Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01
June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जून २०१९ सायंकाळी
६.००
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी भूतानच्या समृद्धीसाठी भारताच्या प्रतिबध्दतेचा पुनरोच्चार केला आहे. काल
भूतानचे पंतप्रधान डॉक्टर लोते त्शेरिंग यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मोदी यांनी हे
आश्वासन दिलं. भारत जल विद्युत क्षेत्रात भूतानला सहयोग आणि भूतानच्या विकासात भारताच्या
सहभागाचं महत्व देखील यावेळी अधोरेखित करण्यात आलं.
****
केंद्रीय मंत्री
अमित शाह यांनी आज गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी राज्यमंत्री जी किशन रेड्डी
आणि नित्यानंद राय यांनी मंत्रिपदाचा पदभार
स्वीकारला. दुसरे कॅबिनेट मंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.
तसंच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पर्यावरण, वन आणि वातावरण बदल खात्याचा
पदभार स्वीकारला.
****
जीएसपी म्हणजेच
प्राधान्यकृत सामान्य प्रणाली या अंतर्गत भारताचा विकसनशील लाभार्थी देश हा दर्जा काढून
घेण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. भारतानं आपली
बाजारपेठ पूर्णपणे आणि वाजवी पद्धतीनं अमेरिकेसाठी खुली करण्यासाठी मान्यता न दिल्यानं
हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय ५ जून २०१९ पासून अंमलात येईल, असं व्हाईट हाऊसनं
काढलेल्या ठरावात म्हटलं आहे. जीएसपी या पद्धती अंतर्गत भारतासारख्या काही देशांकडून
अमेरिकेत माल आयातीवर कर द्यावा लागत नाही.
दरम्यान, अमेरिकेच्या
या निर्णयावर भारतानं नाराजी व्यक्त केली आहे. थेट करात कपात न करता याप्रकरणी भारतानं
व्यावसायिक दृष्टिकोनातून पुढे जाण्यासाठी अमेरिकेसमोर काही उपाय ठेवले होती, मात्र
अमेरिकेनं त्यांचा स्वीकार केला नसल्याचं भारतानं म्हटलं आहे.
****
पावसाळ्यात पूर येणे, इमारत पडणे, पाणी साचणे अशा घटना घडू नयेत, यासाठी
संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे. तसंच आपत्कालीन नियंत्रण कक्षात मनुष्यबळाने
सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या राज्यस्तरीय मान्सूनपूर्व
तयारीच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री
चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. गेल्या
वेळच्या चांगल्या कामांच्या अनुभवांवर अवलंबून न राहता, संस्थागत ज्ञान, अनुभव आणि
दूरदृष्टी ठेवून योग्य तयारी केल्यास आपत्ती टाळता येईल, असं ही मुख्यमंत्री यावेळी
बोलतांना म्हणाले.
****
देशाची आर्थिक
गणना ही महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी अचूक आणि वस्तुनिष्ठ तथ्यसंकलन होणं आवश्यक आहे.
या आर्थिक गणनेसाठी मोबाईल ॲपचा आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्यानं ही गणना
अधिक अचूक व्हावी, ही अपेक्षा राज्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.
व्ही. आर. श्रीनिवास यांनी आज खारघर इथं व्यक्त केली. देशाच्या सातव्या आर्थिक गणना
प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आज खारघर-नवी मुंबई येथील ग्रामविकास भवनात घेण्यात
त्यावेळी ते बोलत होते.
****
हिंगोली शहरातल्या
कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन हजार क्विंटल भुईमूग शेंगाची आवक वाढली आहे. त्या शेंगाला
पाच हजार ते पाच हजार २०० रुपये भाव मिळत असल्यानं आता विदर्भातलाही भुईमूग हिंगोलीला
आला आहे.
****
शेतकऱ्यांनी उपलब्ध
पाण्याचं योग्य नियोजन करून फळबाग लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन पशुसंवर्धन,
दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केलं आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीनं
जुन्या मोंढ्यात आयोजित तीन दिवसीय आंबा महोत्सवाचं उद्घाटन आज खोतकर यांच्या हस्ते
झालं. त्यावेळी ते बोलत होते. नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबा ग्राहकांना थेट खरेदी करता
यावा तसंच शेतकऱ्यांना आंब्याच्या विविध जातींची माहिती व्हावी, या उद्देशानं जालन्यात
प्रथमच आंबा विक्री आणि प्रदर्शन भरवण्यात आल्याचं खोतकर यांनी यावेळी सांगितलं.
****
फ्रेंच खुल्या
टेनीस स्पर्धेत महिला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या झेकोस्लोव्होकियाची
टेनिसपटू करोलिना प्लिस्कोव्हा तिसऱ्या फेरीत पराभूत झाली आहे.
****
No comments:
Post a Comment