Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 May 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ मे २०१८ दुपारी १.०० वा.
****
देशासाठी बलिदान
हे सर्वोच्च बलिदान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी
दिल्ली इथं सीमा सुरक्षा दल - बीएसएफच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. सीमेचं रक्षण
करणं हे बीएसएफच्या जवानांचं कर्तव्य आहे, मात्र त्यांच्या कर्तव्याला कोणतीच सीमा
नसल्याचं ते म्हणाले. जवानांनी अगोदर गोळीबार करायचा नाही, मात्र समोरुन गोळीबार झाला,
तर प्रत्युत्तरादाखल त्यांनी केलेल्या गोळीबाराबाबत त्यांना कोणी विचारणा करु शकत नाही,
असंही सिंग यांनी स्पष्ट केलं.
****
जम्मू काश्मीरमधल्या
अकनूर आणि सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन
केलं. यावेळी झालेल्या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. या परिसरात दोन
दिवसांपासून गोळीबार सुरू असून, भारतीय जवानही चोख प्रत्युत्तर देत आहेत. सीमेजवळच्या
गावातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असल्याचं जम्मूचे पोलिस महासंचालक
एस. डी. सिंग जामवाल यांनी सांगितलं.
****
काँग्रेसच्या हिमाचल
प्रदेश प्रभारी म्हणून राज्यसभेच्या माजी खासदार रजनी पाटील यांची नियुक्ती करण्यात
आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या जागी ही नियुक्ती
केली आहे.
****
मुंबईच्या
जे. जे. रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांचा संप आज चौथ्या दिवशीही सुरुच आहे. शनिवारी जे. जे. रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णाचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली
होती. रुग्णालयातल्या प्रत्येक वॉर्डची सुरक्षा तातडीनं वाढवावी,
या मागणीबाबत महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेनं
हा संप पुकारला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत
झालेल्या बैठकीतही याबाबत तोडगा निघू शकला नाही.
****
वस्तू
आणि सेवा कर प्रणाली, विमुद्रीकरण आणि दिवाळखोरी संहिता यांसारख्या सुधारणांच्या
जोरावर २०२२ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था नऊ टक्के
शाश्वत विकास दर गाठेल, असा विश्वास नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार
यांनी व्यक्त केला आहे. नीति आयोगानं आयोजित केलेल्या फेसबुक
लाईव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. २०१७-१८
या वर्षात देशाचा विकासदर सहा पूर्णांक
सहा दशांश टक्के राहिला, तर चालू
आर्थिक वर्षात हा दर साडेसात टक्के राहण्याचा अंदाज असल्याचं ते म्हणाले.
****
केरळमध्ये निपाह विषाणूमुळे उद्भवलेल्या
परिस्थितीचा केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी आढावा घेतला. त्यांनी
केरळचे आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांच्याशी चर्चा करून शक्य ती सर्व मदत
करण्याचं आश्वासन दिलं. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या
नेतृत्वाखाली एक पथक केरळमध्ये दाखल झालं असून, एम्स आणि आर.
एम. एलच्या डॉक्टरांचं आणखी एक पथक आज तिथं पोहोचेल,
असं नड्डा यांनी ट्विटरवरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
मुद्रा योजनेत छोट्या उद्योजकांना कर्ज पुरवठा
करण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं फ्लिपकार्ट, स्वीगी, पतंजली
आणि अमूलसह ४० कंपन्यांबरोबर करार केला आहे. प्रधानमंत्री
मुद्रा योजनेत ज्या लोकांना कर्ज देता येईल, अशांची निवड
करण्यासाठी मंत्रालयाच्या वतीनं उद्या मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं
आहे. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणाऱ्या
कंपन्या म्हणून ४० कंपन्यांची निवड करण्यात आली असून, या कंपन्यांकडून
मुद्रा योजनेत कर्ज हवे असलेल्यांची निवड केली जाईल.
****
कारागृहांमध्ये पुरेशा सुविधा
उपलब्ध नसताना महिला कैद्यांबरोबर त्यांच्या मुलांना ठेवण्यात आलं आहे, याची
आकडेवारी दाखवत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं सर्व राज्यांचे मुख्य सचिव,
तसंच तुरुंग महासंचालकांना नोटिसा पाठवल्या आहेत. तसंच
सहा आठवड्याच्या आत नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. ओडिशातल्या
विविध कारागृहांत महिला कैद्यांबरोबर एक महिन्यापासून सहा वर्ष वयापर्यंतची ४६ बालकं
रहात असून, त्यांच्या स्थितीविषयी वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्यांची स्वतःहून
दखल घेत आयोगानं सर्व राज्यांना नोटिशी पाठवल्या आहेत.
****
जालना महोत्सव २०१८ चा आज समारोप होत
आहे. १८ मे पासून सुरु झालेल्या या महोत्सवात विविध कार्यक्रम, तसंच स्पर्धांचं आयोजन
करण्यात आलं होतं. काल या महोत्सवात उद्योजकता पुरस्कार प्रदान करण्यात आले. पर्यावरण
मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते उद्योजकांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
भारताच्या प्रजनेश गुन्नेश्वरननं फ्रेंच खुल्या
टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीत पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली आहे. पॅरिस
इथं काल झालेल्या पहिल्या फेरीत गुन्नेश्वरननं इटलीच्या साल्वेटोर करुसो याचा सहा
- चार, सहा - चार असा सरळ पराभव केला.
*****
***
No comments:
Post a Comment