Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 01 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जून २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø पंतप्रधान शेतकरी
सन्मान योजनेत देशातल्या सर्व शेतकऱ्यांचा समावेश; शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना निवृत्तीवेतन
देण्याच्या योजनेलाही केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
Ø येत्या १७ जूनपासून
लोकसभेचं अधिवेशन; ५ जुलैला अर्थसंकल्प सादर होणार
Ø देशात सरासरीच्या
९६ टक्के तर राज्यातही यंदा समाधानकारक पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा सुधारीत अंदाज
आणि
Ø इंग्लंडमधल्या
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल पाकिस्तानवर वेस्टइंडिजचा सहज विजय
****
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा विस्तार
करून देशातल्या सर्व शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाच्या
काल झालेल्या पहिल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना
निवृत्तीवेतन देण्याच्या योजनांनाही मंत्रीमंडळानं मान्यता दिली. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्याची
घोषणा भारतीय जनता पक्षानं निवडणूक जाहीरनाम्यात दिली होती, या आश्वासनानुसार सरकारनं
मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत या दोन्ही योजनांना मंजुरी दिली. बैठकीनंतर वार्ताहरांना
माहिती देतांना कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं की,
शेतकरी सन्मान योजनेचा विस्तार करताना यापूर्वीची पात्रतेसाठीची दोन हेक्टर्सची मर्यादा
काढून टाकण्यात आली आहे. यामुळे आता या योजनेचा लाभ देशभरातल्या १४ कोटी ५० लाख शेतकऱ्यांना
मिळू शकेल. वार्षिक सहा हजार रूपयाचं अनुदान या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना तीन
टप्प्यात दिलं जाणार आहे. आतापर्यंत साडेतीन कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात
आल्याचं तोमर यांनी सांगितलं. याशिवाय वयाची ६० वर्ष पूर्ण केलेल्या अल्प आणि अत्यल्प
भूधारक शेतकऱ्यांना दरमहा किमान तीन हजार रूपये निवृत्ती वेतन देण्याच्या योजनेलाही
मंत्रीमंडळानं मान्यता दिली. स्वैच्छिक आणि अंशदानाच्या आधारावर ही योजना असून वयाची
१८ वर्ष पूर्ण असलेले शेतकरी, वयाची ४० वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेत सहभागी होऊ
शकतील. सहभागी शेतकऱ्यांना दरमहा त्यांच्या हिश्श्याची रक्कम योजनेत गुंतवावी लागेल,
तेवढीच रक्कम केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या निवृत्तीवेतन खात्यात भरेल, असं तोमर म्हणाले. शेतकऱ्यांच्या
मृत्यूनंतर त्याच्या पत्नीस ५० टक्के कुटुंब निवृत्तीवेतन देण्याची तरतूदही या योजनेत
आहे, असं ते म्हणाले. शेतकऱ्यांबरोबरच व्यापाऱ्यांसाठीच्या निवृत्तीवेतन योजनेलाही
मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. सर्व दुकानदार, किरकोळ व्यापारी आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना
सामाजिक सुरक्षा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याची माहिती, केंद्रीय माहिती
आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. दीड कोटी रूपयांपेक्षा कमी वस्तु आणि
सेवा कराची उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी ही योजना आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच व्यापाऱ्यांनाही
या योजनेत स्वतःचा हिस्सा द्यावा लागणार आहे, त्यांनाही वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर
दरमहा किमान तीन हजार रूपये निवृत्तीवेतन देण्याची तरतूद या योजनेत आहे. देशभरातल्या
तीन कोटी व्यापाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल, असं जावडेकर म्हणाले.
राष्ट्रीय सुरक्षा निधी योजनेअंतर्गतच्या पंतप्रधान
शिष्यवृत्ती योजनेत वाढ करण्यासही काल केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली.
****
दरम्यान, लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जून ते
२६ जुलै या कालावधीत बोलावण्यासही मंत्रीमंडळानं मान्यता दिली. या अधिवेशनादरम्यान
लोकसभा अध्यक्षांची निवड १९ तारखेला केली जाईल. २० जूनला राष्ट्रपतिचं अभिभाषण होईल.
आर्थिक सर्वेक्षण चार जुलैला तर ५ जुलैला अर्थसंकल्प सादर केला जाईल.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
मंत्रीमंडळाचं काल खातेवाटप जाहीर करण्यात आलं. यामध्ये मोदी यांच्याकडे कार्मिक मंत्रालय,
नागरी तक्रार आणि निवृत्ती, आण्विक ऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग ही खाती आहेत. कॅबिनेट
मंत्री राजनाथ सिंह यांना संरक्षण, अमित शाह
यांना गृहमंत्री तर निर्मला सीतारामण यांना
अर्थ आणि कंपनी व्यवहार खाते देण्यात आलं आहे. नितीन गडकरी यांना परिवहन आणि महामार्ग
तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग ही खाती देण्यात आली आहेत. रामविलास पासवान यांना
अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण, नरेंद्र सिंह तोमर हे कृषी आणि शेतकरी
कल्याण तसंच ग्रामीण विकास आणि पंचायत राज, रवीशंकर प्रसाद हे कायदा, दूरसंवाद आणि
माहिती तंत्रज्ञान ही खाती संभाळणार आहेत. स्मृती ईराणी यांच्याकडे महिला आणि बाल कल्याण
तसंच वस्त्रोद्योग, प्रकाश जावडेकर यांच्याकडे माहिती आणि प्रसारण तसंच वन आणि पर्यावरण,
पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग, अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योग
आणि सार्वजनिक उपक्रम या खात्यांचा पदभार देण्यात आला आहे. राज्य मंत्री रावसाहेब
दानवे हे ग्राहक संरक्षण तसंच अन्न आणि नागरी पुरवठा, रामदास आठवले हे सामाजिक न्याय
आणि सबलीकरण, संजय धोत्रे हे मनुष्यबळ विकास, दळणवळण, माहिती आणि तंत्रज्ञान ही खाती
संभाळणार आहेत.
खातेवाटप झाल्यानंतर बहुतांशी मंत्र्यांनी आपापल्या
खात्याचा पदभार स्वीकारला आहे.
****
देशात यंदा सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा सुधारित
अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. येत्या सहा जूनपर्यंत केरळमध्ये पावसाचं
आगमन होईल. त्यानंतर सप्टेंबरपर्यंत साधारण पाऊस राहणार आहे. अल् निनोचा प्रभावही कमी
होणार असल्याचं या अंदाजात म्हटलं आहे. दरम्यान, देशाबरोबरच राज्यातही यंदा समाधानकारक
पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज आणि
चार तारखेला राज्यात मराठवाड्यासह कोकण,
गोवा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला
आजपासून सुरूवात होत आहे. ऑनलाईन प्रवेश घेतला तरच विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीच्या
मंडळाची परीक्षा देता येणार आहे, त्यामुळं शाळा महाविद्यालयांनी कोणत्याही विद्यार्थ्यांचा
प्रवेश ऑफलाईन करू नये असा इशारा काल शिक्षण
विभागानं मुखाध्यापक आणि प्राचार्यांना दिला. काल औरंगाबाद इथं या प्रवेशासंदर्भात
महापलिका क्षेत्रातले माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तसंच कनिष्ठ
महाविद्यालाचे प्राचार्य यांची सहविचार सभा शिक्षण विभागानं घेतली. ही प्रक्रिया एकूण
चार फेऱ्यांमध्ये राबवली जाणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं खत विक्रीचा
परवाना नसतांना अनधिकृतरित्या खत विक्री करणाऱ्या गुजरातमधल्या जी.बी. ॲग्रो कंपनीविरूद्ध
शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना बांधावर
कमी किमतीत खत विकले जात असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली. संबंधित
खताची तपासणी केली असता यामध्ये अन्नद्रव्य घटकाचं प्रमाण नगण्य आढळून आलं आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक खत विक्रेत्यांकडून,
पक्की पावती घेऊनच खताची खरेदी करावी आणि फसवणूक टाळावी असं आवाहन जिल्हा परिषद कृषी
विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी केलं आहे.
****
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत
काल नॉटिंगहम इथं झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं पाकिस्तानवर सात गडी राखून सहज विजय
मिळवला. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं.
पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करताना २२ व्या षटकांत ११० धावा करून सर्वबाद झाला.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजच्या संघान चौदाव्या षटकातच तीन गडी गमावून हे आवाहन पूर्ण
केलं.
या स्पर्धेत उद्या न्युझीलंड आणि श्रीलंका तसंच अफगाणिस्तान
आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान सामने होणार आहेत.
****
जालना औद्योगिक वसाहतीमधल्या भक्ती ऑईल मील या कंपनीच्या
गोदामाला काल सकाळी आग लागली. आगीच्या या घटनेत गोदामात मोठ्या प्रमाणात साठवलेलं कुकुट
पालन उद्योगासाठी वापरण्यात येणारं कोंबडी खाद्य आणि बारदान्यानं पेट घेतला. जालना,
औरंगाबाद आणि परतूर इथल्या अग्निशमन दलासह
खासगी टँकर आग विझवण्यासाठी बोलावण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
निम्न दुधना प्रकल्पातून आज दुपारी चार वाजता पाणी
सोडण्यात येणार आहे. यामुळे निम्न दुधना प्रकल्प ते परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहराजवळच्या
कोल्हापूर बंधाऱ्यापर्यंत निम्न दुधना नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात
आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये तसंच ज्यांनी आपली जनावरं किंवा साहित्य नदीपात्रात
ठेवली असतील ती त्वरीत काढून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
****
जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त कालपासून ३० जूनपर्यंत
औरंगाबाद जिल्ह्यात मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती डॉ.
अमोल गिते यांनी औरंगाबाद इथल्या जिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात दिली. डॉ. एस.
व्ही. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या
या कार्यक्रमावेळी तंबाखूच्या दुष्परिणामांवर पथनाट्य सादर करण्यात आलं.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या
चोंडी या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी काल त्यांच्या २९४व्या जयंती
निमित्त विविध मान्यवरांनी अभिवादन केलं. माजी मंत्री गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात खासदार
छत्रपती संभाजीराजे, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे प्रमुख उपस्थित होते. अहिल्याबाई
होळकर यांनी सर्व जाती धर्माना घेऊन काम केलं. त्या महामाता होत्या. त्यांचा आदर्श
पुढं चालू ठेवून काम करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री
पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या मुरूड अकोलाजवळ काल एका वऱ्हाड्याच्या
टेम्पोला अपघात झाल्यानं दोन जणांचा मृत्यु आणि चौदा जण जखमी झाले. काल दुपारी ही दुर्घटना
घडली. चाटा गावामधला विवाह समारंभ आटोपून परत जात असतांना या टेम्पोला समोरून येणाऱ्या
एका वाहनानं जोराची धडक दिल्यानं दोन्ही वाहनं पुलावरून खाली पडली. यात टेम्पोतील दोन
जणांचा मृत्यु झाला.
*****
***
No comments:
Post a Comment