Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 01 August 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ ऑगस्ट २०१८ सकाळी ६.५० मि.
****
v राज्य सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाची
मान्यता
v अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या, व्याज परतावा
योजनेत मराठा समाजातल्या तरुणांना, पत हमी देण्याचा निर्णय
v न्यायमूर्ती बी. एच. लोया मृत्यूप्रकरणाचा पुनर्तपास करण्याची,
मुंबई वकील संघाची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
आणि
v
१३ कोटी वृक्ष लागवड
कार्यक्रमाची सांगता; वृक्षारोपणात
औरंगाबाद जिल्हा पहिल्या तर नांदेड
जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर
****
राज्य सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्यास राज्य
मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात
आला. सहकारी गृहनिर्माण संस्थांचं कामकाज आणि प्रशासन अधिक सुलभ आणि परिपूर्ण व्हावं,
हा या निर्णयाचा उद्देश आहे. या सुधारणेमुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांशी संबंधित नियमांमध्ये
स्वतंत्र तरतुदी समाविष्ट झाल्या आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्था या नफा मिळविण्याच्या
उद्देशानं स्थापन झालेल्या नसल्यानं मोठ्या संस्थांचे नियम या संस्थांना लागू करताना
कामकाजात अडचणी निर्माण होत होत्या, त्यामुळे अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात
आला आहे.
****
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या, व्याज
परतावा योजनेत सहभागी होणाऱ्या, मराठा समाजातल्या तरुणांना, कर्जासाठी पत हमी देण्याचा
निर्णय, काल घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.
पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणसबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची काल
बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. एम.फील तसंच पीएच.डी. संशोधन करणाऱ्या
विद्यार्थ्यांना ‘सारथी’मार्फत विद्यावृत्ती देणं, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी
पुण्यात अद्ययावत मार्गदर्शन केंद्र उभारणं, तसंच इतर ठिकाणी मार्गदर्शन घेणाऱ्यांचे
शुल्क भरण्यासंदर्भात विशेष योजना तयार करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****
मराठा समाज आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल
लवकरात लवकर प्राप्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला
आहे. ते काल मुंबई इथं एका कार्यक्रमात बोलत होते. मराठा समाजाला कायदेशीरदृष्ट्या
टिकणारं आरक्षण मिळावं, ही सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय जनता
पक्ष सत्तेत आल्यानंतर पहिला कायदा हा मराठा आरक्षणाचा केला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. आंदोलकांनी कायदेशीर बाबी समजून घ्याव्यात, स्वत:चा जीव गमावू नये, हिंसाचार
करु नये, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी सर्व परवानग्या मिळवल्या असून, स्मारकाच्या उंचीवरुन
राजकारण होणं, ही बाब दुर्दैवी असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत गृह विभागाची
बैठक घेऊन, राज्यातल्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर,
गृह विभागाचे सचिव आणि अधिकारी उपस्थित होते.
****
मराठा
आरक्षणाच्या मागणीसाठी काल औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या मन्याड धरणाजवळ
पाण्यात उतरून आंदोलन करण्यात आलं. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
खुलताबाद तालुक्यात
बाजार सावंगी इथं इंदापूर फाट्यावर काल आंदोलकांनी एसटी बसवर दगडफेक करून बस
पेटवण्याचा प्रयत्न केला. परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यात सकल मराठा समाजाच्यावतीनं
मुंडण आंदोलन करण्यात आलं.
लातूर इथं, मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह
वक्तव्याबद्दल खासदार नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.
नाशिक-पुणे महामार्गावर
आंदोलकांनी रास्ता रोको केला, त्यामुळे नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बस, शिवशाही बसच्या ६६ फेऱ्या रद्द
करण्यात आल्या होत्या. कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिराच्या दारात जागरण गोंधळ घालण्यात
आला. धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा इथं सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निदर्शनं
करण्यात आली.
जालना जिल्ह्यातल्या सकल मराठा
समाज बांधवांनी आरक्षणाची घोषणा होईपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार केला
आहे. आज सकाळी १० वाजता संभाजी उद्यानालगत असलेल्या संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन
करून ठिय्या आंदोलनास प्रारंभ होणार आहे.
****
देशभरात विविध राज्यांमध्ये घुसखोरी केलेल्या रोहिंग्यांना
राज्य सरकारंही देशाबाहेर काढू शकतात, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्ट
केलं आहे. ते काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विविध सदस्यांनी उपस्थित केलेल्या
रोहिंग्या घुसखोरांच्या विषयावर बोलत होते. गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भात
बोलताना, रोहिंग्या घुसखोरांना म्यांमारमध्ये परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं
सांगितलं.
****
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग
न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यूचा, विशेष तपास पथकामार्फत पुनर्तपास
करण्याची, मुंबई वकील संघाची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. १ डिसेंबर
२०१४ रोजी नागपूर इथं एका विवाहासाठी जात असताना लोया यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं
मृत्यू झाला होता, मात्र त्यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या बहिणीनं संशय व्यक्त केल्यानंतर
स्वतंत्र चौकशीची मागणी करण्यात आली होती.
****
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी तसंच
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती, यानिमित्तानं त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात
येत आहे. या निमित्तानं शैक्षणिक संस्थांमधून वक्तृत्व स्पर्धांसह इतर कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
*****
सरकारनं
वस्तू आणि सेवा कर विवरण अर्जाचे नवीन मसुदे जारी केले आहेत. सहज आणि सुगम या
नावानं जारी केलेल्या या मसुद्यांवर तज्ज्ञांची मतंही मागवली आहेत. जे व्यवसाय
फक्त ग्राहकांना सेवा देतात त्यांच्यासाठी सहज हा अर्ज, आणि
जे व्यवसाय ग्राहक आणि अन्य व्यवसाय या दोन्हीशी संबधीत आहेत त्यांच्यासाठी सुगम
हा अर्ज असल्याचं केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागानं म्हटलं आहे. हे
अर्ज जानेवारी २०१९ पासून अंमलात येतील.
****
राज्य
सरकारच्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाची सांगता
झाल्याची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल घोषणा केली. राज्य
सरकारनं पुढच्या वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवल्याचंही मुनगंटीवार
म्हणाले. एक जुलैपासून सुरु
झालेल्या या अभियानात काल
दुपारी तीन वाजेपर्यंत १४ कोटी ७१ लाख ८८ हजार ४१७
वृक्षांची लागवड झाल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. या अभियानात औरंगाबाद जिल्हा
पहिल्या क्रमांकावर, नांदेड दुसऱ्या, चंद्रपूर
तिसऱ्या तर यवतमाळ जिल्हा चौथ्या क्रमांकावर राहिला. पर्यावरणस्नेही लोकांच्या येत्या १ सप्टेंबरपर्यंत जिल्हानिहाय
समित्या नियुक्त करून लागवड करण्यात आलेल्या १३ कोटी वृक्षांची दर सहा महिन्यांनी गणना
केली जाणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
ज्या
शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला येईल, त्या
कुटुंबाला वन विभागामार्फत पाच फळझाडं आणि पाच सागांची झाडं भेट दिली
जाणार असून, ही मोहीम एक ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान राबवली जाणार असल्याचं वनमंत्र्यांनी यावेळी
जाहीर केलं. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, पुढेही
असाच प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
****
मराठवाड्यात
बांबू लागवड झाली तर मराठवाड्याचं चित्र बदलू शकतं, असा विश्वास महाराष्ट्र बांबू विकास
मंडळाचे कार्यकारी संचालक थंगम साईकुमार रेड्डी यांनी व्यक्त केला आहे. लातूर जिल्ह्याच्या
औसा तालुक्यातल्या लोदगा इथं ५१ हजार बांबू लागवड योजनेचा शुभारंभ काल करण्यात आला,
त्यावेळी ते बोलत होते. बांबू लागवड, संवर्धन
आणि विक्रीची माहिती देणारं केंद्र लोदगा परिसरात उभारलं जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात
आलं.
****
जळगाव तसंच सांगली,
मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. या दोन्ही
महानगरपालिकांची निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढवत आहेत तर, काँग्रेस
आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली आहे. परवा मतमोजणी होणार आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील वैरागगड या गावात
पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या माध्यमातुन १०० घरांना अत्यल्प किमंतीत गॅस जोडणी मिळाली आहे.
गावातील प्रत्येक घरात स्वंपाकाच्या गॅसची जोडणी मिळवुन दिल्यामुळे वैरागगड हे
जिल्ह्यातील पहिले धुरमुक्त गाव झाले आहे. या संदर्भात गावातल्या
लाभार्थ्यांशी आमचे वार्ताहर अरूण समुद्रे यांनी संवाद साधला.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील वैरागगड मधील
महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळाल्याचा आनंद केंद्र सरकारच्या योजनेला धन्यवाद
देऊन महिला व्यक्त करीत आहे.
माझ नाव संगिता पुतनराव तूपकर, अगोदर आमच्या घरी
गॅस नव्हता. त्याच्या मुळे आम्हाला जेवण बनवण्यासाठी खूप परेशानी व्हायची आमची. आणि
आमची आई शेताला जाऊन २ किलोमीटरवरून जळण आणायची चुलीसाठी. पाऊस पडल्यानंतर ते जळण ओलं
व्हायचं. आणि आमची चूल पेटायची नाही. आम्हाल गॅसवर.. लगेच पेटतो गॅस. आणि आम्ही टाईमवर
जेवण बनवून खाऊ शकतो.
---- अरूण समुद्रे
आकाशवाणी बातम्यासाठी लातूर.
****
जालना जिल्ह्याचे नवीन
पोलिस अधीक्षक एस चैतन्य यांनी काल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते पोलिस
अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी त्यांना पदाची सूत्रं सोपवली.
*****
***
No comments:
Post a Comment