Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 November
2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ नोव्हेंबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
केरळमध्ये
शबरीमाला इथलं अय्यप्पा मंदिर आज एका विशेष पूजेसाठी उघडण्यात आलं असून, त्या पार्श्वभूमीवर
मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पूजाविधी सुरक्षितपणे पार पाडण्याबरोबरच
भाविकांच्या सुरक्षेसाठी कमांडोजचं पथक आणि १०० महिलांसह एकूण २३ हजार पोलीस बंदोबस्तासाठी
तैनात आहेत. शबरीमाला आणि परिसरात चार किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावर
बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश उद्यापर्यंत लागू राहतील. सर्वोच्च न्यायालयानं सर्व
वयाच्या महिलांना मंदिरात जाण्याची परवानगी दिल्यानंतर दुसऱ्यांदा हे मंदिर दर्शनासाठी
उघडण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित आदेशाविरोधात गेल्या महिन्यात केरळ
राज्यात तसंच शबरीमला परिसरात हिंसक आंदोलनं झाली होती.
****
बिहारमध्ये
एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर कनिष्ठ पोलिसांनी वरिष्ठ पोलिसांवर
केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारनं १७५ प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांना
बडतर्फ केलं. तर २३ पोलिसांना निलंबित करत ९३ जणांची बदलीही केली आहे. दोन नोव्हेंबर
रोजी एका महिला कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्यानंतर काही कनिष्ठ पोलिसांनी वरिष्ठ पोलिसांवर
केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही कठोर कारवाई करण्यात आल्याचं पाटण्याचे पोलिस
महानिरिक्षक नय्यार हसनैन खान यांनी सांगितलं. या महिला कॉन्स्टेबलला डेंग्यू झाला
होता, मात्र तरीही तिला सुट्टी नाकारण्यात आली होती. त्यानंतर तीनशेपेक्षा जास्त पोलिसांनी
पाटण्यामध्ये पोलिसांच्या वाहनांवर आणि पोलीस अधिकाऱ्यांवरही हल्ला केला, त्यात एक
कर्मचारी जखमी झाला.
****
कर्ज
बुडवेगिरीला आळा घालण्यासाठी डिजिटल व्यवहारांची नोंद करता यावी, या उद्देशानं भारतीय
रिजर्व्ह बँकेनं ‘सार्वजनिक पत नोंदणी’ सुरु केली आहे. यामुळे कर्जबुडवे ग्राहक तसंच
संबंधित प्रलंबित खटल्यांची नोंद करता येईल. सार्वजनिक पत नोंदणीमध्ये सेबी, कॉर्पोरेट
मंत्रालय, वस्तू आणि सेवा कर यंत्रणा तसंच भारतीय कर्ज बुडवेगिरी आणि दिवाळखोरी प्रतिबंधक
मंडळाची आकडेवारी देखील नोंदवली जाईल. या यंत्रणेमुळे बँकेचे सध्याचे आणि संभावित कर्जदार
यांची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल.
****
जागतिक
बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सलग चौथ्या आठवड्यात घसरण झाली आहे. अमेरिकेनं
अलिकडेच आठ देशांना इराण-संबंधी निर्बंधांतून तात्पुरती सूट दिल्यामुळे पुरवठा वाढण्याच्या
शक्यतेमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अमेरिकेच्या वायदे बाजारात कच्च्या
तेलाचे दर सहा पूर्णांक सहा दशांश टक्क्यांनी कमी होऊन ६३ डॉलर १४ सेंट पर्यंत उतरले.
गेल्या दोन महिन्यात जागतिक स्तरावर तेलाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्यामुळे त्याचा
प्रभाव कच्च्या तेलाच्या किमतीवर दिसून येत आहे.
****
ओडिशामधल्या
मलकानगिरी जिल्ह्यात विशेष कारवाई दलानं राबवलेल्या नक्षल विरोधी अभियानात पाच नक्षलवादी
मारले गेले. विशेष कारवाई दलानं काल रात्रीपासून ही मोहीम सुरु केली होती, त्यानंतर
नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. पापलूरु गावाजवळच्या जंगलात मारल्या गेलेल्या
नक्षलवाद्यांचे मृतदेह, तसंच मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि दारुगोळा सापडले असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
परभणी
जिल्ह्यात लोअर दुधना धरणातून कालव्यामध्ये पिकांसाठी पाणी सोडण्यात यावं, या मागणीसाठी
परभणी जिल्ह्यात सेलू इथं आज सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. विविध गावांमधून
आलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत, सुमारे दोन तास रस्ता अडवून धरल्यामुळे,
या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. रास्तारोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या भागात
पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना
सादर केलं. विधीज्ञ श्रीकांत वाईकर, विधीज्ञ टी.ए.चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं
या आंदोलनात सहभागी झाले होते.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या इसापूर धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात
येणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उर्ध्व पैनगंगा
प्रकल्पांतर्गत इसापूरच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्राला, तसंच मुख्य
कालव्यावरच्या प्रवाही आणि मंजूर उपसा सिंचन योजना धारकांना हे पाणी मिळणार आहे. इसापूर
धरणात सध्या सरासरी ६६ टक्के इतका पाणीसाठा आहे.
दरम्यान,
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणातून केलेल्या विसर्गामुळे जायकवाडी धरणाची उपयुक्त
पाणी पातळी सुमारे ३२ टक्क्यांवर पोहोचली आहे.
****
जर्मनीत
झालेल्या सार्लोस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या शुभंकर डे यानं पटकावलं
आहे. अंतिम फेरीत त्यांनं इंग्लंडच्या राजीव ओसेफ याचा २१ - ११, २१ - १४ असा पराभव
केला.
****
भारत
वेस्ट इंडीज टी ट्वेंटी मालिकेत दुसरा सामना उद्या लखनौ इथं होणार आहे. मालिकेत काल
कोलकाता इथं झालेला पहिला सामना भारतानं, ५ गडी राखून जिंकला.
****
No comments:
Post a Comment