर्द इथल्या ग्रामस्थांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर
कप स्पर्धेत श्रमदान करुन गावाचा कायापालट केल्याचं जिल्हा परिषद सदस्या प्रणिता देवरे
चिखलीकर यांनी म्हटलं आहे. ४५ दिवस चाललेल्या या स्पर्धेचा काल
समारोप करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. या स्पर्धेत मोठ्या
संख्येनं सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांनी महिलांचा सत्कार केला.
****
लातूर
महापालिकेच्या कारभारावर कॉंग्रेसचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी नाराजी व्यक्त
केली आहे. महापौरांना कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही, त्यामुळे महापौर - उपमहापौरांनी
नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे द्यावेत, अशी मागणी गोजमगुंडे यांनी केली. पालकमंत्री
संभाजी पाटील निलंगेकर यांची जिल्ह्यात एकाधिकार शाही सुरू असून, याला भाजपचे अनेक
नगरसेवक कंटाळले असल्याची टीका गोजमगुंडे यांनी केली आहे.
****
औरंगाबाद
शहरातल्या बलवंत वाचनालयातर्फे काल
ग्रंथालयीन पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी
ग्रंथालयीन अभिलेखे - लेखा परिक्षण आणि शासकीय योजना संबंधीच्या महिती विषयक
जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद
विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक अ. मा. गाडेकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. यावेळी
संबंधित विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं.
****
लातूर जिल्हा बाजार समितीच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी ‘अल्पदरात पोटभर
जेवण’ हा अभिनव उपक्रम येत्या शुक्रवार पासून राबवण्यात येणार आहे. लातूर सह परिसरातील जिल्हे तसंच
कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या शेजारील राज्यातील शेतकरीही आपला माल विक्रीसाठी
लातूर इथं घेऊन येतात. या
शेतकऱ्यांना केवळ पाच रुपयांमध्ये पोटभर जेवण
दिले जाणार आहे.
****
नैऋत्य अरबी समुद्राकडे कमी दाबाचा
पट्टा निर्माण झाला असून, तो वेगानं वायव्य दिशेकडे सरकत असल्याचं पुणे वेधशाळेनं
कळवलं आहे. विदर्भामध्ये या काळात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. नाशिक, जळगाव, परभणी, नांदेड
आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहील, दक्षिण-मध्य
महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल, असा
अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment