Tuesday, 21 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.08.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२१ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता

****

 राज्यात अनेक ठिकाणी कालपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर आज सकाळीही कायम आहे. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. उस्मानाबाद मध्ये काल दुपारपासून तसंच वाशिम आणि जालन्यामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात नेवासे, शेवगाव आणि श्रीरामपूर या तालुक्यांसह इतर तालुक्यांतही, जोरदार पाऊस झाल्याचं आणि रात्री पासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 नांदेड शहरालगतच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे आज पहाटे उघडण्यात आले . नांदेड जिल्ह्यातल्या सीता नदीला पूर आला असून, मुदखेड शहरात सखल भागातल्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. नांदेडमध्ये मात्र आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. भंडारा जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीवरच्या गोसेखुर्द धरणाचे सगळे, तेहतीस, दरवाजे एक मीटरनं उघडण्यात आले असून या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 ठाणे जिल्ह्यातला महत्त्वाचा मार्ग असलेल्या माळशेज घाटातली वाहतूक आज सकाळी दरड कोसळल्यामुळे बंद करण्यात आली आहे. कोसळलेली दरड दूर करण्याचं काम प्रगतीपथावर आहे.

****

 केरळमधली पूरस्थिती तसंच मदत कार्याचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची काल नवी दिल्लीमध्ये गेल्या पाच दिवसातली पाचवी बैठक झाली. केरळमध्ये आता पाऊस कमी झाल्याची तसंच पाणीपातळी उतरत असल्याने, मदतकार्याला वेग आल्याची माहिती, केरळच्या मुख्य सचिवांनी दिली. केरळमध्ये सध्या  तीन हजारहून जास्त शिबिरांमध्ये सुमारे साडेतीन लाख लोकांनी आश्रय घेतला आहे.

****

 आशियायी क्रीडा स्पर्धेत नेमबाज सौरभ चौधरीनं १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेतला. भारताचं हे तिसरं सुवर्ण पदक आहे. अभिषेक वर्मानं याच स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं.

 दरम्यान, महिला कुस्तीचं सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरल्याबद्दल विनेश फोगाट हिचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. विनेशच्या या यशामुळे इतर भारतीय खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असं ते म्हणाले.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीन...