Wednesday, 20 June 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.06.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 June 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ० जून २०१ सकाळी .५० मि.

****



§  जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राज्यपालांची शिफारस 

§  आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेनेचीच सत्ता - पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

§  विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन ४ जुलै ते २० जुलै दरम्यान नागपूर इथं होणार

आणि

§  मराठवाड्यात औरंगाबादसह अनेक ठिकाणी काल पावसाची जोरदार हजेरी

****



 जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. राजभवनच्या प्रवक्त्यानं काल श्रीनगर इथं ही माहिती दिली.



 भारतीय जनता पक्षानं काल पीपल्स डेमॉक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढून घेत, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परिणामी सरकार अल्पमतात आल्यामुळे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला.



 राज्य सरकारला दहशतवाद विरोधी लढ्यात केंद्र सरकारनं पूर्ण पाठिंबा दिला होता, मात्र काश्मीर खोऱ्या  दहशतवादाचा प्रश्न हाताळण्यात तसंच राज्यातली स्थिती सुधारण्यात मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती अपयशी ठरल्यामुळे, सरकारमध्ये राहणं अशक्य असल्याचं, भाजपकडून सांगण्यात आलं.



 दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीशी आघाडी करण्याची शक्यता काँग्रेसनं फेटाळून लावली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. नॅशनल कॉन्फरन्स पक्षानेही इतर कोणा बरोबर हातमिळवणी करून सरकार स्थापन करण्याची शक्यता फेटाळली आहे. पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी काल राज्यपाल एन एन वोरा यांची भेट घेऊन राज्यपाल राजवट लागू करण्याची मागणी केली. 

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडेनऊ वाजता देशभरातल्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी ही माहिती दिली. २०२२पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांबाबत ते शेतकऱ्यांशी यावेळी चर्चा करतील, अशी माहिती त्यांनी दिली. या संवादाचं थेट प्रसारण कृषी विज्ञान केंद्रामधे, सामान्य सेवा केंद्रा बरोबरचं , सामान्य सेवा दूरदर्शन, डीडी किसान आणि आकाशवाणीवरुन देशभरात केलं जाणार आहे.

****



 आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेनेचीच सत्ता येईल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावरच लढवण्याचे संकेत दिले. मुंबई इथं काल शिवसेनेचा ५२व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. जम्मू काश्मीर सरकारमधून पाठिंबा काढल्या बद्दल त्यांनी भारतीय जनता पक्षाचं अभिनंदन केलं, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक धोरणांवर टीका केली.



 दरम्यान, या मेळाव्यात बोलताना लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांनी, इतर राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष सत्तेवर आले मात्र, शिवसेनेला राज्यात आजपर्यंत एकहाती सत्ता मिळाली नाही, याची कारणं शोधण्याची गरज, व्यक्त केली. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी यावेळी केलेल्या भाषणात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा पुनरुच्चार केला.

****



 विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन ४ जुलै ते २० जुलै या कालावधीत नागपूर इथं होणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. यावेळी शासकीय कामकाजाच्या नियोजनावरही चर्चा झाली. 

****



 मराठा समाजातल्या तरुणांना उद्योग उभारणीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा मार्फत सुलभपणे कर्ज मिळावं, यासाठी बँकांनी तातडीनं कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल मंत्री तथा मराठा आरक्षण संदर्भातल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून सुरु असलेल्या व्याज परतावा योजनेत कर्ज उपलब्ध करुन देण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. या योजनेसंदर्भातील बँकांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन करून कर्ज पुरवठा सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

****

राज्यपाल कुलपती सी. विद्यासागर राव यांनी राज्यातल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना उद्या २१ जून रोजी विद्यापीठांमध्ये तसेच संलग्न महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याच्या सूचना केल्या आहेत. विद्यापीठांनी योग दिवस साजरा करताना सर्वसामायिक योग प्रणाली तसेच योग प्रार्थनेचा समावेश करावा आणि प्रतिष्ठित नागरिकांना निमंत्रित करण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर केवळ एक दिवसाचं कार्यक्रमाचं आयोजन न राहता वर्षभरासाठीचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी विद्यापीठांना दिले आहेत.

****



 राज्यातल्या मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना प्रकल्प उभारण्यात येणाऱ्या अडचणींबाबत नवीन धोरण तयार करुन सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं. मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था यांच्या प्रलंबित अनुदान, केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी, राष्ट्रीय अनुसूचित जाती आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची अंमलबजावणी, सफाई कामगारांच्या पाल्यांना मिळणारी शिष्यवृत्ती आदींबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या समवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. मागासवर्गीयांच्या औद्योगिक सहकारी संस्थांप्रमाणे वैयक्त‍िक लाभाच्या योजना सुरु करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारनं निर्यातदारांना ५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान द्यावं अशी मागणी केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ सुभाष भामरे यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रात कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं, मात्र उत्पादन वाढलं की दर कोसळतात. या पार्श्वभूमीवर कांदा निर्यातीला चालना देताना पाच टक्के निर्यात प्रोत्साहन भत्ता द्यावा अशी मागणी डॉ भामरे यांनी निवेदनात केली आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. नाट्यलेखक अभिराम भडकमकर, नाट्यदिग्दर्शक सुनील शानभाग, लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल संध्या पुरेचा यांचा गौरव करण्यात येणार असून ३४ कलाकरांची २०१७ साठीच्या बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

****



 मराठवाड्यात औरंगाबादसह अनेक ठिकाणी काल पावसानं जोरदार हजेरी लावली. औरंगाबाद शहर परिसरासह जिल्ह्यात वैजापूर, गंगापूर, सिल्लोड, कन्नडसह सर्वत्र काल पावसानं हजेरी लावली.



 बीड शहर आणि परिसरात काल सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील परळी तालुक्यात एकाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.



 जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातही काल तुरळक पाऊस पडला.



 लातूर शहराच्या काही भागात काल जोरदार पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 यवतमाळ बुलडाणा तसंच अहमदनगर जिल्ह्यातही काल सर्वत्र जोरदार पाऊस झाला. मृग नक्षत्राचा पाऊस बरसल्यानं, शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.



 नांदेड जिल्ह्यात हदगाव परिसरात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पाऊस झाला, जिल्ह्यात इतरत्र मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.



परभणी, हिंगोली, तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र आठ दिवसांपासून पावसानं ओढ दिल्यानं, शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.



दरम्यान, येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

****



इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेल्या दरवाढीच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण गेट, गंगापूर आणि सिल्लोड तहसील कार्यालय तसंच फुलंब्री तालुक्यातल्या आळंद इथं हे आंदोलन होणार असल्याची माहिती भाकपचे शहर सचिव कॉ. भास्कर लहाने यांनी दिली आहे.

****



 आठवं अंबाजोगाई साहित्य संमेलन येत्या २३ आणि २४ तारखेला आयोजित करण्यात आलं आहे. अंबाजोगाई रोटरी क्लब आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेतर्फे आयोजित या संमेलनात परिसंवाद, कविसंमेलन, माहेरवाशिणींचा मेळावा तसंच विविध पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

****



 वीजदेयकं थकवल्या प्रकरणी, जालना जिल्ह्यातल्या ५२ गावांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यामध्ये घनसावंगी तालुक्यातल्या २८ तर, अंबड तालुक्यातल्या १२ गावांचा समावेश आहे. सुमारे दोन कोटी रुपयांची देयकं थकवल्यानं, ही कारवाई करण्यात आली.

****



 संत गजानन महाराज यांची पालखी आषाढी वारीसाठी काल शेगावहून मार्गस्थ झाली. नगर परिक्रमेनंतर या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलं. विदर्भातल्या अनेक दिंड्या आणि वारकऱ्यांसह निघालेली ही पालखी खामगाव, मेहकर, सिंदखेडराजा, जालना, बीड, आदी जिल्ह्यातून मार्गक्रमण करत, पंढरपूरला पोहोचेल.


 दरम्यान, पैठण इथल्या संत एकनाथ महाराज यांची पालखी येत्या पाच जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती नाथवंशज योगीराज महाराज गोसावी यांनी दिली.

*****

***

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...