Monday, 28 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.05.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद



संक्षिप्त बातमीपत्र



२८   मे २०१८ सकाळी ११.०० वाजता

*****



 लोकसभेच्या चार तर विविध राज्यांमधल्या विधानसभेच्या दहा  रिक्त जागांवर आज पोटनिवडणूक होत आहे. महाराष्ट्रातल्या पालघर आणि भंडारा - गोंदिया या दोन मतदार संघांसह उत्तरप्रदेशातल्या कैराना आणि नागालँड लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीच्या मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून शांततेत सुरुवात झाली. पालघरमध्ये भाजपाकडून राजेंद्र गावीत, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा आणि बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भंडारा - गोंदिया या जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मधुकर कुकडे, भाजपाचे हेमंत पटले यांच्यात थेट लढत आहे. या मतदारसंघात नक्षलग्रस्त भागात दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ आहे. येत्या ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे. 

****



 कर्नाटक विधानसभेच्या राजराजेश्वरी मतदारसंघातही आज मतदान होत आहे. नऊ हजार सातशे सेहेचाळीस बनावट मतदार ओळखपत्र सापडल्यामुळे इथलं मतदान पुढे ढकलण्यात आलं होत. याप्रकरणी काँग्रेस उमेदवार एन. मणिरत्न यांच्यासह काही जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

****



 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती. यानिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सावरकरांना आदरांजली अर्पण केली आहे. वीर सावरकर त्यांचं धैर्य, आणि देशभक्तीसाठी सदैव स्मरणात राहतील, असं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

****



 लातूर जिल्ह्यात जलसंधारणासाठी सुरु असलेल्या इंद्रप्रस्थ भूमी अभियानात काल रेणापूर तालुक्यात विविध ठिकाणी श्रमदान करण्यात आलं. तालुक्यातील रेणापूरसह दर्जी बोरगाव, आरजखेडा इथं पाणी आडवण्यासाठी काम करण्यात आलं.

****



 परभणी जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या बस चालकांनी, येत्या ३१ मे पर्यंत आपल्या वाहनांची तपासणी करून घ्यावी, असं आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. जून महिन्यात सुरू होत असलेल्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही वाहन तपासणी केली जात आहे.

*****

***

No comments: