Tuesday, 22 May 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 22.05.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 22 May 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं आज विमान प्रवासासंबंधी नवीन नियम जारी केले आहेत. विमान कंपन्यांकडून एखाद्या वेळी उड्डान रद्द करण्यात आलं, तर प्रवाशांना त्याचा मोबदला दिला जाईल किंवा तिकिटाचे पैसे परत केले जातील, असं नागरी उड्डाण मंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितलं आहे. नवीन नियमांमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी वेगळ्या जागा आरक्षित ठेवण्याचाही प्रस्ताव असून, पुढच्या दोन महिन्यात हे नियम लागू करण्याचा सरकारचा विचार असल्याचं सिन्हा यांनी सांगितलं.

****

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या मोटार बाईक अॅम्ब्युलन्स सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. या सेवेत आज आणखी २० दुचाक्यांचा समावेश करण्यात आला असून, त्याचं लोकार्पण आज मंत्रालयात परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या उपस्थितीत झालं. १०८ या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ही बाईक ॲम्ब्युलन्स तात्काळ उपलब्ध होऊन रुग्णावर प्राथमिक उपचार सुरू केले जाऊ शकतात.

****

महागाई कमी करण्याचं आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर अन्याय्य कर लादल्यामुळे देशात इंधनाच्या किंमती उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. मुंबईत आज प्रदेश काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात चव्हाण यांनी, केंद्र आणि राज्य सरकारनं पेट्रोल, डिझेलवरील कर आणि अधिभार रद्द करून इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणावं, अशी मागणी केली.

****

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातल्या १२ गावांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. बावनथडी प्रकल्प संघर्ष समिती या स्थानिक संघटनेच्या विद्यमानं या गावांमधल्या ग्रामसभांमध्ये तशा आशयाचा ठराव संमत करण्यात आला. या गावांमधल्या सुमारे ३० हजार लोकसंख्येला पिण्याचं आणि शेतीचं पाणी पुरवण्यात यावं, ही मागणी दुर्लक्षित राहिल्याच्या निषेधार्थ मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचं समितीच्या अध्यक्षांनी सांगितलं. 

****

औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांना आज सकाळी छातीत दुखत असल्यानं, मध्यवर्ती कारागृहातून औरंगाबादच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं. शहरातल्या दंगल प्रकरणात अटक केलेल्या दोघांना तात्काळ जामिनावर सोडण्याच्या मागणीसाठी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तोडफोड केल्याप्रकरणी न्यायालयानं त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

****

लातूर पाटबंधारे विभागांतर्गत मांजरा, निम्न तेरणा प्रकल्पांवरच्या जलाशयात उजव्या आणि डावा कालव्याद्वारे सिंचनासाठी पाण्याचं आवर्तन चालू करण्यात आलं आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना जलाशय अथवा कालव्यामध्ये जाण्यास, पोहण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाण्यात प्रवेश करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पाटबंधारे विभागानं दिला आहे. 

****

बीड जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना त्यांच्या मागणीनुसार त्वरित लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना बीडचे अपर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांनी दिल्या आहेत. शेतकरी आत्महत्यांबाबत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या अपेक्षांचा आढावा घेतला.

****

नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या कलंबर खुर्द इथल्या ग्रामस्थांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करुन गावाचा कायापालट केल्याचं जिल्हा परिषद सदस्या प्रणिता देवरे चिखलीकर यांनी म्हटलं आहे. ४५ दिवस चाललेल्या या वॉटर कप स्‍पर्धेचा आज समारोप करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. या स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांनी गावातल्या महिलांचा सत्कार केला.

****

औरंगाबाद शहरातल्या बलवंत वाचनालयातर्फे आज ग्रंथालयीन पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ग्रंथालयीन अभिलेखे - लेखा परिक्षण आणि शासकीय योजना संबंधीच्या माहिती विषयक जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक अ.मा.गाडेकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. यावेळी संबंधित विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं.

****

नैऋत्य अरबी समुद्राकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, तो वेगानं वायव्य दिशेकडे सरकत असल्याचं पुणे वेधशाळेनं कळवलं आहे. विदर्भामध्ये या काळात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. नाशिक, जळगाव, परभणी, नांदेड आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहील, उद्या सकाळपर्यंत दक्षिण-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

दरम्यान, औरंगाबाद शहरातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.

****

No comments: