Wednesday, 30 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.05.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 May 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मे २०१ दुपारी १.०० वा.

****



 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदा राज्यातून अट्ठ्यांऐंशी पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे दोन टक्क्यांनी कमी आहे. उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचं प्रमाण ब्याण्णव पूर्णांक छत्तीस शतांश टक्के तर मुलांचं हे प्रमाण पंच्याऐंशी पूर्णांक तेवीस शतांश टक्के, इतकं आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९४ पूर्णांक ३६ टक्के इतका असून,  औरंगाबाद विभागाचा निकाल ८८ पूर्णांक ७४ आणि लातूर विभागाचा निकाल ८८ पूर्णांक ३१ टक्के इतका लागला आहे.

****

 राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे प्रशिक्षणार्थी, देशासाठी समर्पण आणि उत्कृष्ठता या बाबतीत, देशभरातल्या युवकांचे आदर्श बनले आहेत, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती  आज पुण्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमी,एनडीए च्या एकशे चौतिसाव्या तुकडीच्या दीक्षांत समारंभानंतर बोलत होते. यावेळी सर्वश्रेष्ठ प्रशिक्षणार्थीं साठीची राष्ट्रपती पदकंही प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमा आधी राष्ट्रपतींना सैन्याच्या विमानांच्या एका तुकडीनं हवाई सलामी दिली.

****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जकार्ता इथे इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांच्याशी चर्चा केली. यानंतर दोन्ही नेत्यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या चर्चेनंतर उभय देशांदरम्यान, संरक्षण, अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रां संदर्भात अनेक करार होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान आज जकार्ता इथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत.

****

 रोटोमॅक, या कानपूरच्या उद्योग समूहाच्या एकशे सत्त्याहत्तर कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्त वसुली संचालनालयानं टाच आणली आहे. या कंपनीवर, बँकांचं तीन हजार सहाशे पंचाण्णव कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. मनीलाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये या कंपनीच्या मुंबईतल्या मालमत्तांचाही समावेश आहे.

****

 प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या हेतूनं रेल्वेमार्गांच्या अद्ययावती करणाचं काम सुरू असल्यामुळे सध्या अनेक मार्गांवर रेल्वेगाड्या उशिरा धावत असून, प्रवाशांनी याबाबत रेल्वेला सहकार्य करावं, असं रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. गोयल यांनी एका ट्विट संदेशाद्वारे हे आवाहन केलं आहे.

****

बँकांच्या राज्यातल्या बारा हजार शाखांमधले  सुमारे साठ हजार बँक कर्मचारी आजपासून दोन दिवसांच्या संपावर गेल्यामुळे राज्यातल्या बँकिंग सेवा मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाल्या आहेत. देशभरातल्या एकवीस सार्वजनिक, तेरा जुन्या खाजगी, सहा परदेशी आणि छप्पन्न प्रादेशिक ग्रामीण बँकांमधले सुमारे दहा लाख कर्मचारी, अत्यल्प पगारवाढीच्या निषेधार्थ या संपावर गेले आहेत.

****

 नैऋत्य मॉन्सून काल भारतीय उपखंडात दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामानखात्यानं केली आहे. केरळसह अंदमान निकोबार बेटं, लक्षद्वीप आणि तामीळनाडूच्या काही भागात मॉन्सून सक्रिय झाला असून, त्याच्या पुढच्या वाटचालीसाठीही हवामान पोषक असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. रत्नागिरी शहरात काल मॉन्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्याचं, तसंच सातारा शहर आणि परिसरामध्ये कोकणपट्टीकडून येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे तापमानात मोठी घट झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये आज मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामानखात्यानं वर्तवली आहे. दरम्यान, कर्नाटक मधल्या मंगलोर इथे आज मॉन्सूनच्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाल्याचं वृत्त आहे.

****

 तंबाखूचं कुठल्याही स्वरूपातलं सेवन हे आरोग्याला घातक असल्यामुळे तरुण पिढीनं तंबाखूपासून दूर राहावं, असं आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केलं आहे. उद्याच्या जागतिक तंबाखू विरोधी दिवसा निमित्त शासनानं हाती घेतलेल्या ‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र‘ या तीन दिवसीय जनजागृती अभियानाचं उद्घाटन काल बडोले यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बडोले यांनी उपस्थितांना महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्याची शपथ दिली.

****

 पॅरिस इथे सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या सामन्यांमध्ये भारताच्या रोहन बोपण्णानं आपला फ्रेंच जोडीदार रॉजर व्हॅसलिन याच्या साथीनं स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीतलं भारताचं एकमेव आव्हान असलेला युकी भांबरी मात्र पहिल्या फेरीतच पराभूत झाला.

*****

***

No comments: