आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२६ मे २०१८ सकाळी ११.०० वाजता
*****
केंद्रातल्या भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय
लोकशाही आघाडी सरकारला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं नवभारताच्या निर्माणासाठी अनेक जनताभिमुख निर्णय
घेतले असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान
आज कटक इथं एका सार्वजनिक सभेला संबोधित करणार आहेत.
दरम्यान, सरकारनं निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं
या चार वर्षात पूर्ण केली नसल्याचा आरोप करत, काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज नांदेड इथं
मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. आमदार डी पी सावंत यांनी काल नांदेड इथं पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली.
****
जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा बलाच्या
जवानांनी आज दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत
पाच दहशतवादी मारले गेले.
दरम्यान, कुपवाडा जिल्ह्यातल्या तंगधार आणि केरन
सेक्टर मध्ये मोठी शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या भागात सशस्त्र दहशतवादी लपले असल्याची
माहिती मिळाल्यानंतर ही मोहिम सुरु करण्यात आली.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईचा इयत्ता
बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मनुष्यबळ विकास खात्याचे सचिव अनिल स्वरुप यांनी
ट्विटरवरुन ही माहिती दिली. हा निकाल डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट रिझल्ट्स डॉट एन
आय सी डॉट इन, आणि डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू सी बी एस ई रिझल्ट्स डॉट एन आय सी डॉट इन
या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. उमंग या मोबाईल ॲप्लीकेशनवरही विद्यार्थी निकाल पाहू
शकतील. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेला यंदा १२ लाख विद्यार्थी बसले होते.
****
औरंगाबाद महानगरपालिका आणि डेव्हलपमेंट फोरम यांच्या
संयुक्त विद्यमानं आज आणि उद्या शहरात महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. या
अभियानात १५० हून अधिक संस्था आणि संघटना सहभाग घेणार आहेत. लोकसहभागातून घेण्यात येणाऱ्या
या अभियानात शहरात साचलेला कचरा हटवण्यात येणार आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत
कर्जमाफीसाठी आता येत्या पाच जून पर्यंत अर्ज करता येणार आहेत. यापूर्वी विहित कालावधीत
अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी या मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचं
आवाहन करण्यात आलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment