Tuesday, 19 June 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 19.06.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 19 June 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

जम्मू कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी राज्यपाल एन एन वोहरा यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. पीपल्स डेमोक्रॅटीक पक्षाच्या नेतृत्वाखालच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षानं घेतल्यामुळे, मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार अल्पमतात आल्यामुळे, त्यांनी हा राजीनामा दिला. तत्पूर्वी नवी दिल्लीत भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी, जम्मू काश्मीरमधल्या पीपल्स डेमोक्रॅटीक पक्षाच्या सरकारमधून भाजप बाहेर पडत असल्याचं सांगितलं. जम्मू काश्मीरमधली सगळी परिस्थिती लक्षात घेत, तिथं राष्ट्रपती राजवट आणावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. मुफ्ती सरकारला राज्यातली परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, पीडीपीसोबत सरकार स्थापन करण्यास इच्छुक नसल्याचं काँग्रेस पक्षाचे नेते गुलाम नबी आझाद, तसंच नॅशलन कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला यांनी वार्ताहरांशी बोलतांना स्पष्ट केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी साडेनऊ वाजता दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून देशातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारनं उचलेल्या पावलासंदर्भात पंतप्रधान शेतकऱ्यांबरोबर थेट संवाद साधतील, असं कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी सांगितलं. जालना जिल्ह्यात खरपुडी इथल्या कृषि विज्ञान केंद्रात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार आहे.

****

केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं उद्‌घाटन केलं. सर्व शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी ही लायब्ररी उपयोगी ठरणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. विद्यार्थ्यांना गूगल प्ले स्टोअरवर, तसंच एन डी पी डॉट आय आय टी के जी पी डॉट एसी डॉट इन या संकेतस्थळावर ही लायब्ररी उपलब्ध होईल. या लायब्ररीत २०० पेक्षा जास्त भाषांमधले ३५ लाखाहून अधिक ई पुस्तकं उपलब्ध आहेत.

****

आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेनेचीच सत्ता येईल आणि मुख्यमंत्री होईल असा विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावरच लढवण्याचे संकेत दिले. मुंबई इथं आज शिवसेनेचा ५२व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. जम्मू काश्मीर सरकारमधून पाठिंबा काढल्याबद्दल त्यांनी भारतीय जनता पक्षाचं अभिनंदन केलं, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक धोरणांवर टीका केली.

दरम्यान, या मेळाव्यात सकाळच्या सत्रात बोलताना लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांनी, इतर राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष सत्तेवर आले मात्र, शिवसेनेला मात्र राज्यात आजपर्यंत एकहाती सत्ता मिळाली नाही, याची कारणं शोधण्याची गरज व्यक्त केली.

****

सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातल्या धामणी या गावात पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्यानं गर्भलिंग निदान करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. नाथा सहदेव खाडे असं त्याचं नाव असून, तो इयत्ता नववीपर्यंतच शिकला आहे. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई केली असून, खाडे याच्याकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

****

बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयावर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. पेरणीपूर्वी पीक कर्ज आणि पिक विम्याची रक्कम न मिळाल्यास शेतकरी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करतील असा इशारा, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरी यांनी यावेळी दिला.

****

ठाण्याचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह, यांनी मुंबईतून ठाण्यामध्ये बदली झाल्यानंतर मुंबईतलं शासकीय निवासस्थान न सोडता दोन्ही शासकीय निवासस्थानांचा वापर केल्याचं माहिती अधिकारामध्ये उघड झालं आहे. तब्बल तीन वर्ष या निवासस्थानांचा वापर केल्याबद्दल सिंह यांनी दंडापोटी २० लाख ६४ हजार रुपये भरल्याची माहिती पोलिस कार्यासन अधिकारी नम्रता लबदे यांनी दिली.

****

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव जवळ दरेगाव इथं मुंबई आग्रा महामार्गावर चारचाकी बोलेरो मोटारीचं टायर फुटून झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. आज पहाटे हा अपघात झाला. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी मुंबईला निघालेल्या धुळ्याच्या शिवसेना पदाधिकारी तसंच शिवसैनिकांच्या गाडीला हा अपघात झाला आहे.

****

भुसंपादनाच्या मोबदला प्रकरणात शेतकऱ्यांच्या रकमेचा अपहार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले धुळ्याचे शिवसेना महानगर प्रमुख सतीष महाले आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विनायक शिंदे यांना आज पुन्हा सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. धुळे तालुक्यातल्या राम बोरीस इथल्या आदिवासी शेतकऱ्याच्या जमिनीचा वाढीव दोन कोटीचा भुसंपादन मोबदला परस्पर लाटण्यात आल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...