Tuesday, 22 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.05.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद



संक्षिप्त बातमीपत्र



२२ मे २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



रशियाचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी मायदेशी परतले. पंतप्रधान आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या अनौपचारीक बैठकीत संरक्षण सहकार्यासह महत्वाच्या द्विपक्षीय जागतिक विषयावरही चर्चा करण्यात आली.

****



 दरम्यान, पंतप्रधान येत्या रविवारी २७ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत, या मालिकेचा हा ४४ वा भाग असेल.

****



 ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते आणि शास्त्रज्ञ डॉ. हेमू अधिकारी यांचं काल मुंबईत त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. शास्त्रज्ञ प्रयोगशील अभिनेता आणि दिग्दर्शक अशी त्यांची ओळख होती. भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये ते बरीच वर्षे कार्यरत होते. हिंदी चित्रपटसृष्टी, मराठी रंगभूमी तसंच मराठी मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला होता. काल रात्री त्यांच्या पार्थिवावर दादर इथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

****



 सरकारनं पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत, अशी मागणी, विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या नाहीत तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

****



 औरंगाबद शहरातली कचरा समस्या दूर करण्यासाठी, घनकचरा सनियंत्रण समितीच्या वतीनं सातत्यानं आढावा घेऊन संपूर्णतः कचरा प्रक्रिया आणि विलगीकरणाबाबत संपूर्ण माहिती, तसंच करण्यात आलेल्या कार्यवाही बाबत विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर निपुण विनायक  यांना सविस्तर माहिती दिली. औरंगाबाद कचरा व्यवस्थापन संनियंत्रण समितीनं कचरा टाकण्यासाठी चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी, नारेगाव, झाल्टा, मिटमिटा आदी ठिकाणच्या जागा निश्चित केल्या असून, शहरात साचलेला कचरा उचलून त्यावर योग्य प्रक्रिया पार पाडून आवश्यक अंमलबजावणी करावी, पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई व्हावी, अशा सूचनाही मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या.

*****

***

No comments: