Monday, 6 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.08.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 August 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ ऑगस्ट २०१ सकाळी .५० मि.

****



vयेत्या नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाची वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही; मेगाभरतीला स्थगिती

vआरक्षण प्रश्नी राज्यात अद्याप आंदोलन सुरू

vऔरंगाबादच्या कचरा समस्येवर मात करण्यासाठी केंद्रसरकारकडून महापालिकेला पहिल्या टप्प्यात १६ कोटी ६ लाख रुपये

आणि

vजागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पी. व्ही. सिंधू उपविजेती; आयसीसीच्या कसोटी मानांकनात विराट कोहलीची अव्वल स्थानावर झेप

****



 येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत मराठा आरक्षणाबातची सर्व वैधानिक प्रक्रिया राज्य सरकार पूर्ण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत राज्यात मेगा भरतीला स्थगिती देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.



 आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून राज्यातल्या जनतेशी मुख्यमंत्र्यांनी काल संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. 'मेगाभरतीमुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना, तरुणांमध्ये निर्माण होऊ नये म्हणून मेगा भरतीला स्थगिती देत असल्याचं ते म्हणाले..



मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की, या मेगाभरतीमध्ये कुठल्याही प्रकारे मराठा समाजाच्या तरुणावर अन्याय होणार नाही, याची काळजी राज्यसरकार घेतेय. आपण अद्याप मेगाभरतीची कारवाई सुरू केली नाही. एकीकडे एसी, एसटी, ओबीसी वर अन्याय होऊ न देता, मराठा समाजाला न्याय कसा देता येईल हा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे. त्या संदर्भातील कायदेशीर कार्यवाही आपण पूर्ण करतो आहे. आणि जोपर्यंत आपण ही कायदेशीर कार्यवाही पूर्ण करणार नाही तोपर्यंत मेगाभरती आपण सुरू देखील करणार नाही आहोत.



 राजकीय पक्षांना आवाहन करतांना ही वेळ राजकीय कुरघोडी करण्याची नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आंदोलन, संघर्षाऐवजी संवादातून मार्ग काढण्याचं आवाहन त्यांनी यावेळी सर्वांना केलं. ते म्हणाले…

 

 आपण समाजाचं नेतृत्व करा, समाजाला योग्य दिशा द्या, सरकार सोबत चर्चा करा या चर्चेच्या माध्यमातून समाजाला उचित दिशा देण्याचं काम आपण करू. मला याची कल्पना आहे. की, माझ्या या बोलण्यातून देखील काही लोक विपर्यास करतील. पण त्यांना देखील माझं आवाहन आहे. शब्दाचा खेळ करण्याची, शब्दच्छल करण्याची ही वेळ नाही. आज आपण समाजाला कशाप्रकारे दिलासा देऊ शकू याचा प्रयत्न करण्याची, याचा विचार करण्याची ही वेळ आहे. राजकीय नेत्यांना देखील माझं आवाहन आहे. आता ही वेळ राजकीय कुरघोडीची नाही. ही वेळ सत्तापक्ष आणि विरोधी पक्षाची नाही. ही वेळ आपण सर्वांनी एकत्रित येऊन समाजाचे प्रश्न सोडवण्याची आहे.



  मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचं काम सुरु असून, गुंतवणूकदारांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं ते म्हणाले. आरक्षणासाठी आत्महत्या आणि हिंसाचार न करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी मराठा तरुणांना केलं.

.

****



 मराठा आरक्षणाचा प्रश्न अगोदरच्या आणि सध्याच्याही सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळे चिघळला आहे, असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. पुणे इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते. आरक्षणाबाबत निर्णय होईल. आंदोलकांनी आत्महत्या, हिंसाचार करु नये, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

****



 मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची मानसिकता योग्य नाही, अशी टीका भारतीय रिपब्लिकन पक्ष -बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते काल अमरावती इथं बोलत होते. संविधान वाचवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांना आमची साथ राहील. काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर राज्यातल्या लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवू, असं ते म्हणाले.

****



 दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या दिग्रसवाडी इथंल्या एका युवकानं स्वतःला पेटवून घेऊन काल आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यानं सामाजिक संपर्क माध्यमावर याबाबत माहिती दिली होती. मृत युवकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपये तसंच कुटुंबातल्या एका व्यक्तीला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्याची लेखी हमी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यावर, कुटुंबीयांनी आंदोलन मागे घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं सांगितलं.



 औरंगाबाद इथं काल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या घरासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाचं सरकारच आरक्षण देईल, अशी ग्वाही बागडे यांनी यावेळी दिली, मात्र आंदोलकांचं समाधान न झाल्यानं त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. राज्यात

धुळे, सातारा, कोल्हापूर इथंही काल आंदोलन सुरू होतं.

****

 धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी काल सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं मुंडण करून चंद्रभागा नदी पात्रात आंदोलन करण्यात आलं. येत्या ३० ऑगस्टला औरंगाबाद इथं धनगर समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला असल्याचं समाजाचे नेते संतोष सुळे यांनी यावेळी सांगितलं.

*****



 नोटबंदीनंतर देशात अनेक उद्योग बंद झाले असून, जवळपास साडेतीन कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते काल नवी मुंबईत आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कर्मचारी मेळाव्यात बोलत होते. महत्त्वाच्या मुद्यांमध्ये लक्ष घालण्याऐवजी पंतप्रधान योगासनं करण्यात मग्न असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. केंद्र सरकारनं देशभरात २४ लाख जागा भरल्या नसून, पोलिसांच्या ५लाख ४० हजार तर शिक्षकांच्या १० लाख जागा रिक्त असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. या रिक्त जागा भरल्या तर, आरक्षणाची गरजच राहणार नाही. मराठीचं अस्तित्व शहरातून पुसलं जाणार नाही, यासाठी प्रयत्न करायचं आवाहन ठाकरे यांनी कामगारांना केलं.

****



 औरंगाबाद शहरातल्या कचरा समस्येवर मात करण्यासाठी केंद्रसरकारनं औरंगाबाद महानगरपालिकेला पहिल्या टप्प्यात १६ कोटी ६ लाख रुपयांचा मिळाला आहे. या निधीतून कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी शहरात ४ ठिकाणी प्रक्रिया केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. या निधीतून वाहन आणि यंत्र खरेदी करण्यात येईल तसंच जनजागृती साठी हा निधी वापरण्यात येणार आहे. शहरातल्या घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्रसरकारकडून एकूण ३२ कोटी १२ लाख ८२ हजार रुपये निधी मिळणार आहे.

****



 केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचा लाभ देशातल्या छोटया उद्योजकांना मोठया प्रमाणात होत आहे. या योजनेच्या एक लाभार्थी बीड इथल्या करुणा संजय मगर यांनी त्यांचे अनुभव सांगितले.



मी बीड येथील जनशिक्षणसंस्थान या संस्थेच्या माध्यमातून किमान कौशल्य या योजनेच्या माध्यमातून ब्युटीपार्लरचा कोर्स पूर्ण केला. तसेच मुद्रा या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेऊन मी माझे ब्युटीपार्लर हे देखील सुरू केले. सरकारच्या या योजनेचा मला खूप आधार मिळाला.जेणे करून आज मी माझ्या पायावर सक्षमपणे उभी आहे.

****



 चीनमधल्या नानजिंग इथं झालेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीननं सिंधुचा २१- १९, २१ - १० असा पराभव केला आणि सिंधु रौप्य पदकाची मानकरी ठरली.

****

 भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - आयसीसीच्या कसोटी मानांकन यादीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. सचिन तेंडुलकर नंतर कसोटी क्रमवारीत पहिला क्रमांक मिळवणारा कोहली सातवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. लोकेश राहुल १९व्या, अजिंक्य रहाणे २२व्या, तर शिखर धवन आणि मुरली विजय २३व्या स्थानावर आहेत.

****



 परिवर्तनवादी चळवळीतले ज्येष्ठ  विचारवंत आणि काँग्रेस नेते प्रेमानंद रुपवते यांच्या पार्थिवावर काल सायंकाळी मुंबईत दादर इथं अंतिम संस्कार करण्यात आले.  केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी रुपवते यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****



 केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वतीनं देशातल्या सर्व जिल्ह्यांचं गुणांकन ठरवण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार असून, यात ग्राम पंचायतींनी पुढाकार घेऊन गावस्तरावर मोठ्या प्रमाणात स्वच्छता करावी, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केलं आहे.

*****

***0

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 11 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...