Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
–
01 June 2019
Time
20.00 to 20.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जून २०१९
- २०.००
****
संयुक्त पुरोगामी
आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कथित विमान वाहतूक घोटाळा
प्रकरणात सक्त वसुली संचालनालयानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी केंद्रीय
मंत्री प्रफुल्ल पटेल यांना येत्या सहा जून रोजी चौकशीसाठी बोलावलं आहे. यासंदर्भातल्या,
मनी लाँडरिंग प्रकरणी पटेल यांनी नवी दिल्लीत चौकशी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित रहायचं
आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला दलाल दीपक तलवार याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर
पटेल यांची चौकशी करण्याची गरज असल्याचं, तसंच खाजगी विमान कंपन्यांना लाभ देण्यासाठी
राष्ट्रीय विमान कंपनीचं कथित नुकसान केलं गेल्याचं सक्त वसुली संचालनालयानं म्हटलं
आहे.
****
राज्यातले सर्व
अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याची ग्वाही, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन
गडकरी यांनी दिली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर विमानतळावर त्यांचं आज स्वागत
करण्यात आलं, त्यानंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. देशाच्या विविध भागात
मोठ्या प्रमाणात रस्ते निर्मितीची कामं सुरु आहेत असं सांगत, प्रतिदिन रस्ते बांधणीचं
उद्दिष्ट वाढवणार असल्याचं ते म्हणाले. दिल्ली- मुंबई महामार्ग येत्या २०२० पर्यंत
पूर्ण केला जाईल असं ते म्हणाले. येत्या पाच वर्षात रस्त्यांच्या दुतर्फा १२५ कोटी
झाडं लावली जातील असं त्यांनी सांगितलं.
****
आगामी विधानसभा
निवडणुका काँग्रेसबरोबरच युती करूनच लढवणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत राष्ट्रवादी
काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली, त्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
विविध विषयांवर चर्चा झाल्याचं पाटील यांनी सांगितलं. या विधानसभा निवडणुकीत महिला
आणि नवीन चेहऱ्यांना अधिक संधी दिली जाईल असं ते म्हणाले.
****
काँग्रेस संसदीय
समितीच्या नेत्या म्हणून संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची नियुक्ती
झाली आहे. काँग्रेसच्या नवनिर्वाचित ५२ सदस्य तसच राज्यसभा सदस्यांची संसदेच्या केंद्रीय
सभागृहात आज बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य आणि नेतेही उपस्थित
होते. या बैठकीत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन
सिंह यांनी त्यांच्या नावाचा ठराव मांडला. यावेळी सदस्यांनी श्रीमती गांधी यांना लोकसभेतला
नेता निवडण्याचा अधिकार दिला आहे. याबाबत गांधी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून लोकसभेच्या
नेत्याबाबत निर्णय घेणार आहेत. सरकारच्या रचनात्मक सुधारणांना सहकार्य करण्याचं तर
विभाजनवादी आणि प्रतिगामी धोरणांना कडाडून विरोध करण्याचं गांधी यांनी यावेळी सांगितलं.
****
पावसाळ्यात पूर
येणे, इमारत पडणे, पाणी साचणे अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य
ते नियोजन करावे. तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षात मनुष्यबळाने सतर्क राहून सर्व संपर्क
क्रमांक सुरू असतील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आज दिले. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या
राज्यस्तरीय मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मदत
आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे वरीष्ठ अधिकारी
उपस्थित होते. गेल्या वेळच्या चांगल्या कामांच्या अनुभवांवर अवलंबून न राहता, संस्थागत
ज्ञान, अनुभव आणि दूरदृष्टी ठेवून योग्य तयारी केल्यास आपत्ती टाळता येईल, असं ही मुख्यमंत्री
यावेळी बोलतांना म्हणाले.
****
देशाची आर्थिक
गणना ही महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी अचूक आणि वस्तुनिष्ठ तथ्य संकलन होणं आवश्यक
आहे. या आर्थिक गणनेसाठी मोबाईल ॲपचा आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्यानं
ही गणना अधिक अचूक व्हावी, ही अपेक्षा राज्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान
सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी आज मुंबईत व्यक्त केली. देशाच्या सातव्या आर्थिक
गणना प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.
****
अंधश्रद्धा निर्मूलन
समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले ॲडव्होकेट
संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहायक विक्रम भावे तपास कार्यात सहकार्य करत नसल्याची माहिती
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं विशेष न्यायालयात दिली आहे.
****
No comments:
Post a Comment