Wednesday, 23 May 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 23.05.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 23 May 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

देशातल्या नक्षलग्रस्त भागांमध्ये चार हजार बहात्तर मोबाईल टॉवर्स उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापैकी एकशे छत्तीस टॉवर्स महाराष्ट्रात उभारले जातील. या योजनेच्या दोन वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या पहिल्या टप्प्यात असे दोन हजार तीनशे एकोणतीस टॉवर्स उभारण्यात आले होते. कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरीसंदर्भातल्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यासंबंधीच्या अध्यादेशाला, तसंच देशाचं पहिलं राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ मणिपूर इथं स्थापन करण्याबाबतच्या अध्यादेशालाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

****

जनता दल सेक्युलर पक्षाचे एच.डी.कुमारस्वामी यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे जी.परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या पण बहुमताचा आकडा गाठू न शकलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दुसऱ्या क्रमांकावरच्या काँग्रेस पक्षानं तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जनता दल सेक्युलर पक्षाला पाठिंबा दिल्यानंतर हे सरकार स्थापन झालं. या शपथग्रहण सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी, खासदार सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती, तर भाजपनं या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता.

****

औरंगाबाद दंगल प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि या प्रकरणाचा तपास अतिरिक्त महासंचालक श्रेणीच्या अधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पीटीआयशी बोलताना सांगितलं. समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि एमआयएम पक्षांच्या आमदारांच्या एका शिष्टमंडळानं काल रात्री मुख्यमंत्र्यांची यासंदर्भात भेट घेतली होती. दंगलीमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना नियमाप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात येईल अशी ग्वाही या शिष्टमंडळाला दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

यंदाच्या उन्हाळ्यात अद्याप एकाही पाणी टँकरची गरज न भासल्यामुळे, उस्मानाबाद जिल्हा टँकरमुक्त ठरला आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे, तसंच पाण्याचा काळजीपूर्वक वापर केल्यामुळे, दुष्काळग्रस्त भागातला जिल्हा असूनही उस्मानाबादनं हा मान मिळवला आहे. लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्येही याबाबतीत मोठी सुधारणा दिसून येत असून, तिथे अगदी नाममात्र प्रमाणात टँकर्स सुरू आहेत.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात काही भागात ढगाळ वातावरण आहे. येत्या पंचवीस आणि सव्वीस तारखेला विदर्भातल्या काही ठिकाणी तीव्र तर काही ठिकाणी अतितीव्र उष्णतेची लाट राहील, तर मराठवाड्यातल्या परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी येत्या चोवीस तासात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामानखात्यानं वर्तवला आहे.

****

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आमदारपदाचा, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला. पक्षांतर्गत स्थानिक राजकारणाला कंटाळून राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. यापुढील वाटचालीबद्दलचा निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याचं डावखरे यांनी सांगितलं.

****

मागच्या वर्षी परवानाधारक कृषीसाहित्य कंपन्यांकडून पुरवठा झालेलं बियाणं, खतं, औषधं इत्यादी साहित्य अतिशय निकृष्ट दर्जाचं किंवा बोगस निघाल्यामुळे नापीकी झाल्यानं शेतकऱ्यांवर आत्महत्यांची वेळ आली, या परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये, याची शासनानं काळजी घ्यावी, असं आवाहन शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केलं आहे. अशा निकृष्ट दर्जाची उत्पादनं शेतकऱ्यांना विकणाऱ्या कृषी कंपन्यांवर सरकारनं बंदी घालावी, अशी मागणीही खैरे यांनी केली आहे.

****

बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यामध्ये गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी महसूल विभागाला मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर नदीपात्रात वाहनांना प्रवेशबंदी करणारा आदेश लागू करण्यात आला आहे. यानुसार गेवराई तालुक्यातल्या संगमजळगाव, आगरनांदुर, रेवकीदेवकी आणि हिंगणगाव या गावातल्या नदीपात्रात येत्या दहा जूनपर्यंत वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.

****

No comments: