Monday, 5 November 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.11.2018 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 5 November 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ५ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****



 देशाच्या अणु प्रकल्पाचा उद्देश हा जागतिक शांतता आणि स्थिरता राखणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अण्वस्त्रधारी पाणबुडी आयएनएस अरिहन्तचे चालक आणि कर्मचाऱ्यांनी पहिली प्रतिबंधात्मक गस्त यशसवीरित्या पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचं ट्विटरवरुन अभिनंदन केलं. या कामगिरीची देशाच्या इतिहासात नोंद होईल, असं ते म्हणाले. सध्याच्या युगात विश्वासार्ह अण्वस्त्र विषयक प्रतिबंधात्मक व्यवस्था असणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****



 सुदृढ आरोग्याचं जागतिक लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आयुर्वेदासारखी स्वदेशी उपचार प्रणाली महत्वाची भूमिका बजावू शकते, असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज तिसऱ्या आयुर्वेद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आयुर्वेदात संशोधन आणि नवकल्पनांसाठी आपलं मंत्रालय आयुष मंत्रालयाला सहकार्य करेल, असं ते म्हणाले. आयुर्वेद प्रणाली ही देशातल्या अन्य उपचार पद्धतींना प्रोत्साहन देत असल्याचं आयुष मंत्री श्रीपाद नाईक यावेळी म्हणाले.

****



 राज्यातला दुष्काळ निवारणासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे कृषी सन्मान पुरस्कार विजेत्यांना राज्यपालांच्या हस्ते लॅपटॉप वितरीत करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. शेतीमधे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा शेतकऱ्यांच्या हिताचा ठरेल, असं ते म्हणाले. शेती बरोबरच शेती आधारित व्यवसायांमधे उत्तम कामगिरी करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

****



 यवतमाळ जिल्ह्यात अवनी वाघीणीला मारणं ही घटना दुःखद असल्याची प्रतिक्रिया, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार दिवाळी संमेलनात बोलत होते. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी यासदंर्भात प्रतिक्रिया दिली आहे, मात्र अवनीला मारण्याचा निर्णय वन विभागाचा होता, असं ते म्हणाले. अवनीला मारण्याची प्रक्रिया चुकीची असल्याची तक्रार आहे, असं सांगत त्याबाबत चौकशी करु, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. राज्यातल्या दुष्काळावर तातडीनं मदत सुरु केली असून, शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळू लागेल, असंही ते म्हणाले.



 दरम्यान, अवनी वाघीणीला मारल्याच्या मुद्यावरुन केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची अपूर्ण माहिती समोर आली असून, गरज भासल्यास चौकशी करावी, असं त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. 

****



 १९५१ साली आजच्याच दिवशी, पाच नोव्हेंबर रोजी पश्चिम रेल्वेच्या कामाला सुरूवात झाली होती. या दिवसाचं औचित्य साधून आज मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात एक विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए के गुप्ता यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. १९५१ सालापासून आतापर्यंत पश्चिम रेल्वेच्या बदलत गेलेल्या रूपाचा आढावा, तसंच वातानुकुलित रेल्वेगाड्यांचाही परिचय या प्रदर्शनात करून दिला आहे.

****



    बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकात सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी अत्महत्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. यावेळी सुर्यवंशी यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेतल्या. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मागणीनुसार, विही, शेततळे, शैक्षणिक मदत, शेळीपालन, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, घरकुल यासारख्या योजनांचा लाभ त्यांना देण्यात यावा. अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 

****



 हिंगोली जिल्ह्यातल्या पांगरा शिंदेसह कळमनुरी, औंढा नागनाथ परिसरातल्या काही गावात आज पहाटे जमिनीतून गुढ आवाज झाला. एकापाठोपाठ आवाज झाल्यानं नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. गेल्या तीन वर्षांपासून परिसरात अशा प्रकारचे आवाज येत असल्याचं नागरिकांनी सांगितलं.

****



 शिवसेनेचे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड विधानसभेचे प्रमुख संतोष मुरकुटे यांनी आज पक्ष सोडण्याची घोषणा केली. खासदार संजय जाधव यांनी पिळवणूक केल्यामुळे पक्ष सोडत असल्याचं त्यांनी आज वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. यापुढे समाजकार्य करणार असून, वेळप्रसंगी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचंही ते म्हणाले. गंगाखेड मधले अनेक शिवसैनिक आपल्या सोबत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

****



 जालना जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.  दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. द्राक्षवेली बहरात असताना अचानक झालेल्या वातावरणातल्या बदलामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...