Sunday, 27 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.05.2018 06.50AM


 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 May 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ मे २०१ सकाळी .५० मि.

*****



Ø ंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटीची भाडेवाढ अटळ-परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे संकेत

Ø खरीप २०१७ साठी सादर पीक विम्याची भरपाई तत्काळ देण्याच्या सूचना केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून जारी

Ø सीबीएसईच्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल काल जाहीर

आणि

Ø वाढत्या दरवाढीच्या मराठवाड्यात ठिकठिकाणी केंद्र सरकार विरोधात निदर्शनं

****



ंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटीची भाडेवाढ अटळ असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या उद्यानाचा शुभारंभ रावते यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भाडेवाढीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती रावते यांनी यावेळी दिली. गेल्या तीन महिन्यात डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळाला ४७० कोटी रुपयांचा अतिरिक्त तोटा झाला असून, भाडेवाढीशिवाय पर्याय नसल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं.



 दरम्यान, औरंगाबाद शहरात दंगल झालेल्या भागाची रावते यांनी काल पाहणी केली. ही दंगल पूर्वनियोजीत असून, ही बाब अतिशय गंभीर असल्याचं ते म्हणाले. यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 खरीप २०१७ साठी सादर पीक विमा दाव्यांपैकी, ९२ टक्के शेतकऱ्यांची माहिती, बँक खाते क्रमांकातल्या माहितीशी जुळत असल्यानं, या शेतकऱ्यांना विम्याची भरपाई तत्काळ देण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयानं, कृषी विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात हे निर्देश देण्यात आले आहेत. उर्वरित आठ टक्के शेतकऱ्यांची माहिती जुळत नसल्यानं, ती तातडीने पुनर्निर्धारीत करुन त्यांनाही भरपाई देण्याची कार्यवाही विमा कंपन्यांनी करावी, ही माहिती सुधारीत करुन घेण्याची जबाबदारी ही विमा कंपन्यांची आहे, असंही कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे.



रबी २०१७ साठी विमा दाव्यांची माहिती भरण्याची मुदत ही १५ मे २०१८ पर्यंत होती, ती १५ जून २०१८ पर्यंत वाढवली असल्याचं, मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.

****

 रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे गाड्यांमध्ये वर्षाकाठी १२ लाख रुपयांवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात नोंदणी करणं आवश्यक करण्यात आलं आहे. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी केटरिंगची सुविधा आणि खाद्य पदार्थांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यासाठी एक आढावा बैठक घेतली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. १५ दिवसांच्या आत ही ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे.

****



केरळमध्ये निपाह विषाणुच्या उद्रेकासाठी वटवाघळं किंवा डुकरं कारणीभूत नाहीत, असं केंद्रीय वैद्यकीय पथकानं आपल्या अहवालात म्हटलं आहे. भोपाळच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सेक्युरीटी ॲनिमल डिसीजेस आणि पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेकडे एकूण २१ नमुने पाठवण्यात आले होते. या सर्व नमुन्यांचं परीक्षण केल्यानंतर, याबाबतचा अहवाल काल आरोग्य विभागाला सादर करण्यात आला. या रोग प्रसाराच्या इतर संभाव्य कारणांचा शोध घेतला जात आहे.

****



देशातल्या गरीब जनतेला अत्यल्प दरात अपघात विमा देणाऱ्या ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत’ महाराष्ट्रातल्या उद्दिष्टित १९२ खेड्यांमध्ये ४५ हजार ११५ विमा धारकांची नोंद झाली आहे. देशातल्या गोर-गरीब जनतेला सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल मानली जाणारी ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ १ जून २०१५ पासून सुरु करण्यात आली आहे.

****



अलिबाग नजीकच्या नागाव इथल्या समुद्रात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला. काल पहाटे ही दुर्घटना घडली. मृत तिघे नवी मुंबईतल्या कोपरखैरणे इथले रहिवासी आहेत. दोन जणांचे मृतदेह सापडले असून, तिसऱ्या मृतदेहाचा शोध घेतला जात असल्याचं अलिबागचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितलं.



नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यात काल दोघा जणांचा तलावात डून मृत्य झाला. वाकद शिवारातल्या सिताखंडी इथं काल दुपारी ही घटना घडली.

****



केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. नोएडाच्या मेघना श्रीवास्तव हिनं ५०० पैकी ४९९ गुण मिळवत देशभरातून पहिला क्रमांक पटकावला. देशभरातून एकूण ८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण एक टक्क्यान अधिक आहे. हा निकाल मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी बी एस ई रिझर्ल्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर पाहता येईल.

****





पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल.

****



हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****







केंद्र सरकारन निवडणूकपूर्व आश्वासनांची पूर्तता न करून, जनतेचा विश्वासघात केला असा आरोप करत काँग्रेस पक्षातर्फे काल नांदेड इथं मूक मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या महात्मा फुले पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला, त्याठिकाणी निवासी जिल्हाधिकारी जयराज कारभारी यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. आमदार डी पी सावंत, अमरनाथ राजूरकर, महापौर शिला भवरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते.



औरंगाबाद इथंही क्रांतीचौक परिसरात काँग्रेस पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. शंभर दिवसात महागाई कमी करण्याचं आश्वासन देऊन सत्तेवर आलेलं सरकार, चार वर्षात महागाई कमी करू शकलं नाही, अशी टीका यावेळी करण्यात आली. जालना इथंही काँग्रेस पक्षानं निदर्शनं करून, केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला. बीड जिल्ह्यात परळी इथं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं, वाहनं ढकलत मोर्चा काढण्यात आला.

****



जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना येत्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी प्रशासनानं एक हजार चारशे अडुसष्ट कोटी रुपयांच्या कृषी कर्जवाटपाचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाल्यामुळे जिल्ह्यातले ९५ हजार शेतकरी नव्यानं पीक कर्ज घेण्यास पात्र ठरले आहेत. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत कृषी पतपुरवठ्याच्या रकमेमध्ये ५५ कोटी ४४ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांमधून आजपर्यंत ४५ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचं वाटप झालं आहे.

****



लातूर जिल्ह्यात जलसंधारणासाठी सुरु असलेल्या इंद्रप्रस्थ जलयुक्त अभियानामुळे जिल्हा दुष्काळमुक्त होऊन पाणीदार म्हणून आपली ओळख निर्माण करेल असा विश्वास पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे. काल निलंगा तालुक्यात या अभियानाच्या स्वावलंबन यात्रे अंतर्गत संगारेड्डीवाडी आणि सिंदखेड इथं  श्रमदान केल्यानंतर निलंगेकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेला अनुसरुन  या अभियानाद्वारे जिल्ह्यात  प्रत्येकांच्या घरासह गावचं आवार जलयुक्त करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचं ते म्हणाले.

****



नांदेड इथं काल रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे शहरात काही ठिकाणी झाडाच्या फांद्यासह मोठे फलकही तुटून रस्त्यांवर पडले. वीज पुरवठाही काही काळ विस्कळीत झाला होता. जिल्ह्यात भोकर, अर्धापूर, माहूर, हदगाव आदी ठिकाणी काल रात्री पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 उस्मानाबाद जिल्ह्यातही उमरगा शहर आणि तालुका परिसरात काल रात्री पाऊस झाल्याचं वृत्त आहे.

****



लातूर लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या  विविध योजना प्रभावीपणे राबवण्यासह विविध विकास कामांद्वारे  सामान्यांचं जगणं सुसह्य करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी म्हटलं आहे. केंद्र  सरकारला काल चार वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. लातूर जिल्ह्यात झालेल्या विकास कामांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली.

***



 माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख यांना काल त्यांच्या ७३ व्या जयंतीनिमित्त लातूरसह जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून आदरांजली अर्पण करण्यात आली. या निमित्तानं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

****



 औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयातल्या ग्रंथालयशास्त्र विषयातील निवृत्त प्राध्यापक रामराव भित्रे आणि त्यांच्या पत्नी विमल भित्रे यांचं काल अपघाती निधन झालं. अमरावती जवळ एका ट्रकनं त्यांच्या कारला धडक दिल्यानं हा अपघात झाला. काल सायंकाळी औरंगाबाद इथं या दोघांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

 इंडीयन प्रिमियर लीग या मर्यादीत वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला अंतिम सामना आज होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांदरम्यान मुंबईत इथं हा अंतिम सामना खेळला जाणार आहे.

*****

***

No comments: