आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२३ मे २०१८ सकाळी ११.०० वाजता
*****
जनता दल सेक्युलर
पक्षाचे नेते एच.डी.कुमारस्वामी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेस
नेते जी.परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. मंत्रीमंडळामध्ये काँग्रेसचे बावीस
तर जनता दल सेक्युलर पक्षाचे बारा सदस्य असतील. दरम्यान, भारतीय जनता पक्ष आज कर्नाटकमध्ये
‘जनमत विरोधी दिवस‘ पाळत निषेध व्यक्त करत आहे.
****
पाकिस्तानकडून
जम्मूलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर आज सलग तिसऱ्या दिवशीही उखळी तोफांचा मारा होत
आहे. या हल्ल्याला सीमा सुरक्षा दलाकडून चोख उत्तर दिलं जात असल्यामुळे पाक सैन्याचं
मोठं नुकसान होत असल्याचं वृत्त आहे. जम्मू, सांबा आणि कठुआ जिल्ह्यातल्या चाळीस हजारहून
जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
****
मुंबईतल्या
जे.जे.रुग्णालयातल्या डॉक्टरांचा एकोणीस मेपासून सुरू असलेला संप काल मागे घेण्यात
आला. राज्यशासनानं या डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हा संप
मागे घेण्यात आला. उपचारादरम्यान एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी
दोन डॉक्टरांना केलेल्या कथित मारहाणीनंतर, डॉक्टरांना पुरेशी सुरक्षा पुरवावी, यासह
अन्य मागण्यांसाठी हे डॉक्टर्स संपावर गेले होते.
****
राज्यातल्या
अनुसूचित जातींच्या भूमीहीन मजुरांना शेतजमीन घेता यावी, यासाठी राज्यशासनानं एक नवीन
योजना सुरू केली आहे. यानुसार, हे शेतमजूर चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायती जमिनीच्या
किमतीच्या फक्त पाच टक्के रक्कम देऊन जमीन घेऊ शकतील, बाकीची आठ लाख रुपयांपर्यंतची
रक्कम राज्यशासन भरणार आहे. यासंदर्भातल्या आधीच्या योजनेत शासनाकडून पन्नास टक्के
अनुदान दिलं जात असताना या योजनेचा लाभ अल्प प्रमाणात झाल्याचं दिसून आल्यामुळे राज्यशासनानं
ही सुधारित योजना सुरू केली आहे.
****
आरोग्य सेवांची गुणवत्ता आणि उपलब्धता याबाबतीत जगभरातल्या
एकशे पंचाण्णव देशांच्या यादीत भारताचा एकशे पंचेचाळीसावा क्रमांक आहे. प्रसिद्ध वैद्यकीय
नियतकालिक लॅन्सेटच्या ताज्या अभ्यासातून ही बाब स्पष्ट झाली आहे. चीन, बांगला
देश, श्रीलंका आणि भूतान, या आपल्या शेजारी देशांच्या तुलनेत भारत याबाबतीत मागे असल्याचं,
मात्र १९९० च्या यासंदर्भातल्या अहवालाच्या
तुलनेत भारताची स्थिती सुधारल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment