Friday, 3 August 2018

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 03.08.2018 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 August 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ ऑगस्ट २०१ सकाळी .५० मि.

****

§   मागासवर्गीय आयोगाला वैधानिक दर्जा देणारं घटना दुरूस्ती विधेय लोकसभेत मंजूर

§   मराठा समाजाला कालबद्ध आणि निश्चित वेळेत आरक्षण देणार - मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

§   लेखी स्वरुपात ठोस निर्णयापर्यंत आंदोलनाचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

आणि

§   वैतरणा नदीचं ११५ दशलक्ष घनफूट पाणी, गोदावरी खोऱ्यात वळवण्याची मराठवाडा विकास मंडळाची मागणी

****

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला वैधानिक दर्जा देण्याची तरतूद असलेल्या १२३ व्या घटना दुरूस्ती विधेयकाला काल लोकसभेत मंजुरी मिळाली. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लोकसभेनं हे विधेयक पारित केलं होतं, मात्र ऑगस्ट महिन्यात राज्यसभेनं काही सुधारणांसह हे विधेयक पारित करून, ते लोकसभेकडे मंजुरीसाठी परत पाठवलं होतं. लोकसभेनं ही दुरुस्ती फेटाळून लावत दोन तृतीयांशपेक्षा अधिक मतानं हे विधेयक मंजूर केलं. सदनात उपस्थित सर्व चारशे सहा सदस्यांनी विधेयकाला पाठिंबा दर्शवल्याबद्दल संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी आभार व्यक्त करत, राज्यसभेतही हे विधेयक सर्वसंमतीनं मंजूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

****

धार्मिक आणि धर्मादाय संस्थांकडून वाटप करण्यात येणारं अन्न, प्रसाद, लंगर किंवा भंडारा यावरच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसंच एकात्मिक वस्तू आणि सेवा कराची भरपाई करण्यासाठी सरकारनं एक योजना सुरू केली आहे. सेवा भोज योजना असं या योजनेचं नाव असून, २०१८-१९ आणि २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी त्यावर ३२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. समाजात सर्वांना मोफत अन्न देणाऱ्या धार्मिक आणि धर्मादाय संस्थांवरचा आर्थिक बोजा कमी करणं हा योजनेचा उद्देश आहे.

****

मराठा समाजाला कालबद्ध आणि निश्चित वेळेत आरक्षण देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा काढण्यासाठी मुंबईत काल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची बैठक घेण्यात आली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाहिंसाचार न करण्याचं, तसंच आत्महत्ये सारखं टोकाचं पाऊल न उचलण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

****

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात सरकार लेखी स्वरुपात ठोस निर्णय देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, असं मराठा क्रांती मोर्चानं स्पष्ट केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या परळी इथं मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हानिहाय समन्वयकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आरक्षणाबाबत येत्या सात ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा नऊ ऑगस्टपासून राज्यभर ठिय्या आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मराठा आरक्षणासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली मंत्रिमंडळाची उपसमिती रद्द करुन, सर्व निर्णय स्वत: मुख्यमंत्र्यांनी घ्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान सरकारी तसंच खासगी मालमत्तेला नुकसान न पोहोचवण्याचं, तसंच हिंसाचार न करण्याचं आवाहनही मराठा क्रांती मोर्चानं केलं आहे.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काल नांदेड जिल्ह्यातल्या मालेगाव इथं नांदेड-  औरंगाबाद मार्गावर रस्ता रोको आंदोलन, तर नायगाव इथं आमदार वसंतराव चव्हाण यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. लातूर इथं माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरासमोर जलकुंभावर चढून आंदोलकांनी निदर्शनं केली. परभणी जिल्ह्यात सेलू जिंतूर विधानसभेचे आमदार विजय भांबळे यांच्या घरासमोर भजन म्हणून ठिय्या आंदोलन करण्यात आलं

****

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी घोषित करण्यात आलेल्या विशेष पॅकेजची कालबद्ध अंमलबजावणी करण्याचे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. मुंबई इथं यासंबंधीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.     

****

शेतकऱ्यांचं हित तसंच लोकपाल आणि लोकायुक्त्यांच्या नियुक्त्यांसंदर्भात दिलेलं आश्वासन केंद्र सरकारनं पूर्ण न केल्यामुळे येत्या दोन ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांना एक पत्र पाठवलं असून अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगण सिद्धी या आपल्या गावी हे उपोषण करणार असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

वैतरणा नदीचं ११५ दशलक्ष घनफूट पाणी, गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड यांनी म्हटलं आहे. कराड यांच्या अध्यक्षतेखाली काल औरंगाबाद इथं विशेष उपसमितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कृष्णा खोऱ्याचं २५ दशलक्ष घनफूट पाणी मराठवाड्याला देण्याची मागणी केली होती, त्याचाही पाठपुरावा करणार असून, जायकवाडीचं पाणी शेतीसाठी द्यावं अशी मागणी जलसंपदा मंत्र्यांकडे करणार असल्याचंही कराड यांनी सांगितलं.

****

प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या सर्वसामान्य कुटुंबांना अल्पदरात गॅस जोडणी देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५२ हजार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. गॅस जोडणी दिल्याबद्दल आभार मानताना जिंतूर तालुक्यातल्या लिंबाळा गावच्या गोकर्णा कंठाळे म्हणाल्या की,



माझं नाव गोकर्णा गुणाजी कंठाळे राहणार लिंबाळा तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील रहिवासी असून प्रधानमंत्री उज्वला योजना आणली त्यापासून माझ्या घरातली चूल गेली आणि गॅस आला.हे खुप चांगलं झालं.स्वयंपाक लवकर होत आहे.चुलीच्या धुरापासून माझे डोळे घराब होण्याचे थांबले आहे. खुप आभारी आहे.



गॅस जोडणीमुळे घर धूरमुक्त झालं आणि स्वयंपाक लवकर बनण्यास मदत होत असल्याचं सांगतांना सोनपेठ तालुक्यातल्या लासेना गावच्या अर्चना धाडे म्हणाल्या…....



मी अर्चना अरूण धाडे राहणार लासेना तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथील रहिवासी असून मला प्रधानमंत्री उज्वला गॅस योजने चे अंतर्गत माझ्या घरातील चूल जाऊन गॅस आला आहे.त्यामुळे मी लवकरच स्वयंपाक बनू शकते.

****

चीनमधल्या नानजिंग इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीत सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू यांनी उपान्त्यपूर्व फेरी गाठली आहे. मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सात्विक साईराज यांनीही उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीत बी साई प्रणीत हा देखील उपान्त्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे. पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतचं आव्हान मात्र काल उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं.

****

लंडन इथं सुरू असलेल्या महिला हॉकी विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत काल आयर्लंड संघानं भारतीय संघाला पेनल्टी शूट आऊटमध्ये तीन एक नं पराभूत केलं. खेळाच्या निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघ एक एक गोल करून बरोबरीत होते.

****

पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमजुरांच्या नि:शुल्क तपासणीकरिता सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यातल्या ग्रामीण रुग्णालयात एक विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत आरोग्य तपासणी करुन घेणाऱ्या शेतमजुराला प्रमाणपत्र देण्यात येईल, जास्तीत जास्त मजुरांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आरोग्य विभागाचे अप्पर सचिव विजय कुमार यांनी केलं आहे.

****

राज्य शासनाच्या वतीनं हाती घेण्यात आलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात उद्दिष्टाच्या दुप्पट म्हणजे ५८ लाख ३४ हजार ६३२ वृक्षांची लागवड करण्यात आली. हरित सेनेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या नोंदणी मोहिमेतही जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

****

बीड जिल्ह्याचं विभाजन करून, अंबाजोगाई जिल्हा निर्माण करण्यासंदर्भात अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीनं आपला अहवाल शासनाकडे सादर केला आहे. यासंदर्भात जारी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

****

गुलाबी बोंड अळी निर्मुलनासंदर्भात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात काल कार्यशाळा घेण्यात आली. सर्व कृषी साहित्य विक्री केंद्रांमध्ये बोंड अळी निर्मुलनाविषयीच्या सूचनांचे फलक लावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

****

औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांच्या विविध समस्या तत्काळ सोडवण्यासाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं काल विद्यापीठात निदर्शनं करण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन कुलगुरू डॉ.बी..चोपडे यांना देण्यात आलं.

****

मराठा, मुस्लिम, धनगर, कोळी समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी औरंगाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण करण्यात आलं. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

//***********//




No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...