Thursday, 20 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.06.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जून २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  लोकसभा अध्यक्षपदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ओम बिर्ला यांची काल एकमतानं निवड
Ø  वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी दोन हजार जागा वाढवण्याचा राज्य शासनाचा निर्णय 
Ø  भाजप आणि शिवसेना युतीमध्ये सर्व समसमान असावं - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
Ø  उद्या जागतिक योग दिवस; नांदेड इथं राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन
आणि
Ø  विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून शिखर धवन बाहेर; ऋषभ पंतचा समावेश
****

 लोकसभा अध्यक्षपदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ओम बिर्ला यांची काल एकमतानं निवड करण्यात आली. बिर्ला हे राजस्थानातल्या कोटा इथून सलग दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभाध्यक्ष पदासाठी बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर, आवाजी मतदानानं त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पंतप्रधान मोदी, काँग्रेसचे  नेते अधीररंजन चौधरी यांच्यासह सर्वच पक्षाच्या सदस्यांनी बिर्ला यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर पंतप्रधानांनी सदनाला मंत्रिमंडळाचा परिचय करून दिला. दरम्यान, आज संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन्ही सदनांच्या संयुक्त सभेला संबोधित करणार आहेत. राज्यसभेच्या कामकाजालाही आजपासून सुरुवात होत आहे.
****

 वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी पुढच्या शैक्षणिक वर्षापासून दोन हजार जागा वाढवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत ही माहिती दिली. दोन हजार वाढीव जागांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याचंही महाजन यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागाही वाढवण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचं महाजन यांनी सांगितलं.

 दरम्यान, मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गातून पदव्युत्तर वैद्यकीय तसंच दंत अभ्यासक्रमांसाठी आरक्षण उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीनं सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती महाजन यांनी काल विधानपरिषदेत दिली.
****

 गेल्या पाच वर्षात कुपोषणामुळं राज्यात सर्वाधिक मृत्यू झाल्याचं भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे. ते काल विधानसभेत आदिवासी विकास विभागाच्या वतीनं चालवल्या जात असलेल्या आश्रम शाळांवरील चर्चेच्या वेळी बोलत होते. या शाळांच्या सुविधांबाबत आठ महिन्यांपूर्वी झालेल्या निर्णयावर अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

 आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाबाबत येत्या दहा दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
****

 तीन आणि पाच अश्र्वशक्तीच्या कृषी पंपांना, सौर ऊर्जेनं तर त्याहून अधिक क्षमतेच्या कृषी पंपांना पारंपारिक पद्धतीनं वीज पुरवठा केला जाणार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पंचवीस हजार सौर कृषीपंप महावितरण मार्फत बसवून दिले जाणार आहेत, असंही उर्जा मंत्र्यांनी एका प्रश्र्नाच्या उत्तरात सांगितलं.
****

 मंत्रिमंडळातून वगळलेल्या आणि भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काल विधान परिषदेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. सरकारनं, गेल्या पाच वर्षात दिलेलं एकही आश्वासन, पाळलेलं नाही असा आरोप मुंडे यांनी यावेळी केला.
****

 विडीचा हानिकारक उत्पादनांच्या गटात समावेश करून, त्यावर सर्वाधिक २८ टक्के कर आकारावा, अशी मागणी वस्तू आणि सेवा कर परिषदेकडे करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संघटना, वैद्यकीय व्यावसायिक तसंच अर्थतज्ज्ञांनी, तंबाखूजन्य पदार्थांसारख्या हानिकारक उत्पादनांचा सर्वाधिक कराच्या गटात समावेश करण्याची मागणी केली आहे.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 भाजप आणि शिवसेना युतीमध्ये सर्व समसमान असावं, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. काल शिवसेनेच्या त्रेपन्नाव्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपसोबत ज्या मुद्यांवरून वाद होता, ते मुद्दे भाजप अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी सोडवल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं. राम मंदिरासह अनेक मुद्यांवर ठाकरे यांनी यावेळी भाष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, भाजप शिवसेना युती ही फक्त निवडणुकीपुरती नसून, या युतीच्या माध्यमातून राज्य सुजलाम सुफलाम करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्ष मोठा व्हावा, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावा, अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
****

 जागतिक योग दिवस उद्या सर्वत्र साजरा होणार आहे. यंदा योगदिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम नांदेड इथं होणार असून, योगगुरु बाबा रामदेव या कार्यक्रमात उपस्थितांकडून योगाभ्यास करून घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर रामदेव बाबांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. उद्या नांदेड इथल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण रामदेवबाबा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं तसंच राज्यभरातल्या आयोजनाबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
****

 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीच्या भारतीय संघातून सलामीचा फलंदाज शिखर धवन याला वगळण्यात आलं असून, त्याच्या जागी युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत याचा समावेश करण्यात आला आहे. धवन याच्या अंगठ्याला असलेलं प्लास्टर जुलै महिन्यातही कायम राहणार असल्यानं, हा बदल करण्यात आल्याचं, संघ व्यवस्थापक सुनील सुब्रह्मण्यम यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान या स्पर्धेत काल न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा चार गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेनं दिलेलं २४२ धावांचं लक्ष्य, न्यूझीलंडनं चव्वेचाळिसाव्या षटकांतच पूर्ण केलं. या विजयानं, नऊ गुणांसह न्यूझीलंड गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आज ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश संघात सामना होणार आहे.
****

 औरंगाबाद इथं रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रितेश महालकर या व्यक्तीस रेल्वे पोलिसांनी काल अटक केली. महालकर याच्याजवळ विविध १४ रेल्वे गाड्यांची आरक्षित तिकिटं सापडल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 बीड जिल्ह्यात गर्भाशयाच्या बेकायदेशीर शस्त्रक्रिया करण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर उपाय योजना करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने शस्त्रक्रिया करणाऱ्या खाजगी रुग्णालयावर अंकुश ठेवण्यात येत आहे. अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून....

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं अश्या रूग्णालयावर भरारी पथकाच्या माध्यमातून कायम नजर ठेवण्यात येत असून, ग्रॉमिणभागात देखील या बाबद आशा वर्करांनी आणि अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून सर्वे करण्यात येत आहे. अश्या महिलाचं समूपदेशन जनजागृती करण्याचं काम सद्या बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सूरू आहे.
आकाशवाणी बातम्यासाठी, शशी केवडकर, बीड.
****

 नाशिक शहरातील मुथूट फायनान्सवर गेल्या शुक्रवारी पडलेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी दोघांना गुजरातमधून ताब्यात घेतलं आहे. या घटनेत एक कर्मचारी मृत्यूमुखी पडला होता तर दोन जखमी झाले होते.
****

 बारावीच्या पुनर्परिक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीनं आवेदनपत्र सादर करण्यास २४ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ही आवेदनपत्रं भरता येणार आहेत.
****

 शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नाम फाउंडेशन आणि हिमालया ड्रग कंपनीच्या वतीनं औरंगाबाद जिल्ह्यात कॉन्ट्रक्ट फार्मिंग करण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या कुतूब खेडा आणि केकत जळगाव इथल्या एकूण दहा शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचं परिक्षण करून यासाठी निवड करण्यात आली. कमी पावसात तुळशीची शेती करून, शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळत असल्याची माहिती नाम फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी दिली.
****

 लातूर इथं, मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाईचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत. महापौर सुरेश पवार आणि आयुक्त एम.डी. सिंह यांनी काल महापालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेतला, त्यावेळी हे निर्देश देण्यात आले. अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
*****
***

No comments: