Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 1 June 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ जून २०१८ दुपारी
१.०० वा.
****
विनाअनुदानित
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत प्रति सिलिंडर ४८ रुपये, तर अनुदानित गॅस सिलिंडरची
किंमत प्रति सिलिंडर दोन रुपये ३४ पैसे इतकी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे विनाअनुदानित
गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत ६९८ रुपये, कोलकाता मध्ये ७२३ रुपये ५० पैसे, चेन्नईत
७१२ रुपये ५० पैसे तर मुंबईत ६७१ रुपये ५० पैसे इतकी झाली आहे.
अनुदानित
गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत ४९३ रुपये ५० पैसे, कोलकाता मध्ये ४९६ रुपये ६५ पैसे,
चेन्नईत ४८१ रुपये ८४ पैसे, तर मुंबईत ४९१ रुपये ३१ पैसे इतकी झाली आहे.
****
भारत
आणि सिंगापूर दरम्यान आज वित्तीय सेवा, लोक प्रशासन, सायबर सुरक्षा, अंमली पदार्थांच्या
तस्करीला आळा घालणं आणि क्षमता निर्माण आणि प्रशिक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासंदर्भात
आठ सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली
सियेन लूंग यांच्यात सिंगापूर इथं झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हे करार करण्यात आले.
भारत आणि सिंगापूरचे संबंध सौहार्दपूर्ण आणि विश्वासार्ह असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी
म्हणाले.
****
असंघटित
क्षेत्रातल्या सामाजिक सुरक्षा अधिनियमांतर्गत घरगुती कामगारांची नोंदणी न करणाऱ्या
राज्यांना कोणतंही अनुदान देऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला
दिले आहेत. या कामगारांची नोंदणी करण्याचे निर्देश या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच न्यायालयानं
दिले होते, मात्र अनेक राज्यांमध्ये या निर्देशांचं अजूनही पालन होत नसल्याबद्दल न्यायालयानं
नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांनी, आदेशाच्या
अंमलबजावणीसंदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा, असंही न्यायालयानं सांगितलं
आहे.
****
प्रधानमंत्री
आवास योजनेअंतर्गत देशाच्या शहरी भागातल्या गरीबांसाठी आणखी दीड लाख घरं बांधण्यास
केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. या घरांच्या बांधकामासाठी सात हजार २२७ कोटी रूपयांची
गुंतवणूक अपेक्षित असून त्यापैकी दोन हजार २०९ कोटी रूपये गुंतवणुकीचा वाटा, केंद्र
सरकार उचलणार आहे. या नव्या मंजुरीमुळे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधल्या जाणाऱ्या
एकूण घरांची संख्या ४७ लाख ५२ हजारावर पोहोचणार आहे.
****
राष्ट्रीय
किसान महासंघानं केलेल्या घोषणेवरुन राज्यातले शेतकरी आजपासून दहा दिवस संपावर गेले
आहेत. संपूर्ण कर्जमाफी, वीजबिल माफी, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव या
मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
नाशिक
जिल्ह्यात शेतकरी संपाचा फारसा परिणाम जाणवत नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
लासलगाव इथं कांदा लिलाव सुरु आहेत, मात्र आवक कमी आहे.
****
राज्याचे
कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या पार्थिव देहावर बुलडाणा जिल्ह्यात खामगाव या त्यांच्या
मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर
भाजप नेते याठिकाणी उपस्थित आहेत. फुंडकर यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं काल मुंबईत
निधन झालं, ते सदुसष्ठ वर्षांचे होते.
****
औरंगाबाद
इथल्या जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांमध्ये तिकीट केंद्राची जागा बदलून हे केंद्र
इंडो-जपान केंद्रात सुरू करण्यात यावं, अशी मागणी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ.महेश शर्मा यांच्याकडे केली आहे. नवी दिल्ली इथं रावल
यांनी शर्मा यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. भारत आणि जपान यांच्या
संयुक्त विद्यमानं अजिंठा-वेरूळ लेण्यांजवळ इंडो-जपान केंद्र उभारण्यात आलं असून, या
केंद्रालाही पर्यटकांनी भेट द्यावी हा यामागाचा उद्देश असल्याचं रावल यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद
कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान राबवण्यात येत असून,
याअंतर्गत आज औरंगाबाद इथं खरीप मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या
उत्पन्नात दुपटीनं वाढ करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
****
२००९
सालच्या आय पी एल क्रिकेट स्पर्धेत फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसुली
संचालनालयानं भारतीय क्रिकेट मंडळ, मंडळाचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन, आयपीएलचे माजी
आयुक्त ललीत मोदी आणि इतरांना एक अब्ज २१ कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. २००९ मध्ये
दक्षिण आफ्रिकेमध्ये आयपीएलच्या आयोजनासाठी दोन अब्ज ४३ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम
देशाबाहेर नेण्यासाठी विदेशी चलन व्यवस्थापन कायद्याचं कथित उल्लंघन झाल्याप्रकरणी
संचालनालय तपास करत आहे.
****
No comments:
Post a Comment