Monday, 20 April 2020

AIR NEWS BULLETI, AURANGABAD 20.04.2020 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 April 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० एप्रिल २०२० दुपारी १.०० वा.
**** 

 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर सुरू टाळेबंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश टाळेबंदीच्या काळात बंदी असलेल्या उपक्रमांना सुरू करण्याच्या सूचना देत असल्याच्या पार्श्र्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व मुख्य सचिवांना या संदर्भात संवाद साधण्यात आला असल्याचं केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी आज सांगितलं. 
****

 देशातील कोरोना विषाणू बाधीतांची संख्या सतरा हजार दोनशे पासष्ट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली. यातील दोन हजार पाचशे शेहचाळीस रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. देशात लागण झालेल्यांमध्ये सत्त्याहत्तर विदेशी नागरिक आहेत. काल संध्याकाळपासून यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या २४ झाली असून आतापर्यंत पाचशे त्रेचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे. मागील अठ्ठावीस दिवसांत पुद्दुचेरीतील माहे आणि कर्नाटकमधील कोडागू जिल्ह्यांत नवा रुग्ण आढळलेला नाही. गंभीर रुग्णांच्या उपचारांसाठी देशभरात सातशे पंचावन्न विशेष रुग्णालयं आणि एक हजार ३८९ विशेष स्वास्थ केंद्र कार्यरत आहेत. आजपासून काही सेवांमध्ये सूट देण्यात येणार असली तरी विमान, रेल्वे आणि रस्ते वाहतूक, शैक्षणिक संस्था, औद्योगिक वाणिज्यिक उपक्रम तसंच हॉटेल सेवा बंद राहणार आहेत. चित्रपटगृह, व्यावसायिक संस्था, धार्मिक स्थळही तीन मे पर्यंत बंद रहाणार आहेत. शास्त्रज्ज्ञांची विविध सत्तर पथकं कोरोना विषाणू प्रतिबंधित लस तयार करण्याचं काम करत आहेत. देशात आतापर्यंत तीन लाख ८६ हजार लोकांची कोरोना विषाणू संबंधी चाचणी करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं दिली आहे.
****

 पालघर जिल्ह्यात तिघांच्या हत्ये प्रकरणी दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कांदीवलीहून सूरतला अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाला गेल्या सोळा तारखेला रात्री जमावानं चोर समजून केलेल्या बेदम मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यापुर्वीच केली आहे. जुना आखाड्याचे स्वामी कल्पवृक्षगिरी, स्वामी सुशीलगिरी आणि त्यांचा चालक निलेश तेलगडे यांच्या हत्ये प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी आपण चर्चा केली असून या प्रकरणातील दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनी आज म्हटलं आहे.    
****

 मुंबईतून कर्नाटकातील आपल्या मूळगावी जाणाऱ्या कंटेनर मधील एक महिलेलाही कोरोना विषाणुची लागण झाली आहे. यापुर्वी याच कंटेनर मधील एका ५० वर्षीय व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आला होता. तसंच कोल्हापुर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथल्या ६० वर्षीय व्यक्तीचा कोरोना विषाणुचा अहवाल सकरात्मक आला असुन, कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना  विषाणु बाधीत रुग्णांची संख्या आता दहा झाली आहे.
****

 उस्मानाबाद जिल्ह्यात काल रात्री विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, लिंबू, टरबूज तसंच खरबूज आणि केळीच्या फळबागांच मोठं नुकसान झाल आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या फळबागांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
****

 धुळे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार रामदासजी रूपला गावीत यांच्या पार्थीव देहावर आज साक्री तालुक्यातील पिंजारझाडी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांचं काल काल ह्रदय विकारान निधन झालहोतं. ते ८५ वर्षांचे होते. जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून रामदासजी गावित यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली होती.
****

 सांगली जिल्ह्यातल्या विजयनगर इथल्या कोरोना विषाणुनं मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या चार जणांचे तपासणी अहवाल नकारात्मक आले असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. कुटुंबातील का सदस्याचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. सांगली जिल्ह्यातील एका सत्तेचाळीस वर्षीय व्यक्तीचा काल कोरोना विषाणुमुळे मृत्यू झाला होता.
****

 नांदेड इथल्या हिमायतनगर इथं प्रधानमंत्री किसान योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्क्म काढण्यासाठी बँकां समोर गर्दी झाली आहे. भाजप युवा मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
*****
***

No comments: