Monday, 20 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.08.2018 13.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 August 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० ऑगस्ट २०१ दुपारी १.०० वा.
****

 पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून भारताबाहेर पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी इंग्लंडमध्ये असल्याच्या वृत्ताची इंग्लंडनं पुष्टी केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयनं, इंग्लंडकडे त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्याच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या धोरणांमुळे आर्थिक अस्थिरतेत मोठी वाढ झाल्याची टीका, केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी केली आहे. युपीए सरकारच्या काळात वित्तीय शिस्तीत सूट देण्यात आली आणि बँकींग यंत्रणेला बेहिशेबी कर्ज द्यायला सांगण्यात आलं, मात्र त्यामुळे बँका संकटात येतील, हा विचारही केला गेला नाही, असं जेटली म्हणाले. राष्‍ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या उपसमितीनं २०११-१२ वर्षाला आधारभूत मानत, सकल देशांतर्गत उत्पादनासंदर्भात, वर्तवलेल्या अनुमानाबाबत सध्या वाद सुरू आहे. जेटली यांनी आपल्या मुद्यांचं समर्थन करताना, १९९९ सालापासून २०१७-१८ सालापर्यंतची वित्तीय तूट, बँकांची वाढती कर्जं, चलनफुगवटा आणि चालू खात्यातल्या शिलकीचा संदर्भ दिला. २००४ साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी, सत्तेतून बाहेर पडली, तेव्हा आर्थिक विकास दर आठ टक्क्यांपेक्षा जास्त होता, याकडेही जेटली यांनी लक्ष वेधलं.
****

 केरळमध्ये सुमारे सात लाख २४ हजार पूरग्रस्तांनी पाच हजार ६४५ मदत शिबीरांमध्ये आश्रय घेतला आहे. मदतकार्यामध्ये आता अन्नपदार्थ, पाणी, औषधं पुरवण्यावर तसंच जीवनावश्यक सेवा पूर्ववत करण्यावर भर द्यावा असे निर्देश राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीनं दिले आहेत. काल दिवसभरात पूर आणि मुसळधार पावसात आणखी १४ जणांचा मृत्यू झाला. गेल्या १० दिवसात पुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता २१० झाली आहे. पूरग्रस्तांसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ६० टन औषधं पाठवणार आहे. ज्ज्ञ    डॉक्टरांची सहा पथकं सज्ज ठेवण्यात आली आहेत. एअर इंडियाच्या विमानातून मदत साहित्याची वाहतूक विनामूल्य केली जाणार आहे.
****

 संपूर्णपणे स्वदेश निर्मित हेलिनाया क्षेपणास्त्राची काल राजस्थानात पोखरण इथं यशस्वी चाचणी  करण्यात आली. हेलिकॉप्टरवरुन रणगाड्यांवर मारा करु शकणारं हे क्षेपणास्त्र जैसलमेरच्या चंदन पर्वतरांगांमध्ये वापरण्यात आलं. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी संरक्षण, संशोधन आणि विकास संघटनेचं, या यशस्वी चाचणीबद्दल अभिनंदन केलं आहे. या क्षेपणास्त्रामुळं भारतीय लष्कराची ताकद वाढली आहे.
****

 अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज पाच वर्षे पूर्ण झाली. मात्र अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागला नसल्याच्या निषेधार्थ राज्यभर मॉर्निंग वॉक काढून जाब विचारण्यात आला. पुणे इथं अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीनं निषेध फेरी काढण्यात आली. दाभोलकर यांच्या हत्येमागच्या मुख्य सूत्रधाराला लवकरात लवकर पकडण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर यावेळी उपस्थित होते.

लातूर शहरातही निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला.
****

 बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथं सहा दुकानांना आग लागून मोठं नुकसान झालं. आज पहाटे ही आग लागली. अग्निशमन दलानं आग विझवण्याचा प्रयत्न केला.
****

 नांदेड शहरात गेल्या २१ तासात ३७ पूर्णांक ७० दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरात आज सकाळपासून पाऊस पुन्हा सुरु झाला आहे. लातूर शहरातही आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे.
****

 इंडोनेशियत सुरु असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाज दीपक कुमारनं १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक पटकावलं.

 महिलांच्या कुस्तीमध्ये ५० किलो वजनी गटात विनेश फोगाटनं, तर ५७ किलो वजनी गटात पूजा धानदानं उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. विनेशनं चीनच्या सून यान हिला आठ - दोन असं, तर पूजानं थायलंडच्या सुकद ओरासाला १० - शून्य असं हरवलं. उपान्त्यपूर्व फेरीत विनेशचा सामना कोरियाच्या किम ह्यून जो बरोबर होणार आहे.

 बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधूच्या नेतृत्वातल्या भारतीय महिला संघाला आज उपान्त्यपूर्व फेरीत जपानकडून तीन - एक असा पराभव पत्करावा लागला. तर के श्रीकांतच्या नेतृत्वाखालच्या पुरुष संघाचा सामना इंडोनेशियाविरुद्ध होणार आहे.

 या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एक सुवर्ण, एक कांस्य आणि एक रौप्य पदक पटकावत पदक तालिकेत आठवं स्थान मिळवलं आहे. चीन पहिल्या, जपान दुसऱ्या, तर दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर आहे.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ ऑगस्टला रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा सत्तेचाळीसावा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार ‘एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य’ या क्रमांकावर, माय जी ओ व्ही ओपन फोरम वर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...