Wednesday, 30 May 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.05.2018 - Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 30 May 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवन चरित्रातून प्रत्येक भारतीय महिलेनं प्रेरणा घ्यावी, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानात रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अनावरण झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या सात जूनपूर्वी जमा होईल, याची दक्षता विमा कंपन्यांनी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आज मुंबईत, प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भातल्या एका आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. येत्या खरीप हंगामासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली असून, शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यासाठी, विमा कंपन्या आणि बॅंकांनी, एकत्रितपणे प्रयत्न करावेत, तसंच, शेतकऱ्यांनीही दिलेल्या मुदतीत योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करावेत, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

****

राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी होईपर्यंत सरकारनं हमीभाव खरेदी केंद्रं सुरू ठेवावीत आणि या योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. सध्या हजारो शेतकऱ्यांचा हरभरा, नोंदणी करूनही खरेदी अभावी पडून असल्याकडे मुंडे यांनी लक्ष वेधलं.

****

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या शिफारशीनुसार सरकारनं ही कारवाई केली. सोलापूरचे उपनिबंधक अविनाश देशमुख यांची बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आज सकाळी पदभार स्वीकारला. बँकेकडे तारण मालमत्ता आणि कर्जवाटप यात तफावत आढळल्यानंतर, कामकाज सुधारण्याचे निर्देश राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, नाबार्डनं दिले होते, मात्र सुधारणा न झाल्यानं ही कारवाई करण्यात आली.

****

‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत राज्यातल्या धरणांमधला गाळ काढण्यासंदर्भात स्थापन समितीनं आज या बाबतच्या कामांचा आढावा घेतला. बुलढाणा जिल्ह्यात गाळ काढण्याची सर्वाधिक कामं झाल्याची आणि या मोहिमेत विविध खाजगी संस्था आणि पाणी फाऊंडेशनचीही मदत होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****

तापी बुराई सिंचन प्रकल्पाचं काम तातडीनं पूर्ण करावं, या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यात आज शेतकऱ्यांनी जलसत्याग्रह आंदोलन केलं. शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तापी नदी पात्रात उतरुन निदर्शनं केली. नंदुरबारच्या पूर्व भागासह दोंडाईचा परिसराला लाभ होणं अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाचं काम, आठ वर्षांपासून सुरु असूनही पूर्ण झालेलं नाही. याबाबत योग्य ती कारवाईचं आश्वासन प्रशासनानं दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

****

छोटा राजनचा हस्तक फरीद तनाशा याच्या खून प्रकरणातल्या अकरा आरोपींना मुंबईच्या विशेष मकोका न्यायालयानं दोषी ठरवलं असून, त्यातल्या सहा आरोपींना जन्मठेपेची आणि ऊर्वरित पाच आरोपींना दहा वर्षं तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तनाशा याची जून २०१० मध्ये हत्या करण्यात आली होती.

****

‘निपाह’ व्हायरसविषयी खबरदारी घेण्याचे आदेश पशुसंवर्धन आयुक्तांनी दिल्यानंतर धुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे धुळे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून ५० वराहांचे रक्तजल नमुने घेण्यात आले असून हे नमुने आज नाशिक इथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्याची सूचना पशुसंवर्धन विभागानं केली आहे.

****

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं २०१७-१८ या वर्षासाठी, आठ पूर्णांक पंचावन्न शतांश टक्के व्याजदर देण्याचे निर्देश दिले आहेत. सुमारे पाच कोटी लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

****

लोकसभेच्या भंडारा गोंदिया तसंच पालघर मतदार संघातल्या काही केंद्रांवर आज फेरमतदान होत आहे. या दोन्ही मतदार संघातल्या मतदानाची मतमोजणी उद्या होणार आहे.

****

कर्नाटकच्या किनारपट्टीवर कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एका बालिकेसह तीन जणांचा मृत्यू झाला. मंगलोर इथं काल, चारशे चौतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथकं मंगलोर आणि उडुपी जिल्ह्यांमध्ये दाखल झाली आहेत.

****

No comments: