Saturday, 3 November 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 03.11.2018....18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 3 November 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला आहे. ते आज हरिद्वारमधल्या पतंजली योगपीठात दोन दिवसीय ज्ञानकुंभाचं उद्घाटन करताना बोलत होते. शिक्षकांनी चांगल्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणं आणि त्यांचे चारित्र्य घडवणं महत्वाचे असल्याचं कोविंद यावेळी म्हणाले.

****

डिजीटल इंडियाच्या माध्यमातून सरकारचा, स्वस्त, विकसीत आणि सर्वसमावेशक अशा तंत्रज्ञानाच्या मदतीनं सर्वसामान्य नागरिकांना बळ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत ‘आर्थिक समावेश शिखर परिषदे’त बोलत होते. डिजीटल अर्थव्यवस्थेला दहा लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं सरकारचं लक्ष्य असल्याचं प्रसाद यावेळी म्हणाले. तसंच आधारची माहिती अतिशय सुरक्षित असल्याचं सांगत त्याबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नसल्याचं प्रसाद यांनी पुनरुच्चार केला.

****

जालना जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितला सामोरे जाण्यासाठी सरकारकडून आवश्यक सर्व उपाय योजना केल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुष्काळ आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर वार्ताहर परिषदेत ते बोलत होते़. जालना जिल्ह्यात एकूण सरासरीच्या केवळ ६१ टक्के पाऊस झाल्यामुळे कृषी उत्पादनात घट झाली आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता असल्यानं त्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दुष्काळाचं नियोजन करण्याकरता आता आपण विशेषतः पिण्याच्या पाण्याचा आराखडा तयार करण्यास सांगितलेला आहे. त्यासोबतच चाऱ्याच्या संदर्भात देखील आपण आदेश दिले आहेत. डिसेंबरनंतर जो चारा आपल्याला लागेल, त्याचं आत्ताच नियोजन करायचं. जी १२७ कोटीची जालन्याची पिण्याच्या पाण्याची योजना आहे, ही जायकवाडीवरनं आहे. जायकवाडीत पाणीदेखील आहे. त्याच्यामुळे ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करुन ते काम वेळेत पूर्ण केलं पाहिजे. पुढचे तीन चार महिने विशेषतः दुष्काळाशी सामना हा करावा लागणार आहे. आणि त्यादृष्टीनं ही तयारी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आणि सगळी मदत जी आहे, राज्य प्रशासनाच्या माध्यमातनं जिल्ह्यामध्ये ही केली जाईल अशा प्रकारचं देखील आश्वासन मी या ठिकाणी देतो.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना बाजुला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी अरेरावी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातल्या सुपा औद्यगिक वसाहतीत मायडीया टेक्नॉलॉजी पार्कचा कोनशिला अनावरण समारंभही आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. राज्याचं उद्योगस्नेही धोरण आणि औद्योगिक विकासासाठी विविध कायद्यात सुधारणा केल्यानं राज्याच्या परकीय गुंतवणूकीत वाढ होत असून, देशातल्या एकूण परकीय गुंतवणूकीच्या ४९ टक्के गुंतवणूक राज्यात झाली असल्याचं ते म्हणाले.

****

औरंगाबाद शहरातल्या सिडको उड्डाणपुलाखाली दुचाकीस्वार महिलेला बसनं चिरडल्यानं महिलेचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी हा अपघात झाला. मोहीनी कुलकर्णी असं मृत महिलेचं नाव असून, कामगार चौकाकडे जाताना हा अपघात झाला. या घटनेची नोंद एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात करण्यात आली.

****

राज्यातल्या मागासवर्गीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या भरतीच्या मागणीसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आज आंदोलन करण्यात आलं. राज्यात गेल्या चार वर्षापासून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची भरती बंद असल्यामुळे या पदांचा अनुशेष त्वरीत भरण्यात यावा, या मागणीचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं.

****

येत्या जानेवारी महिन्यापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळाला नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश दौंड यांनी दिला आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. नोकर भरती, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचं वय ६० वर्ष करण्यात यावं या प्रमुख मागण्यांसदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून देखील काहीच ठोस निर्णय होत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

****

थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातल्या भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करावं, या मागणीसाठी आज परभणी इथं सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक समितीच्या चार युवकांनी जलकुंभावर चढून आंदोलन केलं. ही मागणी शासनाला कळवण्याचं आश्वासन स्थानिक प्रशासनानं दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 03 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...