आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०६ नोव्हेंबर २०१८ सकाळी
११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दीपावली निमित्त केदारनाथ मंदिराला भेट
देणार आहेत. केदारनाथाच्या दर्शनानंतर ते केदार पुरी इथं नवीन बांधकामाची, तसंच पुरानंतर पडझड
झालेल्या भागातल्या विकास कामांची पाहणी करतील. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या
पार्श्वभूमीवर केदारनाथ परिसरात कडक
सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
****
भारतीय संस्कृतीतलं
सर्वात मोठं उत्सवपर्व असलेल्या दीपावलीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या असून, प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन
केलं आहे. तसंच, या उत्सवाच्या काळात वंचित आणि उपेक्षितांच्या जीवनातही प्रकाशफुलं
उमलावीत, यासाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवा जोपासाव्यात, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी
केलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री
आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ११ वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात
दुष्काळ परिस्थितीबाबत आढावा बैठक घेत आहेत.
****
जम्मू
काश्मीरमध्ये शोपियां जिल्ह्यात आज साफनगरी झैनपोरा इथं सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले. चकमक झालेल्या ठिकाणावरुन शस्त्रास्त्रं आणि मोठ्या प्रमाणावर दारुगोळा हस्तगत करण्यात
आला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नसून, परिसरात शोधमोहीम अजूनही सुरू आहे.
****
औरंगाबाद शहरातली वाहतूक बेटं, मोकळ्या जागा, विविध
चौक तसंच रस्ता दुभाजकांचं पालकत्व नामवंत संस्था, प्रतिष्ठानं तसंच व्यक्तींनी स्वीकारावं
आणि अशा ठिकाणांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च उचलून शहर विकासाकरता आपला सहभाग द्यावा,
असं आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केलं आहे. शहरातल्या विविध ठिकाणांच्या
सौंदर्यीकरणासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. शहराच्या विकासासाठी प्रशासना
बरोबरच नागरिकांनीही सहभागी होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
****
लातूर जिल्ह्यातली राष्ट्रीय महामार्गाची सुरू असलेली
कामं पाण्याअभावी थांबणार नाहीत, असा निर्वाळा जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिला
आहे. ते काल मासिक वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांसह इतर रस्ते कामांनी
गती घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
*****
***
No comments:
Post a Comment