Tuesday, 6 November 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.11.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 November 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ नोव्हेंबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø  जागतिक शांतता आणि स्थिरता राखणं हा देशाच्या अणु प्रकल्पाचा उद्देश - पंतप्रधानांचं प्रतिपादन

Ø  कांदा, टमाटा आणि बटाट्याचे भाव वर्षभर एकाच पातळीवर ठेवण्यासाठीचं धोरण केंद्र सरकारकडून मंजूर

Ø  नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना तर

Ø  अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्येष्ठ रंगकर्मी विनायक थोरात यांना जाहीर

 आणि

Ø  लोअर दुधना धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी परभणीत शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन

****



 जागतिक शांतता आणि स्थिरता राखणं हा देशाच्या अणु प्रकल्पाचा उद्देश असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अण्वस्त्रधारी पाणबुडी आयएनएस अरिहन्तचे चालक आणि कर्मचाऱ्यांनी पहिली प्रतिबंधात्मक गस्त यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचं ट्विटरवरुन अभिनंदन केलं. या कामगिरीची देशाच्या इतिहासात नोंद होईल, असं ते म्हणाले. सध्याच्या युगात विश्वासार्ह अण्वस्त्र विषयक प्रतिबंधात्मक व्यवस्था असणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****



 कांदा, टमाटा आणि बटाट्याचे भाव वर्षभर एकाच पातळीवर ठेवण्यासाठीचं धोरण केंद्र सरकारनं मंजूर केलं आहे. २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात केलेल्या ऑपरेशन्स ग्रीन्स या योजनेनुसार या पिकांचे भाव वर्षभर स्थिर ठेवण्यासाठी केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या तरतुदीला केंद्रानं मंजूरी दिली आहे. या बाबत सर्व संबंधितांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आलं आहे, असं अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी सांगितलं आहे.

****



 नरभक्षक अवनी वाघिणीला मारण्याची प्रक्रिया चुकीची असल्याच्या तक्रारी बद्दल चौकशी करु, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईत पत्रकार दिवाळी संमेलनात काल ते बोलत होते. अवनी वाघीणीला मारणं ही घटना दुःखद आहे, मात्र हा वन विभागाचा निर्णय होता, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.



 दरम्यान, काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नरभक्षक वाघिणीला ठार करण्याची सगळी कार्यवाही नियमानुसारच झाली असल्याचं सांगितलं.



 राज्य शासनानं व्याघ्र संवर्धनसाठी अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्यामुळे राज्यात वाघांच्या संख्येत वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे, असं त्यांनी नमूद केलं. वन्य प्राणी आणि मानवांचा संघर्ष होणार नाही या दृष्टीनं जनजागृती करण्यासाठी वन विभागाकडून विविध माध्यमातून माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 राज्य शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जयवंत सावरकर यांना तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्येष्ठ रंगकर्मी विनायक थोरात यांना जाहीर झाला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काल रंगभूमीदिनाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केली. पाच लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे.



 दरम्यान, अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीनं दिला जाणारा प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना काल सांगलीत प्रदान करण्यात आला. ९८व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ति शिलेदार यांच्या हस्ते आगाशे यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

****



 भारतीय संस्कृतीतलं सर्वात मोठं उत्सवपर्व असलेल्या दीपावलीनिमित्त मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या असून, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, या उत्सवाच्या काळात वंचित आणि उपेक्षितांच्या जीवनातही प्रकाशफुलं उमलावीत, यासाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवा जोपासाव्यात, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.



 दरम्यान मुख्यमंत्री आज उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आज सकाळी ११ वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ परिस्थितीबाबत आढावा बैठक घेणार आहेत.

****



 धन्वंतरी दिन तसंच राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचं औचित्य साधून औरंगाबादच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयात काल विशेष आयुर्वेदिक बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एस.व्ही.कुलकर्णी आणि आयुर्वेद व्यासपीठाचे अध्यक्ष डॉक्टर संतोष नेवपूरकर यांच्या हस्ते काल या विभागाचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्हा रुग्णालय आणि आयुर्वेद व्यासपीठ यांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या या विभागात, आयुर्वेद व्यासपीठातर्फे चौदा डॉक्टर्स विनामूल्य सेवा देणार आहेत.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 ज्येष्ठ पत्रकार बा. न. मग्गीरवार यांचं काल सकाळी निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. लोकसत्ता या दैनिकामध्ये यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली. गोवा मुक्तीसंग्राममध्ये त्यांचा सक्रीय सहभाग राहिला होता, आणि त्यासाठी त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता. हैदराबाद मुक्तिसंग्राम, मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन, यासह मराठवाड्यातल्या विविध आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग होता. लोकसत्ता दैनिकाचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले, औरंगाबादमध्येही लोकसत्ता दैनिकाचे ते मराठवाडा विभागाचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. मूळचे हिंगोली जिल्ह्यातले रहिवाशी असलेल्या मग्गीरवार यांच्या पार्थिवावर काल औरंगाबादमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

****



 लोअर दुधना धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात यावं, या मागणीसाठी काल परभणी जिल्ह्यात सेलू इथं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. विविध गावांमधून आलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत, जवळपास दोन तास रस्ता अडवून ठेवल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना सादर केलं. विधीज्ञ श्रीकांत वाईकर, विधीज्ञ टी.ए.चव्हाण, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. 

****



 राज्याचा नागरी भागात राबवण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानामुळे शहरं स्वच्छ होत आहेत. शासकीय अनुदानातून शौचालयं बांधण्यात येत असून यामुळे लाभार्थी कुटुंबांमध्ये समाधानाची भावना आहे. शौचालयामुळे मोठा त्रास कमी झाल्याचं परभणीच्या सुरेखा कांबळे यांनी सांगितलं, त्या म्हणाल्या….



स्वच्छालय नसल्यामुळे बाहेर उघड्यावर जावे लागत होते. मात्र, स्वच्छ भारत अभियानामुळे घरात स्वच्छालय बांधले. त्यामुळे रात्री-बेरात्री बाहेर न जाता घरातचं स्वच्छालयातच सर्वजन जातोत. प्रधानमंत्री यांनी ही योजना आणल्यामुळे आता होणारा त्रास वाचला. धन्यवाद, प्रधानमंत्री.

****



 शिवसेनेचे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संतोष मुरकुटे यांनी काल पक्ष सोडल्याची घोषणा केली. यापुढे समाजकार्य करणार असून, वेळप्रसंगी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं ते म्हणाले.

****



 प्रवाशांकडून जास्त भाडं आकारणाऱ्या खाजगी बसचालक मालकांवर कारवाई करण्याकरता राज्य परिवहन महामंडळाकडून  विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, अशी वाहनं ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे. यासंदर्भात प्रवासी, परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवू शकतात, असं औरंगाबादच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.

****



 जालना जिल्ह्यात काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव, जळगाव जामोद आणि नांदुरा या तीन तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सातारा तसंच वाशीम जिल्ह्यातही काही ठिकाणी काल पाऊस झाला.

****



 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि नागरी पतसंस्थेच्या वतीनं दिवाळी भाऊबीज भगिनी सक्षम प्रकल्प राबवण्यात येत असून औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकावर महिला बचत गटांना फराळ विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या विक्री केंद्रांचं काल खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं.

****



 लातूर जिल्ह्यातली राष्ट्रीय महामार्गाची सुरू असलेली कामं पाण्याअभावी थांबणार नाहीत, असा निर्वाळा जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिला आहे. ते काल मासिक वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांसह इतर रस्ते कामांनी गती घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

****



 येत्या दहा ते चौदा तारखांदरम्यान लातूर इथं, मुलींच्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यातल्या सुमारे सत्तेचाळीस विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...