आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३१ मे
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
राज्याचे कृषिमंत्री आणि जेष्ठ
भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांचं आज पहाटे मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते सदूसष्ठ वर्षांचे होते. फुंडकर यांना मुंबईत
ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फुंडकर यांनी तीन वेळा अकोल्याचं खासदारपद
भूषवलं, तर दोन वेळा ते आमदार राहिले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते, तसंच भाजपचे
प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. ग्रामीण भागात भाजपाचा विस्तार करण्यात
त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. उद्या सकाळी बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं त्यांच्या
पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुंडकर
यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष वाढवण्यात
फुंडकर यांचा मोलाचा वाटा होता, असं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
****
लोकसभेच्या भंडारा-गोंदिया तसंच पालघर मतदार संघाच्या
पोटनिवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी आज होत आहे. पालघरमध्ये भाजपचे राजेंद्र गावित, तर
भंडारा - गोंदिया मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे आघाडीवर आहेत. गेल्या सोमवारी,
झालेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान, भंडारा-गोंदिया मतदार संघात अनेक ठिकाणी मतदान यंत्रं
बंद पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या, त्यानंतर काल या मतदार संघात ४९ ठिकाणी फेरमतदान
घेण्यात आलं.
****
नैऋत्य
मोसमी पाऊस राज्यात दाखल झाल्यानंतरसुद्धा, शेतकऱ्यांनी
पेरणीची घाई करू नये, असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. एक जूननंतर
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज आहे, मात्र
या कालावधीत कमाल तापमान अधिक असेल. मराठवाड्यात, वीजांपासून
संरक्षणासाठी पुरेशी खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
परभणी
जिल्ह्याच्या पालम तालुक्यात संजय गांधी निराधार योजना तसंच श्रावण बाळ योजनेतल्या
लाभार्थ्यांनी काल तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. खासदार संजय जाधव यावेळी
उपस्थित होते. १३ जूनपर्यंत लाभार्थ्यांना मानधन वाटप न केल्यास, तहसील कार्यालयालास
टाळे ठोकू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
*****
***
No comments:
Post a Comment