आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ जून २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीत बनावट मतदारांबद्दलचं
वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भातील दावे आयोगाच्या संकेतस्थळावर टाकण्यात
आलेल्या मतदारांच्या अंतिम संख्येवर आधारित असून संकेतस्थळावर टाकलेली मतदारांची संख्या
अंतिम नसल्याचं आयोगानं एका निवेदनात म्हटलं आहे. या लोकसभा निवडणुकीदरम्यान काही राज्यांमध्ये
मतदारांची वास्तविक संख्या आणि मतदान करणाऱ्यांची एकूण संख्या यात विसंगती आढळल्याचे
आरोप आहेत.
ईव्हीएम मतदान आणि टपालानं प्राप्त मतदान या दोन
प्रकारातील मतदान एकत्र केल्यानंतर अंतिम निकाल तयार केला जातो, असं आयोगानं म्हटलं
आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची अंतिम आकडेवारी प्राप्त होण्यास दोन ते तीन
महिन्यांचा अवधी लागला होता. यंदा
सर्व राज्यांमध्ये सर्व लोकसभा निवडणूक क्षेत्रांतील मतदारांशी संबंधित आकडे एकत्र
करण्यासाठी माहिती, तंत्रज्ञानाच्या नव्या तंत्राचा उपयोग करण्यात आला असून सर्व निवडणूक
अधिकाऱ्यांकडून सगळी माहिती आयोगाला लवकरच प्राप्त होण्याची शक्यता असल्याचं निवडणूक
आयोगानं म्हटलं आहे.
****
मोदी सरकारनं नेहमीच सर्व भाषांचा प्रचार केला आहे
आणि कोणत्याही भाषेवर कोणतीही भाषा लादली नाही, असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश
जावडेकर यांनी म्हटलं आहे. सरकारनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यावर कोणताही
निर्णय घेतला नाही, सरकार सार्वजनिक मत घेतल्यानंतर मसुदा धोरणावर निर्णय घेईल. काल
नवी दिल्ली इथं त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
दरम्यान, भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था - इस्रोचे
माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखालील समितीनं मनुष्य बळ विकास मंत्री
रमेश पोखरियाल निशंक यांना शिक्षण धोरणांचा एक मसुदा सादर केला.
****
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर
यांच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेले संजीव पुनाळेकर आणि त्याचा सहायक विक्रम भावे
हे तपासात सहकार्य करत नसल्याचं केंद्रीय अन्वेषण विभाग -सीबीआयनं पुण्यातल्या एका
विशेष न्यायालयाला सांगितलं आहे. या दोघांना अजून चौदा दिवसांची कोठडी देण्यात यावी,
अशी मागणीही सीबीआयनं केली. यावर न्यायालयानं या दोघांना येत्या चार तारखेपर्यंत कोठडी
सुनावली. पुनाळेकर याच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधल्या माहितीचं विश्लेषण सुरू असल्याचं
विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. डॉक्टर दाभोलकर
हत्या प्रकरणात आतापर्यंत , शार्प शूटर सचिन अणदुरे आणि शरद कळसकरसह सहा जणांना अटक
करण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग विकास
आराखड्याच्या कामांना गती देण्याचं आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी केलं
आहे. राज्य सरकारनं या आराखड्यातल्या एकशे तेहतीस कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली
आहे. या विकास आराखड्याअंतर्गत मंदिर आणि परिसराचं सुशोभीकरण, प्रवेशद्वार, प्रसाधनगृह
अणि उद्यान विकासाची कामे केली जाणार आहेत.
****
गोंदिया जिल्ह्यात तेका टोला ते मुरुक डोह, दंडारी
रस्त्यावरच्या पुलाखाली नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेला स्फोटकांचा साठा पोलिसांनी काल
जप्त केला. मागच्या महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंगाच्या,
स्फोटाच्या घटनेनंतर पोलिस या भागातल्या जंगलात आणि दुर्गम भागात राबवत असलेल्या शोध मोहीमे दरम्यान पोलिसांना हा
साठा सापडला असून, यामुळे भविष्यातली मोठी दुर्घटना टळली असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
सांगली - हरिपूर रस्त्यावर भरधाव ट्रकच्या धडकेनं
एका सहा वर्षीय मुलीचा काल रात्री मृत्यू झाला. या प्रकारानंतर संतप्त जमावानं ट्रक
चालकाच्या सहकाऱ्याला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला तर ट्रकचालक फरार झाला.
सांगली शहर पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्याला लोअर दुधना प्रकल्पातून काल संध्याकाळी
२३० क्यूसेक विसर्गानं पाणी सोडण्यात आलं. हे पाणी केवळ पिण्यासाठी सोडण्यात आलं असून
त्याचा इतर कामासाठी गैरवापर होवु नये यांची दक्षता घेण्यात यावी अश्या सुचना या निमित्त
प्रशासनानं दिल्या आहेत. परभणीकरांच्या पाण्याचा प्रश्र्न यामुळं काही अंश सुटेल, अशी
शक्यता आमच्या वार्ताहरानं व्यक्त केली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment