Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 25 May 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मे
२०१८ सकाळी ६.५० मि.
*****
·
विधान परिषदेच्या पाच जागांपैकी शिवसेना भाजपचा
प्रत्येकी दोन
जागांवर विजय; राष्ट्रवादी काँग्रेसला
एक जागा
·
तूर खरेदीला मुदतवाढ देण्यास केंद्र सरकार अनुकूल
- सहकार मंत्री सुभाष देशमुख
·
पेट्रोलयम पदार्थांचा वस्तू आणि
सेवा कर कक्षेत समावेश करण्याची काँग्रेसची मागणी
आणि
·
सोलापूर विभागात रेल्वे रुळाच्या कामामुळे काही गाड्या पूर्णत:
तर काही गाड्या अंशत: रद्द
****
स्थानिक
स्वराज्य संस्थांमधून राज्य विधान परिषदेच्या पाच जागांपैकी शिवसेना भाजपनं प्रत्येकी
दोन जागा जिंकल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला गेल्या २१
तारखेला मतदान झालेल्या सहा पैकी पाच जागांसाठीची मतमोजणी काल झाली, यापैकी परभणी-हिंगोली
विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले, त्यांनी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांचा पराभव केला.
बजोरिया
यांना २५६, तर देशमुख यांना २२१ मतं मिळाली. नाशिक
इथं शिवसेनेचे नरेंद्र दराडे, अमरावती इथं भाजपाचे प्रवीण पोटे, चंद्रपूर इथं भाजपाचे
रामदास आंबटकर, तर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे
अनिकेत तटकरे विजयी झाले.
उस्मानाबाद-लातूर-बीड
या मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी निवडणूक आयोगानं पुढे ढकलली आहे. बीड नगर परिषदेतल्या अपात्र नगरसेवकांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल असूल, या याचिकेवर येत्या सहा जूनला सुनावणी होणार
आहे.
****
मुंबई
पदवीधर मतदार संघ, मुंबई शिक्षक मतदार संघ, नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ आणि कोकण
विभाग पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या चार जागांसाठी येत्या पंचवीस
जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख सात जून असून,
११ जून उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. मतमोजणी २८ जूनला होणार आहे.
दरम्यान,
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडून निरंजन डावखरे यांना उमेदवारी देण्यासंदर्भातला
प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करू, असं भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी
म्हटलं आहे. डावखरे यांनी काल खासदार दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
उपस्थितीत भाजपत प्रवेश केला, त्यावेळी दानवे बोलत होते.
****
राज्यातल्या
सहा नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या सार्वत्रिक तसंच बारा नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या
पोटनिवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या, ३० मे रोजी प्रसिद्ध होणार आहेत.
राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. या निवडणुकांमध्ये
अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर, श्रीगोंदा तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा
पोटनिवडणुकीचा समावेश आहे.
****
केंद्र
सरकार तूर खरेदीला मुदतवाढ देण्यास अनुकूल असल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी
म्हटलं आहे. तूर खरेदीला मुदतवाढ मिळण्यासाठी देशमुख यांनी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन
सिंह यांची भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते. शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केल्याशिवाय
राज्यातली खरेदी केंद्र बंद होणार नाहीत, असं आश्वासन, देशमुख यांनी दिलं.
तूर
खरेदीला शासनानं याआधी १५ मे पर्यंत मुदतवाढ दिली होती, या मुदतीत ३३ लाख १५ हजार १३२
क्विंटल तूर खरेदी झाली आहे. यंदा तूर खरेदीचे उद्दीष्ट ४४ लाख क्विंटल निर्धारित करण्यात आलं होतं, त्यामुळे
तूरखरेदीला मुदतवाढ मिळणं अपेक्षित आहे.
****
पेट्रोल,
डिझेल आणि पेट्रोलियम पदार्थांचा वस्तू आणि सेवा कर कक्षेत समावेश करावा, आणि इंधनावरचे
अनावश्यक कर मागे घ्यावेत, अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे. काल मुंबई जिल्हाधिकारी
कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी, ही मागणी
केली, जोपर्यंत इंधन जीएसटीअंतर्गत आणलं जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असं
निरुपम यांनी सांगितलं.
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या
दरवाढीच्या निषेधार्थ औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत
सायकल फेरी काढण्यात आली. विभागीय
आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना यावेळी इंधन
दरवाढीच्या निषेधाचं निवेदन देण्यात आलं.
लातूर इथंही काँग्रेसच्या वतीनं पेट्रोल-डिझेल
दर वाढीच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी
भीक मांगो आंदोलन केलं.
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल वस्तू सेवा
कराच्या कक्षेत आणल्यास, करावरचे कर रद्द होऊन, इंधनाचे दर कमी
होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत
पत्रकारांशी बोलत होते. कररचनेतल्या या बदलासाठी महाराष्ट्र तयार असून, इतर राज्यांनीही
या बदलाला सहमत असणं आवश्यक असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले.
****
समाजविघातक
गोष्टींना प्रतिबंध घालण्यासाठी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन, संरक्षण
देण्यासंदर्भात नवीन कायदा तयार करण्यात येत असल्याचं, अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे
सदस्य सी. एल. थूल यांनी सांगितलं आहे. सांगली इथं काल आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह
केलेल्या जोडप्यांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. आंतरजातीय विवाह कायदा
प्रारूप समितीचे अध्यक्ष असलेले थूल यांनी, यासंदर्भात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांचे
प्रतिनिधी, विविध कार्यकर्त्यांचे अनुभव, तसंच सूचना जाणून घेतल्या.
****
राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी
देशभरातल्या आणखी सात राज्यांमध्ये आजपासून ई वे बिल व्यवस्था लागू करण्यात येत आहे.
यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी - मार्च २०१८ मध्ये
घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परिक्षेच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर
केली नसल्याचं मंडळानं स्पष्ट केलं आहे. सामाजिक संपर्क माध्यमांवर निकालाच्या विविध तारखा येत असल्याचं
निदर्शनास आल्यावर परीक्षार्थींनी या तारखांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन मंडळानं
केलं आहे.
****
सोलापूर विभागात सुरु असलेल्या रेल्वे
रुळाच्या कामामुळे काही गाड्या पूर्णत: तर काही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे
निजामाबाद गाडी येत्या १६ जूनपर्यंत, निजामाबाद पुणे गाडी उद्यापासून तर
निजामाबाद पंढरपूर गाडी आजपासून १७ जून पर्यंत रद्द करण्यात आली आहे. याशिवाय नांदेड - दौंड आणि दौंड - नांदेड ह्या दोन गाड्या येत्या
१६ जून पर्यंत अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून
ही माहिती देण्यात आली.
****
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागात राज्यपालांच्या
चान्सलर्स ब्रिगेडच्या, ‘आव्हान २०१८’ या १० दिवसीय राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन
प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. यात राज्यातल्या प्रमुख १४ विद्यापीठांच्या
कार्यक्षेत्रांतून ३६ जिल्ह्यांतले ७२ संघप्रमुख आणि एक हजार २०६ स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी
आतापर्यंत नोंदणी केली असल्याचं कुलगुरू बी. ए. चोपडे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं.
या शिबिराचं उद्घाटन आज दुपारी चार वाजता विद्यापीठाच्या नाट्यगृहात होणार आहे. तीन
जूनपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात स्वयंसेवकांना पुण्याच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद
बलाचे ४८ अधिकारी प्रशिक्षण देणार आहेत.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यात वीज चोरी प्रकरणी २५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले
आहेत. बेकायदा जोडण्या घेऊन, वीज चोरी करणाऱ्या घरगुती ग्राहकांविरोधात सेनगावच्या
सहाय्यक विद्युत अभियंता कार्यालयातर्फे गेल्या दोन दिवसात विशेष कारवाई मोहीम राबवण्यात
आली, त्यात ही कारवाई करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या
नागरिकांनी निपाह आजाराला न घाबरण्याचं आवाहन महापौर नंदकुमार घोडेले यांनी केलं
आहे. औरंगाबाद शहर पर्यटन नगरी असल्याच्या
अनुंषगानं या आजाराचा धोका
लक्षात घेऊन महापौरांनी काल मनपा वैद्यकिय अधिकाऱ्यांची
बैठक घेतली, या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी मनपाच्या
सर्व रुग्णालयांनी सज्ज राहण्याचे
निर्देश त्यांनी दिले. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी जनजागृतीसह विविध उपाय
योजना राबवण्याचे निर्देश महापौरांनी
दिले.
****
वेतनवाढीच्या मागणीसाठी बीड इथं काल बँक कर्मचाऱ्यांनी
निदर्शनं केली. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनशी संलंग्न संघटनांचे सदस्य यात सहभागी
झाले होते. या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी ३० आणि ३१ मे रोजी संपाचा इशारा दिला आहे.
//*********//
No comments:
Post a Comment