Tuesday, 29 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.05.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 May 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मे २०१ सकाळी .५० मि.

*****



Ø लोकसभेच्या भंडारा-गोंदिया तसंच पालघर जागेसाठी मतदान सुरळीत- निवडणूक आयोगाचा निर्वाळा; मतदान यंत्रात बिघाडाच्या तक्रारींमुळे विरोधी पक्षांकडून फेरमतदानाची मागणी

Ø राज्यातल्या महामार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी १६० ठिकाणी स्वच्छतागृहं उभारली जाणार

Ø सीबीएसईचा इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर होणार

Ø मोसमी पाऊस आज सायंकाळपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता

आणि

Ø लातूर तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात काल अवकाळी पावसाची हजेरी



****



 भंडारा-गोंदिया तसंच पालघर लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झालं. भंडारा गोंदिया मतदार संघात सरासरी ३५ टक्के तर पालघर मतदार संघात ४६ पूर्णांक ५० शतांश टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. या दोन्ही मतदार संघांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं बंद पडल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणाहून आल्या, या ठिकाणची मतदान यंत्र बदलून मतदान प्रक्रिया काही वेळातचं सुरळीत झाल्याचं राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं.

 मात्र, ज्या ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाला, तिथे फेरमतदान घेण्याची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच भारिप बहुजन महासंघाकडून करण्यात आली आहे. माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा गोंदिया मतदार संघात २५ टक्के मतदान यंत्र बंद पडल्याचा दावा केला. व्हीव्हीपॅट - मतदानाची पावती दाखवणारी यंत्रंही योग्यप्रकारे काम करत नव्हती, असा आरोप पटेल यांनी केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी, मतमोजणीच्या वेळी मतदान पावत्यांचीही मोजणी करण्याची मागणी केली.



 दरम्यान, भंडारा गोंदिया मतदार संघातल्या कोणत्याही मतदान केंद्रावरचं मतदान रद्द करण्यात आलेलं नाही, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. बिघडलेलं मतदान यंत्र साधारणत: अर्ध्या तासात बदललं जातं, आणि यामुळे मतदानाच्या विश्वासार्हतेवर शंका घेता येत नाही, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे.



 सांगली जिल्ह्यात पलूस कडेगाव विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी काल मतदान होणार होतं, मात्र भाजपनं इथला उमेदवार मागे घेतल्यानं, काँग्रेसचे विश्वजीत कदम बिनविरोध निवडून आले आहेत.

****



 राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी १६० ठिकाणी स्वच्छतागृहं उभारली जाणार आहेत. सार्वजानिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. भारतीय स्त्री शक्ती संघटनेनं काल मुंबईत पाटील यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स व्हेडिंग मशिन आणि सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनेटर उपलब्ध करुन देण्यात येईल, तसंच गुगल मॅपसारख्या अॅपवर या स्वच्छतागृहांची माहिती देण्यात येईल, असं आश्वासनही पाटील यांनी यावेळी दिलं.

****



 स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वर्षा या शासकीय निवासस्थानी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

 औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी, तर जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी पी एल सोरमारे यांनी, तर बीड इथं निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी, सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

****



 अहमदनगर जिल्ह्यात राहूरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची सहा वाणं, एक कृषी यंत्र, एक वनस्पती, जैविक ताण सहन करणारे स्त्रोत आणि चाळीस कृषी तंत्रज्ञान शिफारशींना संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीनं मान्यता दिली आहे. विद्यापीठाचे संचालक डॉ शरद गडाख यांनी ही माहिती दिली. पुण्याची महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद तसंच राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठांनी दापोलीच्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात आयोजित, संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या ४६ व्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली.

****



 “तंबाखूमुक्त महाराष्ट्र, आरोग्य संपन्न महाराष्ट्र” या तीन दिवसीय अभियानाला आजपासून प्रारंभ होत आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते आज सकाळी ११ वाजता मुंबईत मंत्रालयात या अभियानाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. तंबाखूमुक्त जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असं  आवाहन, बडोले यांनी केलं आहे. ३१ मे या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त, “तंबाखूमुक्तीसाठी” शपथही दिली जाणार असल्याचं, बडोले यांनी सांगितलं.

****



केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईचा इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज संध्याकाळी चार वाजेपासून मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी बी एस ई डॉट एन आय सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

*****



हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 मोसमी पाऊस आज सायंकाळपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी ही माहिती दिली. केरळमध्ये सध्या पावसाळासदृष्य स्थिती असली तरी, मोसमी पावसाचे काही निकष अद्याप पूर्ण झालेले नाहीत, असं त्यांनी सांगितलं. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं मात्र, मोसमी पाऊस कालच केरळमध्ये दाखल झाला असल्याचं सांगितलं आहे.

 दरम्यान, पुढच्या ३६ तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

****

 मराठवाड्यात कालही काही भागात पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले तसंच झाडांसह विजेचे खांबही उन्मळून पडल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही तुळजापूर, परंडा भागात काल जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही घरांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.

 हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या गिरगाव इथं पावसामुळे केळीच्या बागांचं मोठं नुकसान आहे. या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

****



 लातूर इथल्या महिला तंत्रनिकेतन बाबतचा संभ्रम पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दूर करावा, असं आमदार अमित  देशमुख यांनी म्हटलं आहे. हे तंत्रनिकेतन कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असं, निलंगेकर यांच्यासह शिक्षणमंत्र्यांकडूनही सांगितलं जातं, मात्र प्रशासनाकडून हे तंत्रनिकेतन बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याकडे आमदार देशमुख यांनी लक्ष वेधलं. शासन आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याची टीका देशमुख यांनी केली. हा संभ्रम दूर करून, हे तंत्रनिकेतन बंद करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती द्यावी असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

****



 जळगाव जिल्ह्यात अमळनेर इथं कृषी विभागानं सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचं बोगस बियाणं जप्त केलं. कृषी विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं, चोपडा मार्गावर केलेल्या या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

****



 परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आमदार विजय कांबळे यांच्या नेतृत्वात काल जिंतूर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पिकविम्याची रक्कम मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी यावेळी संताप व्यक्त करत शासनाविरोधी घोषणाबाजी केली. जिंतूर-सेलू तालुक्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले.

****



 पेट्रोल आणि डीझेलच्या वाढत्या दरवाढी विरोधात औरंगाबाद इथं काल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत, इंधन दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी केली.

****



 लातूर जिल्ह्यातल्या चाकूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या रुपाली पवार यांची निवड झाली आहे. काल झालेल्या या निवडणुकीत नितीन रेडी हे उपनगराध्यक्षपदी निवडून आले.

****



 औरंगाबाद इथं अठरा दिवसांपूर्वी उसळलेल्या दंगलीत अनेक छोट्या दुकानदारांचं नुकसान झालं होतं, या दुकानदारांना जमात-ए-इस्लाम हिंद या संस्थेच्या वतीनं काल सुमारे साडे तेरा लाख रूपये आर्थिक मदत वितरित करण्यात आली.



 दरम्यान, औरंगाबाद शहराच्या पोलिस आयुक्त पदी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक चिरंजीव प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. चिरंजीव प्रसाद यांनी यापूर्वी औरंगाबाद तसंच जालन्याचे पोलिस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे.

****



 लातूर जिल्ह्यात राबवल्या जात असलेल्या इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानात नागरिकांच्या मदतीसाठी इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान कक्ष उभारण्यात आला आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते काल या कक्षाचं उद्घाटन झालं.

****



परभणी जिल्हातल्या पूर्णा पंचायतीमध्ये स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालयाच्या वापरासंदर्भात जनजागृती करण्यासाठी काल शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बचत गटातल्या महिलांनी उपस्थितांना शौचालयाच्या वापराचं महत्त्व विशद केलं.

*****

***

No comments: