Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 May 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मे
२०१८
दुपारी १.०० वा.
****
लोकसभेच्या भंडारा-गोंदिया, तसंच पालघर मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची
मतमोजणी आज होत आहे. पालघरमध्ये पंधराव्या फेरीनंतर भाजपचे राजेंद्र गावित आघाडीवर
आहेत. तर भंडारा - गोंदिया मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे तीन हजार २००
मतांनी आघाडीवर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गेल्या सोमवारी झालेल्या मतदान
प्रक्रियेदरम्यान, भंडारा-गोंदिया मतदार संघात अनेक ठिकाणी मतदान यंत्रं बंद पडल्याच्या
तक्रारी आल्या होत्या, त्यानंतर काल या मतदार संघात ४९ ठिकाणी फेरमतदान घेण्यात आलं.
****
कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर
यांच्या निधनामुळे एका ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सहकाऱ्याला आपण मुकलो, अशा शब्दात मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी फुंडकरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. विरोधी पक्षनेते, आमदार,
संसद सदस्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी भक्कमपणे सांभाळल्या
आणि पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात मोठे योगदान दिलं, असं मुख्यमंत्र्यांनी ट्विटर संदेशात
म्हटलं आहे.
फुंडकर यांच्या निधनानं कृषि आणि सहकार क्षेत्रातल्या
प्रश्नांची खरी जाण असणारा नेता आपण गमावला, असं सांगून शिक्षण मंत्री विनोद तावडे
यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली, तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी, फुंडकर यांच्या अकाली निधनानं ग्रामीण भागातलं नेतृत्व कायमचं हरवलं असल्याची भावना
व्यक्त केली. फुंडकर यांचं आज पहाटे मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्यानं
निधन झालं, ते सदुसष्ठ वर्षांचे होते.
****
आयएनएक्स मिडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीच्या
उच्च न्यायालयानं माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना येत्या तीन जुलै पर्यंत
अटकेपासून संरक्षण दिलं आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं ही याचिका दाखल केली
आहे. चिदंबरम यांनी याप्रकरणी सीबीआयला चौकशीत सहकार्य करावं, असंही न्यायालयानं सांगितलं
आहे. तसंच चिदंबरम यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवरही न्यायालयानं सीबीआयला
उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी तीन जुलैला होणार आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या हंदवाडा परिसरात सुरक्षा बलाचे
जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. आज सकाळी ही चकमक
झाली. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली नसून, या परिसरात शोधमोहीम राबवण्यात
येत असल्याचं लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
देशभरातल्या सुमारे दहा लाख बँक कर्मचाऱ्यांनी, अत्यल्प
पगारवाढीच्या निषेधार्थ पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. यामध्ये एकवीस सार्वजनिक,
तेरा जुन्या खाजगी, सहा परदेशी आणि छप्पन्न प्रादेशिक ग्रामीण बँकांमधल्या कर्मचाऱ्यांचा
समावेश आहे.
राज्यभरातले सुमारे साठ हजार बँक कर्मचारी
या संपात सहभागी झाल्यानं, बँकिंग सेवेवर परिणाम झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या
सुमारे दोनशे बँक शाखा, तसंच परभणी जिल्ह्यातल्या १९ बँक शाखांचं कामकाज या संपामुळे
ठप्प झालं आहे. बीड, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद सह सर्वच ठिकाणी या
सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलनं करून, आपल्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधून घेतलं.
****
वस्तू
आणि सेवा कराअंतर्गत असलेले कर परताव्याचे दावे निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारनं
आजपासून पंधरा दिवसांची एक विशेष मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ३० एप्रिल
२०१८ पर्यंत दाखल झालेले सर्व दावे पूर्ण करण्यासाठी सीमा शुल्क, केंद्र
आणि राज्य जीएसटीचे अधिकारी या पंधरवड्यात सर्वतोपरी प्रयत्न करतील, असं
अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. जीएसटीचे कर परतावे हा केंद्र सरकारसाठी चिंतेचा विषय
असून, सरकारनं आतापर्यंत ३०
हजार कोटी रुपयांच्या जीएसटी कर परताव्यांना
मंजुरी दिली आहे.
****
लैंगिक
शोषणाला बळी पडलेल्या मुलांचा समावेश पीडित नुकसान भरपाई निधीत करण्यासाठी
आवश्यक पावलं उचलण्याचं आवाहन केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं
आहे. अंतरिम मदतीसह संपूर्ण नुकसान भरपाई वेळेवर दिली जावी, अशी विनंती
महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी एका पत्राद्वारे केली आहे. लैंगिक
अत्याचारांच्या घटनांमध्ये मुलं सर्वाधिक दुर्लक्षित असून, त्यांना
नुकसान भरपाईची रक्कम मिळत नाही. त्यामुळे त्यांचा समावेश या निधीसाठी केला जावा, असं
त्या म्हणाल्या.
****
पॅरिस
इथं सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत युकी भांबरी - दिविज शरण
या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीची दुसरी फेरी गाठली आहे. पहिल्या फेरीत त्यांनी भारताचा
पूरव राजा आणि त्याचा फ्रेंच जोडीदार फॅब्रिक मार्टीन या जोडीचा सहा - तीन, पाच - सात,
सहा - चार असा पराभव केला. त्याआधी भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा फ्रेंच जोडीदार
रॉजर व्हॅसलीन या जोडीनंही पुरुष दुहेरीची दुसरी फेरी गाठली असून, या फेरीत आज त्यांचा
सामना फ्रान्सच्या जोडीसोबत होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment