Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 25 May 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
कर्नाटकचे
मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी विधानसभेत विश्वासमत ठराव जिंकला आहे. काँग्रेस-जेडीएस
युतीला ११७ मतं मिळाली. हे सरकार पाच वर्षे कायम राहील, असा विश्वास कुमारस्वामी यांनी
व्यक्त केला. विश्वासमत ठरावापूर्वी भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला.
दरम्यान,
बहुमत सिद्ध करण्यापूर्वी काँग्रेसचे रमेश कुमार यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली.
विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार एस.सुरेश कुमार यांनी ऐनवेळी माघार घेतलल्यामुळे
रमेश कुमार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
****
रत्नागिरी
जिल्ह्यातल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा करून शिवसेना
जनतेची दिशाभूल करत आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी
केली आहे. ते आज रत्नागिरी इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. निसर्गसमृद्ध कोकणात नाणारसारख्या
प्रकल्पांची आवश्यकताच नाही, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा प्रकल्प
राज्यात इतर ठिकाणी किंवा गुजरातमध्ये घेऊन जायला तयार आहेत, तीसुद्धा जनतेची दिशाभूल
आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
****
राज्यात
आजपासून आंतरराज्य मालवाहतुकीसाठी ई-वे बिल प्रणाली लागू करण्यात आली आहे. सर्व संबंधितांनी
याची नोंद घ्यावी असं आवाहन वस्तू आणि सेवा कर विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसईचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. मनुष्यबळ
विकास सचिव अनिल स्वरुप यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेला
यंदा १२ लाख विद्यार्थी बसले होते.
****
राज्यात
वृक्ष लागवडीसाठी हरित सेनेची नोंदणी करण्यात आली असून, यात मराठवाडा अग्रेसर ठरला
आहे. लातूर जिल्हा राज्यात अग्रस्थानी असून जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख १५ हजार जणांनी
ग्रीन आर्मीचं सदस्यत्व स्वीकारलं आहे. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात चार लाख एक
हजार, तर बीड जिल्ह्यात तीन लाख ५५ हजार जणांनी हरित सेनेत नोंदणी केली आहे. लोकसहभागातून
महाराष्ट्राचं वृक्षाच्छादन वाढावं, वृक्ष आणि वन्यजीव संवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत
पोहोचवावा यासाठी एक कोटीची हरित सेना निर्माण करण्याचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांचा संकल्प आहे. राज्यात एकूण ५० लाख १२ हजार हरित सेनेची फौज सज्ज झाली आहे.
****
लातूर
जिल्ह्याला पाणीदार करून दुष्काळी जिल्हा ही ओळख पुसून टाकण्यासाठी इंद्रप्रस्थ जलभूमी
अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या स्वावलंबन यात्रेचा शुभारंभ आज पालकमंत्री संभाजी
पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आला. लातूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर
मंदिरात या यात्रेला सुरुवात करण्यात आली. इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानात जलयोद्ध्यांची
नोंदणी करण्यात आली असून, त्यांना प्रशिक्षणही देण्यात आलं आहे. यात लातूर शहरासह जिल्ह्यातली
पाणी पातळी वाढवण्यासाठी शोषखड्डे तयार करणं, पाण्याचं पुनर्भरण, प्रभागाची स्वच्छता
आणि वृक्षारोपण आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
****
नाशिक
जिल्ह्यातल्या उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शंभर व्यापाऱ्यांना लिलावात
सहभागी होण्यास मालेगाव इथल्या न्यायाधीकारणानं मनाई केली आहे. या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची
देणी थकवल्यानं ही कारवाई करण्यात आली. पणन महामंडळाने आशा प्रकारच्या थकबाकीदारांसाठी
मालेगाव इथं न्यायाधीकरण नियुक्त केलं आहे.
****
पावसाळ्यात
येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीस सामोरं जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवून, जीवित
आणि वित्त हानी टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेनं काळजी घ्यावी असे निर्देश परभणीचे जिल्हाधिकारी
पी शिवशंकर यांन दिले आहेत. परभणी इथं आज मान्सून २०१८ पूर्व तयारी आढावा बैठकीत ते
बोलत होते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य उपाययोजना करण्यासाठी पुर्व तयारी करणं,
तसंच अशा परिस्थितीमध्ये शोध आणि बचाव मोहिमेसाठी लागणारी सर्व संपर्क यादी अद्ययावत
करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
****
दुधाला
किमान २७ रुपये दर मिळावा आणि शेतमालाला दीड पट भावाची हमी मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी
आज अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातल्या कळस इथं छावा वॉरीयर्स संघटनेच्या वतीनं
रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं दूध दर प्रश्नी
एक जून रोजी राज्यभर तहसील कार्यालयांना घेराव घालून आंदोलन करण्याची हाक दिली आहे.
राज्यभर होणाऱ्या या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं दूध उत्पादक सहभागी होतील असा विश्वास
यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
****
धुळे
तालुक्यातल्या सोनगीर ग्रामपंचायतीत २०१५-१६ या आर्थिक वर्षात पथदिवे खरेदीत सहा लाख
३२ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात
सरपंच योगीता महाजन आणि ग्रामसेवक एस.डी.मोरे या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
****
No comments:
Post a Comment