Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 6 August 2018
Time 18.00 to 18.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ६ ऑगस्ट २०१८ सायंकाळी ६.०० वा.
****
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला वैधानिक दर्जा देणारं
१२३वं घटना दुरुस्ती विधेयक दुरूस्त्यांसह राज्यसभेत आज मंजूर झालं. लोकसभेत यापूर्वीच
ते मंजुर झालं आहे. तत्पूर्वी झालेल्या चर्चेला सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री
थावरचंद गहलोत यांनी उत्तर दिलं. समाजातल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना
न्याय मिळवून देणं, हे या विधेयकाचं उद्दीष्ट असल्याचं ते म्हणाले. या आयोगात इतर मागासवर्गीय
समाजातल्या एका महिला सदस्याचा समावेश करण्याचा सरकारनं घेतलेल्या निर्णयावर काँग्रेसचे
बी के हरीप्रसाद यांनी समाधान व्यक्त केलं. तसंच, या आयोगात धार्मिक अल्पसंख्याक समुदायातलाही
एक सदस्य असावा, अशी त्यांनी मागणी केली.
****
देशभरातले टोलनाके बंद
करण्याचा सरकारचा प्रस्ताव नाही असं केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन
गडकरी यांनी आज राज्यसभेत सांगितलं. प्रश्नोत्तरांच्या तासात ते एका पुरवणी प्रश्नाला
उत्तर देत होते. रस्ते आणि महामार्गांच्या
बांधकामात टोलमधून मिळालेल्या पैशाचा हातभार लागतो असं ते म्हणाले. टोलनाक्यांवर वाहतूक अडू नये
याकरता येत्या सहा महिन्यात उपाययोजना करण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं.
****
राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी येत्या गुरुवारी
नऊ ऑगस्टला निवडणूक होणार आहे. अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी आज याबाबतची घोषणा केली. सदस्यांनी येत्या बुधवार
दुपारपर्यंत उमेदवारी प्रस्ताव सादर करावेत, असं त्यांनी सांगितलं. प्राध्यापक पी.जे.कुरियन गेल्या महिन्यात
सेवानिवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त आहे.
****
लोकसभेत अनुसूचित जाती जमाती
अत्याचार प्रतिबंध सुधारणा विधेयक २०१८वर चर्चा सुरु आहे. ॲट्रॉसिटी कायद्याचं मूळ
प्रारुप कायम ठेवण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. यासंदर्भातला सर्वोच्च न्यायालयाचा
निर्णय आल्यानंतर सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली, मात्र याबाबत निर्णय येण्यास
विलंब होत असल्यामुळे सरकारनं हे सुधारणा विधेयक आणण्याचा निर्णय घेतल्याचं सामाजिक
न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी सांगितलं. अनुसूचित जाती जमाती मधल्या
नागरिकांवर अन्याय वाढत असून, सरकार यावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस
नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. भाजपचे विनोद सोनकर, शिवसेनेचे अरविंद सावंत, तेलगु
देसम पक्षाचे रविंद्र बाबु पांडुला यांनी या चर्चेत सहभाग घेत आपलं मत मांडलं.
****
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेनं
कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्यापासून तीन दिवस संप पुकारला आहे.
या संपाला औरंगाबाद जिल्हा महसुल कर्मचारी संघटनेनं पाठिंबा
दर्शवला आहे. या संपात जिल्ह्यातले सर्व महसुल कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती
संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गिरगे यांनी दिली. ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस -
आयटकनंही संपाला पाठिंबा जाहीर केला असून, सर्व कामगारांनी आंदोलनात सहभागी व्हावं,
असं आवाहन केलं आहे. राज्यातल्या शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा,
अंशदायी निवृत्तीवेतन योजना रद्द करुन सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन
योजना लागू करावी, शासकीय खात्याचं खाजगीकरण रद्द करुन रिक्त जागा भराव्यात, यासह अन्य
मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
****
अधिक उत्पादनाच्या नावाखाली
कृषी विद्यापिठानं शिफारस केलेली नसतानाही अनावश्यक पीक वाढ संजिवकांचा वापर शेतकऱ्यांनी
करु नये, असं आवाहन कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी केलं आहे. अशा पिकांवर मोठया
प्रमाणात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होतो असं ते म्हणाले. जे शेतकरी कृषी
विभागाच्या सल्ल्यानुसार गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीडग्रस्त शिफारस केलेल्या
शेतात कीटनाशकाची फवारणी करत आहेत, त्यांना
७५० रुपये प्रति हेक्टर या मर्यादेत जास्तीत जास्त दोन हेक्टर मर्यादेपर्यंत अनुदान
उपलब्ध करुन देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
****
कोळी समाजाच्या जात वैधतेसाठी
मागितला जाणारा १९५० चा पुरावा रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र कोळी समाज संघटनेचे
अनंत तरे यांनी केली आहे. ते आज उस्मानाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. मराठवाड्यात
कोळी समाजाला जातीचे दाखल मिळाले, त्याची वैधता मिळाली, त्यामुळे राज्य शासनानं यासंदर्भात
नेमलेलं विशेष तपास पथक रद्द करावं, प्रत्येक जिल्ह्यात जात पडताळणी समिती स्थापन करावी,
आदी मागण्याही त्यांनी केल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास राज्यात आंदोलनाचा
इशारा संघटनेनं दिला आहे.
****
खासदार डॉ. हिना गावित यांच्यावर
काल धुळे इथं झालेल्या हल्याच्या निषेधार्थ आज नंदुरबार जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात
आला.
कालच्या घटनेनंतर जिल्ह्यातल्या
सर्वपक्षीय नेते आणि संघटनांनी हिना गावित यांच्यावरच्या हल्याचा निषेध करत आज बंदचं
आवाहन केलं होत.
//***********//
No comments:
Post a Comment