Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 April
2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ एप्रिल २०२० सायंकाळी ६.००
****
देशभरात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे तीनशे शहाऐंशी
नवे रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णांची संख्या सोळाशे सदतीस झाली आहे. केंद्रीय आरोग्य
मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. दिल्लीत निजामुद्दीन इथं झालेल्या
तबलिगी जमातमुळे बाधितांची संख्या वाढल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. देशभरात
कोरोनामुळे दगावलेल्या ३९ जणांपैकी सुमारे २५ टक्के मृतांचा या कार्यक्रमाशी संबंध
आढळून आल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान देशभरातूनही अनेक राज्यातले नागरिक मोठ्या
संख्येनं या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या नागरिकांचा वेगानं तपास करावा, असे निर्देश
केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी दिले आहेत. आज सर्व राज्यांचे मुख्य सचिव
तसंच पोलिस महासंचालकांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत गौबा यांनी ही शोधमोहीम
युद्धपातळीवर राबवण्याची सूचना केली. या तबलिगी जमात मध्ये सहभागी झालेल्या विदेशी
नागरिकांनी व्हिसा नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात
कारवाई करण्यासही राज्य सरकारांना सांगण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातले ११ लोक
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. यापैकी आठ जणांची तपासणी केली असून एक
जण पुणे इथल्या रुग्णालयात दाखल आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातले सात नागरिक या कार्यक्रमात
सहभागी झाले होते त्यापैकी फक्त तीनच जण उस्मानाबाद जिल्ह्यात परतले आहेत. या तिघांची
वैद्यकीय तपासणी करून त्यांना घरी विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.
जालना जिल्ह्यातले काही नागरिक या कार्यक्रमात सहभागी
झाल्याची माहिती समोर येत आहे. या व्यक्तींना ताब्यात घेऊन विलगीकरण कक्षात ठेवण्यात
येणार असल्याचं पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी सांगितलं.
या
कार्यक्रमातून अहमदनगर जिल्ह्यात ४६ जण आले असून त्यापैकी दोघांना कोरोनाची लागण झालेली
आहे.
****
कोरोनाविरुद्धच्या
लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची खैर नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. जनतेने अनावश्यक गर्दी करणं सुरुच ठेवलं तर अधिक कठोर उपाय योजावे लागतील, असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे. जीवाची जोखीम पत्करुन
‘कोरोना’विरुद्ध लढणाऱ्या सर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजी खरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं,
असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे. भाजीखरेदीसाठी उसळणारी गर्दी
पाहता ‘लॉकडाऊन’चा उद्देशच धोक्यात आला असल्याचं ते म्हणाले. राज्यातले बहुतांश नागरिक घरीच थांबून कोरोनाविरुद्धच्या
लढ्यात योगदान देत असल्याबद्द्ल त्यांनी या सर्वांचे तसंच शासकीय यंत्रणेचे आभार मानले.
****
कोरोना प्रतिबंधासाठी काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी,
अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या,
अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या यांना मिळणाऱ्या नियमित वेतन, मानधनाव्यतिरिक्त एक हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.
या कर्मचाऱ्यांचा ९० दिवसांसाठी २५ लाख रुपयांचा विमा उतरवण्यासही
मान्यता देण्यात आल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. दोन लाख ७३
हजार कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
दरम्यान
नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर शहरातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, यांनी सरकारकडे
मास्क आणि सॅनिटायझरसह आवश्यक सुरक्षा साहित्य पुरवण्याची मागणी केली आहे.
****
कोरोनाच्या रुग्णांची सेवा करणाऱ्या राज्यातले डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी पत्राद्वारे आभार मानत त्यांचं अभिनंदन केलं आहे. समाजसेवेसाठी हे
अतुलनीय शौर्य दाखवताना न थकता काम सुरू
ठेवल्याबद्दल या सर्वांना मानाचा मुजरा करत असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.
****
कोरोना
पार्श्वभूमीवर बीड जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा पालकमंत्री
धनंजय मुंडे यांनी आढावा घेतला. यासंदर्भातल्या उपाय योजनांसाठी ११ कोटी ८ लाख रुपये
निधी संबंधित यंत्रणेस वितरित करण्यात आला असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
दरम्यान,
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी बीड जिल्ह्यात केज तालुक्यातल्या
टाकळी ग्रामपंचायतीनं विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड ठोठावण्याचा
निर्णय घेतला असून, तिसऱ्या वेळेस हा नियम मोडल्यास, गाढवावरून धिंड काढली जाणार असल्याचं,
जाहीर केलं आहे.
****
औरंगाबाद शहरात विनाकारण
फिरणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी आजपासून कारवाई सुरू केली आहे. शहरातल्या विविध भागातून
पोलिसांनी अनेक टवाळखोरांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यामुळे शहरातल्या रस्त्यांवर
शुकशुकाट दिसून आला.
नांदेड शहरातही आज बऱ्याच
प्रमाणात शांतता दिसून आली. इतर राज्यातले अडकून पडलेले कामगार, तसंच गरीब गरजूंच्या
निवास तसंच भोजनाच्या सुविधेसाठी अनेक संस्था, संघटना पुढे येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
हिंगोली
जिल्ह्यात येहळेगाव इथं अडकून पडलेल्या राजस्थानी कामगारांना आमदार डॉ.संतोष टारफे
आणि काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं. हिंगोली
शहरात काही वसाहतींमधून होणारी वाहतुक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय संबंधित वसाहतीतल्या
रहिवाशांनी घेतला आहे.
****
लातूर
जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघातल्या २०० कुटुंबांना आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून
जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment