Saturday, 3 November 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.11.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03  November 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ नोव्हेंबर २०१  दुपारी १.०० वा.

****



 केंद्र सरकारनं कंपनी सुधारणा अध्यादेश २०१८ जारी केला आहे. या अध्यादेशामुळे कंपनी विषयक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होईल, परिणामी उद्योग करण्यातल्या सुलभतेला प्रोत्साहन मिळणार आहे. हा नवा अध्यादेश, कंपनी अधिनियम- २०१३ अंतर्गत, व्यापार विषयक गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी, सरकारनं नेमलेल्या समितीच्या शिफारशींवर आधारित आहे. संबंधित अधिनियमातल्या सुधारणांनुसार कंपनीशी संबंधित १६ प्रकारचे गुन्हे, विशेष न्यायालयांऐवजी स्थानिक पातळीवर निकाली काढता येतील, त्यामुळे विशेष न्यायालयांवरचा ६० टक्क्यांपेक्षा जास्त ताण कमी होईल. या अधिनियमानुसार इतर कंपन्यांच्या तुलनेत, लहान कंपन्या आणि एका व्यक्तीच्या मालकीच्या कंपन्यांसाठीच्या दंडाची रक्कम निम्मी करण्यात आली आहे.

****



 आतापर्यंत एक कोटी वीस लाख पेक्षा जास्त नागरिकांनी अटल पेंशन योजनेसाठी नोंदणी केली आहे. चालू आर्थिक वर्षात २७ लाख जणांनी या योजनेसाठी नोंदणी केल्याचं अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. इच्छुक नागरिकांना आपलं बचत खातं असणाऱ्या बँक किंवा टपाल कार्यालयातून या योजनेसाठी नोंदणी करता येईल. या योजनेंतर्गत नोंदणी करणाऱ्या नागरिकांना आपल्या गुंतवणुकीच्या प्रमाणात वयाच्या साठाव्या वर्षानंतर दरमहा एक हजार ते पाच हजार रूपये इतकी रक्कम मिळणार आहे.

****



 छत्तीसगढमधल्या सुकमा जिल्ह्यात काल १९ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं, यात आठ महिलांचा समावेश आहे. या नक्षलवाद्यांना राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणाअंतर्गत आवश्यक ती मदत केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

****



 दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांचं जालना शहरात आगमन झालं. दुष्काळासंबंधी मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातल्या अंबड चौफुली ते सिटीजन टी पॉईंट या मार्गावरची वाहतूक भोकरदन चौफुली, मंठा चौफुली मार्गावर वळवण्यात आली आहे.

****



 परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या मध्यस्थीनंतर गेल्या अकरा दिवसांपासून सुरु असलेला ओला उबेर टॅक्सी मालक आणि चालकांचा संप काल रात्री मागे घेण्यात आला. रावते यांच्या सोबत काल मंत्रालयात इंटकचे अध्यक्ष सचिन अहीर आणि ओला उबेर कंपन्यांचे प्रतिनिधी तसंच चालक मालक संघटनांची बैठक झाली. या बैठकीत सर्वमान्य तोडगा निघाल्यानंतर संप मागे घेतल्याचं जाहीर करण्यात आलं. ओला उबेर चालक मालकांना त्यांच्या सेवेसाठी कंपनीकडून अधिक दर मिळावा ही प्रमुख मागणी चालक आणि मालकांची होती, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत इंधनाच्या दरवाढीनुसार दर देण्यास कंपनीनं मान्यता दिली. 

****



 यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव परिसरात १३ ग्रामस्थांची शिकार करणाऱ्या नरभक्षक टी वन वाघिणीला गोळी घालून ठार मारण्यात आलं. तिचा शोध घेणाऱ्या पथकातल्या शिकाऱ्यानं या वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, मात्र वाघिणीनं आक्रमक होऊन शोध पथकावर चाल केल्यामुळे तिच्यावर बंदुकीतून गोळी झाडली गेली, त्यात तिचा मृत्यू झाला. या वाघिणीला जेरबंद करा अथवा ठार मारा, असे प्रधान मुख्य वन संरक्षकांचे आदेश, सर्वोच्च न्यायालयानं ११ सप्टेंबर रोजी कायम ठेवल्यानंतर राळेगावच्या जंगलात ही मोहिम राबवली जात होती. शवविच्छेदनासाठी वाघिणीचं शव नागपुरला नेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 महाराष्ट्रात कित्येक पिढ्यांमध्ये लोकप्रिय ठरलेला गीतरामायण हा कार्यक्रम आता उत्तर प्रदेशातही होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारनं वाराणसी, आग्रा आणि मुजफ्फरनगरमध्ये गीत रामायणाचं आयोजन केलं आहे. गीत - रामायणकार ग. दि. माडगूळकर आणि सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या जानेवारी महिन्यात आनंद माडगूळकर आणि श्रीधर फडके हा कार्यक्रम सादर करतील.

****



 जर्मनीत सारब्रुकेन इथं सुरु असलेल्या सारलॉ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारताच्या शुभंकर डे चा सामना चीनच्या पेन्गबो रेन यांच्याशी होणार आहे. उपांत्यपूर्व सामन्यात ६४ व्या मानांकित शुभांकर ने सातव्या मानांकित इंग्लंडच्या टॉबी पेंटी याला २१ - १६ , २१ - नऊ असा पराभव केला. भारताच्या पारुपल्ली कश्यपचा मात्र उपांत्यपूर्व सामन्यात पराभव झाला. 

****



 भारतीय क्रिकेटपटू यजुवेंद्र चहलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - आयसीसीच्या एकदिवसीय सामन्यांच्या मानांकनात पहिल्या दहा मध्ये स्थान मिळवलं आहे. नुकत्याच वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत चहलनं केलेल्या कामगिरीमुळे त्यानं आंतरराष्ट्रीय मानांकनात आठव्या स्थानावर झेड घेतली. कर्णधार विराट कोहलीनं ४५३ गुणांसह अव्वल स्थान कायम राखलं आहे.

*****

*** 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...