Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 August 2018
Time 18.00 to 18.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ ऑगस्ट २०१८ सायंकाळी ६.०० वा.
****
केरळमध्ये
पूराचं पाणी ओसरण्यास सुरूवात झाली असून, पुरग्रस्त भागातले रहिवाशी पुन्हा आपल्या
घरी परतण्यास सुरुवात झाली आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणावर झालेली अस्वच्छता लक्षात
घेऊन केरळ सरकारनं नागरिकांना स्वच्छता किट्स पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे
आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज केरळच्या तिरूअनंतपूरम्ला भेट दिली. केरळच्या
आरोग्यमंत्री शैलजाकुमारी टिचर आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत
त्यांनी केरळची आरोग्य यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी महाराष्ट्र सक्रीय मदत करील असं
आश्वासन यावेळी दिलं. जीवनावश्यक औषधं आणि आरोग्य क्षेत्रातलं प्रशिक्षित मनुष्यबळ
राज्यातून पाठवण्यात येईल, असं डॉक्टर सावंत यांनी यावेळी सांगितलं.
****
बकरी
ईदच्या उद्याच्या सणानिमित्त राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला
शुभेच्छा दिल्या आहेत. समर्पणभाव, श्रद्धा आणि भक्तीचा संदेश देणारा हा सण सर्वांच्या
जीवनात आनंद, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं
आहे.
****
‘सेंद्रीय
शेती-विषमुक्त शेती’ या राज्य पुरस्कृत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉक्टर पंजाबराव
देशमुख जैविक शेती मिशनची स्थापना करण्याला आजच्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी
देण्यात आली. या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवण्यावर
भर देण्यात येणार आहे.
खुल्या
प्रवर्गासह इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या
विद्यार्थ्यांनाही आता परदेशातल्या उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय या
बैठकीत घेण्यात आला. या योजनेचा लाभ दरवर्षी वीस विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
केंद्र
सरकारच्या राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमाअंतर्गत नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात
विभागीय जेरियाट्रिक केंद्र स्थापन करण्यालाही राज्य मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली.
माजी
पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना या बैठकीत राज्य मंत्रीमंडळानं श्रद्धांजली
अर्पण केली.
****
स्थावर
मालमत्ता नियमन कायदा अर्थात रेराची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र देशामध्ये प्रथम
क्रमांकावर आहे. राज्यात या कायद्याच्या अंमलबजावणीचं प्रमाण नव्वद टक्के इतकं असून,
गृहनिर्माण प्रकल्पांची आणि इस्टेट एजंटांची नोंदणी होण्यामध्ये महाराष्ट्र इतर राज्यांच्या
तुलनेत आठपट पुढे आहे. दिलेल्या मुदतीत ग्राहकांना घराचा ताबा न देणाऱ्या तसंच कामकाजात
अन्य त्रुटी असणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्यातही महाराष्ट्र आघाडीवर आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून नायगाव तालुक्यातल्या मांजरम इथल्या नदीत आज वेगवेगळ्या
दोन घटनांमध्ये चार जण पुरात वाहून गेले आहेत. पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये नांदेड
जिल्ह्यात कालपासून सात व्यक्ती मरण पावल्या आहेत. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस
तासात नांदेड जिल्ह्यातल्या सोळा पैकी बारा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
हिंगोली
जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या येगाव आणि कवडी या गावांना जोडणारा रस्ता कयाधू
नदीला आलेल्या पुरामध्ये वाहून गेला आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधलेला
हा रस्ता वाहून गेल्यामुळे या दोन गावांमधला संपर्क तुटला आहे. या परिसरांतल्या शेतांमध्ये
मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं पिकं नष्ट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
भंडारा
जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या सातही तालुक्यांमध्ये
अतिवृष्टीची स्थिती आहे. या जिल्ह्यातल्या गोसेखुर्द धरणातून सध्या दोन लाख चव्वेचाळीस
हजार घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा
इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या नदीनाल्यांना पूर आले असून, रस्ते वाहतूक मोठ्या
प्रमाणात विस्कळित झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
परभणी
जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे तालुक्यातला
ढालेगाव बंधारा पूर्ण भरल्यानं आज त्याचा एक दरवाजा उघडण्यात आला. सोडलेल्या या पाण्यामुळे
मुदगल बंधाराही आज पूर्ण भरण्याची अपेक्षा असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
देण्यात आला आहे.
बुलढाणा
जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाल्यामुळे येळगाव धरण क्षमतेच्या पंच्याऐंशी टक्के भरलं आहे.
धुळे जिल्ह्यातल्या हतनूर धरणाचेही बत्तीस दरवाजे आज दुपारी उघडण्यात आले असून, तापी
नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गोंदिया
जिल्ह्यातही दोन दिवसा पासून पाऊस सुरू असून, वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचं
वृत्त आहे.
दरम्यान,
येत्या दोन दिवसांत मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस होण्याचा
अंदाज परभणीच्या कृषी विद्यापीठातल्या ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्रानं वर्तवला
आहे.
****
No comments:
Post a Comment