Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 31 May 2018
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
३१ मे २०१८
सकाळी ६.५०
मि.
*****
Ø देशासाठी समर्पण आणि उत्कृष्टता याबाबतीत, एनडीएचे प्रशिक्षणार्थी,
देशभरातल्या युवकांसाठी आदर्श - राष्ट्रपतींचं प्रतिपादन
Ø पीक
विम्याची रक्कम येत्या सात जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दक्षता घ्यावी- मुख्यमंत्र्यांचे विमा कंपन्यांना निर्देश
Ø सोलापूर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त
Ø बारावीचा निकाल जाहीर; औरंगाबाद विभागाचा चौथा तर लातूर
विभागाचा पाचवा क्रमांक
आणि
Ø बँक कर्मचारी संपामुळे मराठवाड्यातल्या बँकिंग सेवा प्रभावित
*****
देशासाठी समर्पण आणि उत्कृष्टता याबाबतीत, राष्ट्रीय
संरक्षण अकादमीचे प्रशिक्षणार्थी, देशभरातल्या युवकांचे आदर्श बनले आहेत, असं प्रतिपादन
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी - एनडीए च्या एकशे
चौतीसाव्या तुकडीच्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. यावेळी सर्वश्रेष्ठ प्रशिक्षणार्थी
साठींची राष्ट्रपती पदकंही प्रदान करण्यात आली.
काल आपल्या पुणे दौऱ्यात राष्ट्रपतींनी, पुणे महानगरपालिकेच्या
मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानात, रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण
केलं. रमाबाई आंबेडकर यांच्या जीवन चरित्रातून प्रत्येक भारतीय महिलेनं प्रेरणा घ्यावी,
असं आवाहन, राष्ट्रपतींनी यावेळी केलं. दरम्यान, साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे उद्धघाटन
राष्ट्रपतींच्या हस्ते काल करण्यात आलं.
****
पीक
विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या सात जूनपूर्वी जमा होईल, याची दक्षता
विमा कंपन्यांनी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. प्रधानमंत्री
पीक विमा योजनेसंदर्भातल्या एका आढावा बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते. येत्या खरीप
हंगामासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली असून, शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यासाठी,
विमा कंपन्या आणि बॅंकांनी, एकत्रितपणे प्रयत्न करावेत, तसंच, शेतकऱ्यांनीही दिलेल्या
मुदतीत योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करावेत, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी
केलं.
****
राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी होईपर्यंत सरकारनं
हमीभाव खरेदी केंद्रं सुरू ठेवावीत आणि या योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विधान
परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. सध्या हजारो शेतकऱ्यांचा हरभरा,
नोंदणी करूनही खरेदी अभावी पडून असल्याकडे मुंडे यांनी लक्ष वेधलं.
****
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या शिफारशीनुसार
सरकारनं ही कारवाई केली. सोलापूरचे उपनिबंधक अविनाश देशमुख यांची बँकेचे प्रशासक म्हणून
नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी काल पदभार स्वीकारला. बँकेकडे तारण मालमत्ता आणि
कर्जवाटप यात तफावत आढळल्यानंतर, कामकाज सुधारण्याचे निर्देश राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण
विकास बँक - नाबार्डनं दिले होते. मात्र सुधारणा न झाल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचं,
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला.
यंदा राज्यातून ८८ पूर्णांक ४१ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, गेल्या
वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे दोन टक्क्यांनी कमी आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल
८८ पूर्णांक ७४ टक्के तर लातूर विभागाचा निकाल ८८ पूर्णांक ३१ टक्के इतका लागला आहे.
मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, नांदेड
आणि लातूर जिल्ह्यांचा निकाल सरासरी ८९ टक्के लागला असून, परभणी ९० टक्के, जालना ८७
टक्के, हिंगोली ८६ टक्के, तर उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल ८३ पूर्णांक ६४ शतांश टक्के एवढा लागला आहे.
उत्तीर्ण होणाऱ्या एकूण परीक्षार्थींमध्ये
मुलींचं प्रमाण ९२ पूर्णांक ३६ शतांश टक्के तर मुलांचं प्रमाण ८५ पूर्णांक २३ शतांश
टक्के, इतकं आहे.
****
राज्य लोकसेवा आयोगानं सप्टेंबर २०१७
मध्ये घेतलेल्या परीक्षेत जळगाव जिल्ह्यातले रोहितकुमार राजपूत यांनी राज्यात प्रथम
क्रमांक पटकावला आहे. मागासवर्गीयातून सोलापूर इथले अजयकुमार नष्टे तर महिलांमधून पुणे
जिल्ह्यातल्या रोहिणी नऱ्हे यांनी पहिला क्रमांक मिळवला. औरंगाबाद जिल्ह्यातले दत्तू
शेवाळ राज्यातून पाचव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले. या सर्वांची उपजिल्हाधिकारी पदासाठी
निवड झाली असून, औरंगाबादचे सुदर्शन राठोड यांची पोलीस उपाधीक्षकपदी निवड झाली आहे.
****
लोकसभेच्या भंडारा-गोंदिया
तसंच पालघर मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी आज होणार आहे. गेल्या
सोमवारी, झालेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान, भंडारा-गोंदिया मतदार संघात अनेक ठिकाणी
मतदान यंत्रं बंद पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या, त्यानंतर काल या मतदार संघात ४९
ठिकाणी फेरमतदान घेण्यात आलं, या
मतदान केंद्रांवर सुमारे ४९ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे.
*****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
देशभरातल्या सुमारे दहा लाख बँक कर्मचाऱ्यांनी, अत्यल्प
पगारवाढीच्या निषेधार्थ कालपासून दोन दिवसीय संप पुकारला आहे. यामध्ये एकवीस सार्वजनिक,
तेरा जुन्या खाजगी, सहा परदेशी आणि छप्पन्न प्रादेशिक ग्रामीण बँकांमधल्या कर्मचाऱ्यांचा
समावेश आहे.
राज्यभरातले सुमारे साठ हजार बँक कर्मचारी
या संपात सहभागी झाल्यानं, बँकिंग सेवा प्रभावित झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या
सुमारे दोनशे बँक शाखा तसंच परभणी जिल्ह्यातल्या १९ बँक शाखांचं कामकाज या संपामुळे
ठप्प झालं आहे. बीड, जालना, हिंगोली, लातूर, नांदेड,
उस्मानाबाद सह सर्वच ठिकाणी या
सर्व कर्मचाऱ्यांनी काल आंदोलनं करून, आपल्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधून घेतलं.
****
नांदेड आकाशवाणी केंद्राचे सहायक संचालक भीमराव शेळके
हे आज सेवा निवृत्त होत आहेत. कार्यक्रम अधिकारी म्हणून आकाशवाणीत रुजू झालेले शेळके
यांनी मुंबई, पुणे आणि सोलापूर इथं कार्य केले. आपली सर्जनशीलता आणि कल्पकता वापरून
शेळके यांनी, नांदेड आकाशवाणीचं एफ एम केंद्र अल्पावधीतच लोकप्रिय केलं. त्यांच्या
या कार्याची दखल घेत, स्थानिक श्रोत्यांनी, येत्या तीन जून रोजी त्यांचा सार्वजनिक
गौरव समारंभ आयोजित केला आहे.
****
इंद्रप्रस्थ जलभूमि अभियानाच्या माध्यमातून येत्या २ जून पर्यंत लातूर जिल्ह्यातल्या
सर्व शासकीय कार्यालयांच्या छतावरचं पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्यासाठीची कामं पूर्ण
होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालक मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. ते
काल लातूर इथं बोलत होते. जिल्ह्यात एकूण दोन
लाख शोष खड्डे खोदण्याचं उद्दीष्ट असून, त्यापैकी ९७ हजार खड्ड्यांना मंजूरी देण्यात
आली आहे, तर ३५ हजार खड्ड्यांचं काम पूर्ण झालं असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद इथल्या सहायक निबंधकाला काल दीड हजार
रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. अनिस तय्यबअली सय्यद, असं त्याचं नाव असून,
सावकारीचा परवाना अर्ज वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यासाठी त्यानं तक्रारदाराकडे तीन
हजार रुपये लाच मागितली होती. लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं, निबंधक कार्यालयातच ही कारवाई
केली.
****
यवतमाळहून नागपूरला जाणारी शिवशाही बस
आणि मोटरसायकलच्या अपघातात दोन जण ठार तर १८ प्रवासी गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दुचाकी
चालक आणि बसमधल्या एका महिला प्रवाशाचा समावेश आहे. यवतमाळ कळंब मार्गावर काल हा अपघात
झाला.
****
पालघर जिल्ह्यात एका कंपनीत बॉयलर लीक होऊन तीन कामगारांचा
मृत्यू झाला, तर एक कामगार अत्यवस्थ आहे. वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तोरणा इस्पात
उद्योग कंपनीत काल दुपारी ही दुर्घटना घडली.
****
औरंगाबाद इथं काल सलग दुसऱ्या दिवशी कुरिअर कंपनीतून
पार्सलमधून आलेली सात शस्त्र जप्त करण्यात आली. परवा अशाच कारवाईत २८ शस्त्रं जप्त
करण्यात आली होती.
****
हिंगोली जिल्ह्याचे खनिकर्म आधिकारी तसंच कळमनुरीच्या
तहसीलदारांनी काल कळमनुरी तालुक्यात येलकी इथल्या वाळूसाठ्यावर छापा मारला. या साठ्यातली
रेती, अधिकृत लिलाव घाटातली असल्याचं भासवण्यासाठी संबंधितांनी सादर केलेल्या ५ पावत्यांपैकी
चार पावत्या बनावट असल्याचं सिध्द झालं.
*****
***
No comments:
Post a Comment