आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०५ नोव्हेंबर २०१८ सकाळी
११.०० वाजता
****
आज धनत्रयोदशी, धन्वंतरी
जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे, दीपोत्सवाला आजपासून खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो.
काल वसुबारसेला सवत्स धेनुचं पूजन झालं. अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातल्या
आदिवासी बांधवांनी परंपरेप्रमाणे वाघबारस काल साजरी केली. आज सायंकाळी घरोघरी धन्वंतरी
पूजन तसंच यमदीपदान करण्याचा प्रघात आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा नागरिकांच्या
गर्दीने फुलून गेल्या आहेत.
****
नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे
खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्या सर्व बाजार समित्या येत्या १९ नोव्हेंबर पर्यंत बंद
राहणार आहेत. दिवाळी मुळे या बाजार समित्या बंद ठेवण्यात येणार आहे. मालेगाव तालुक्यातले
सर्व यंत्र माग उद्यापासून १२ नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आर्थिक मंदी, यंत्रमाग धारकांच्या समस्या आणि दिवाळी या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात
आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद इथले ज्येष्ठ पत्रकार
बी एन मग्गीरवार यांचं आज सकाळी निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. लोकसत्ता या दैनिकामध्ये
यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली. हैदराबाद मुक्तिसंग्राम, मराठवाडा विद्यापीठ नामांतर
आंदोलन, यासह मराठवाड्यातल्या विविध आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. आज दुपारी
दोन वाजता पुष्पनगरी स्मशानभूमी मध्ये त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात
येणार आहेत.
****
भारतीय संविधान हे कोण्या
एका जाती-धर्मासाठी नाही, तर १३४ कोटी जनतेसाठी आहे. हे संविधान आम्ही नष्ट होऊ देणार
नाही, असं अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन
खरगे यांनी म्हटलं आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली
काल मुंबईत संविधान बचाव परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते.
या परिषदेत संविधान वाचवण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
****
धुळे जिल्ह्यातल्या शहादा
बाजार समितीच्या आवारात समता परिषदेच्या सभेत काल मनुस्मृती जाळून निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजवळ यावेळी उपस्थित होते.
राज्यात शेतकऱ्यांचं राज्य येवो अशी अपेक्षा व्यक्त करत, भुजबळ यांनी सध्याच्या सरकारवर
टीका केली.
****
No comments:
Post a Comment